श्रीरामपूर प्रतिनिधी:
लेखन,वाचन, संशोधन,प्रबोधन आणि युगचिंतन ही आजच्या तरुणाचे खरी भक्तीस्वरूपाची तीर्थक्षेत्रे झाली तरच संत, समाजसेवक,देशभक्त, महामानव,शिक्षक, आई, वडील यांच्या शिकवणुकीचा, परिश्रमाचा उपयोग होईल, हीच नव्या युगाची हाक असल्याचे मत संगमनेर येथील ज्येष्ठ साहित्यिक दत्तात्रय रसाळगुरुजी यांनी व्यक्त केले.
येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे साहित्यिक दत्तात्रय सावळेराम रसाळगुरुजी यांच्या शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी श्रीसंत गोरा कुंभार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत करून रसाळगुरुजी यांच्या साहित्य आणि जीवनकार्याचा परिचय करून दिला.'घडता घडता'हे रसाळगुरुजींचे आत्मचरित्र म्हणजे कुंभार समाजातील एक जीवनझुंज कथा आहे. ८७ वर्ष वय असलेले रसाळगुरुजी यांनी कुंभार काम करून कठीण परिस्थितीत शिक्षण घेतले. १६ वर्षाचे असतानाच तें ०१ सप्टेंबर १९५३ रोजी प्राथमिक शिक्षक झाले. सातवीत ५१ टक्के मार्क मिळाले आणि त्यांना नोकरी लगेच मिळाली.पुढे आणखी शिक्षण घेत १९६१ ला ते संगमनेरच्या राजापूरला शिक्षक झाले. १९९३ ला त्यांनी श्वेच्छानिवृत्ती घेतली.साहित्यसेवा, समाजसेवा,स्वाध्याय परिवार कार्य आणि लोकप्रबोधन करणारे रसाळगुरुजी हे कुंभार समाजातील आदर्श व्यक्तिमत्व आहे. त्यांनी तयार केलेले साहित्यसंदर्भ पुस्तकांची चर्चा करण्यात आली.यावेळी कवयित्री संगीता फासाटे, सौ. मंदाकिनी उपाध्ये,सौ. आरती उपाध्ये, सौ.सुरेखा बुरकुले यांनी रसाळ गुरुजींची चित्रशैली याविषयी कौतुक केले.विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी त्यांनी लिहिलेले लेख आणि नोंदवह्या यांचे कौतुक करून सत्कार केला.संगमनेर परीट महासंघाचे तालुकाध्यक्ष भारत गवळी यांनी रसाळगुरुजींचे लेखन, वाचनाचे संस्कार सांगितले. रसाळगुरुजी पुढे म्हणाले, श्रीरामपूर ही मला साहित्यपंढरी वाटते. डॉ. बाबुराव उपाध्ये आणि साहित्य परिवार हा साहित्यिकांना घडविणारा,आपलेपणाने सर्व मदत करणारा परिवार आहे, म्हणूनच ही प्रेरणाभूमी आम्हाला लिहिते करते, असे सांगून त्यांनी आपला केलेला गौरव लाख मोलाचा असल्याचे सांगितले. संगीता फासाटे यांनी सूत्रसंचालन केले तर सौ. आरती उपाध्ये यांनी आभार मानले.
*वृत्तसंकलन: समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर

