मठ्ठ किंवा हुशार या चक्रात न अडकता निकोप,सुदृढ विद्यार्थी निर्माण करणे महत्त्वाचे - गट विकास अधिकारी विजयकुमार परीट.
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी गटविकास अधिकाऱ्याकडून रमेश जाधव व सुरेश घोळवे सन्मानित.
इंदापूर प्रतिनिधी: मठ्ठ किंवा हुशार या चक्रात न अडकता निकोप,सुदृढ विद्यार्थी निर्माण करणे महत्त्वाचे आहे असे पडस्थळ(ता. इंदापूर) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना गट विकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी प्रतिपादन केले.
दि. २३ एप्रिल २०२३ रोजी पडस्थळ येथे जि.प.प्राथ. शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, प्रख्यात बालरोगतज्ञ डॉ. लहू कदम, गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात, कालठण केंद्राच्या केंद्रप्रमुख सुनिता कदम, उपजिल्हा रुग्णालय इंदापूरचे डॉ. सुनील खाडे, महेंद्र रेडके,दिपक गुरगुडे आदी उपस्थित होते. या स्नेहसंमेलनामध्ये वैयक्तिक, सामूहिक, क्लासिक, रॅप संगीत अशा विविध प्रकारात विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर केले. इ. १ ली ते ५ वी च्या बाल विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शेतकरी व देशभक्तीपर गीतांवरती बक्षिसांचा वर्षाव झाला.
यावेळी गट विकास अधिकारी विजयकुमार परीट आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांसोबत पालकांची जबाबदारी वाढली आहे. मठ्ठ किंवा हुशार या चक्रात न अडकता निकोप,सुदृढ विद्यार्थी निर्माण करणे महत्त्वाचे आहे. शरीर सुदृढ असेल तर मन व बुद्धी आपोआप विकसित होते. यासाठी आहार, विहार, व्यायाम याच वयात अपेक्षित आहे. आजची मुले ही उद्याच्या उज्वल भारताचे भविष्य आहे यासाठी त्यांना शुभेच्छा आहेत.
तसेच पडस्थळ गावचे सुपुत्र डॉ.लहू कदम यावेळी बोलताना म्हणाले की आज जन्मगावी आल्याचा मनस्वी आनंद होत आहे. मुलांना मनसोक्त खेळू द्या.हेच वय संस्कारक्षम असते,त्यांच्यावरती शिस्तीचा बडगा वापरू नका. अभ्यासा सोबतच व्यायाम, खेळ, अवांतर वाचन, भटकंती, निसर्ग परीक्षण त्यांना करू द्या,सहलीचे आयोजन करा त्यामुळे सामाजिक जबाबदारीची जाणीव होऊन सहकार्याची भावना वाढीस लागते.
मंथन, अभिरुप स्पर्धा परीक्षा, प्रश्नमंजुषा स्पर्धा अशा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये राज्य, जिल्हा व केंद्रस्तरावरती प्रथम क्रमांक मिळवलेल्या शाळेतील ११ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शाल, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. शाळेची गुणवत्ता टिकवून ठेवत पटसंख्या(११२) वाढविल्याबद्दल तसेच इ.५ वी चा नवीन वर्ग सुरू केल्याबद्दल मुख्याध्यापक रमेश जाधव व सहशिक्षक सुरेश घोळवे यांचा सन्मान गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी संदिपान मारकड, विष्णुदास रेडके, सोसायटीचे चेअरमन भारत बोंगाणे, महेंद्र रेडके, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन मारकड, राजेंद्र बोंगाणे, गणेश गव्हाणे, महिला ग्रामपंचायत सदस्या, शेतकरी, विद्यार्थी,महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रस्ताविक मुख्याध्यापक रमेश जाधव यांनी केले तर आभार सहशिक्षक सुरेश घोळवे यांनी मानले. देशभक्तीपर गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

