देशाच्या व राज्याच्या उद्योग क्षेत्र वाढीसाठी आवश्यक असलेली उद्योग पाहणीची माहिती देऊन उद्योगांनी सहकार्य करावे- संचालक विजय आहेर
अहमदनगर - जिमाका वृत्तसेवा:
देशाचे राष्ट्रीय उत्पन्न अंदाज तयार करणे, औदयोगिक संरचनेचा अभ्यास व उद्योगविषयक धोरण निश्चितिसाठी वार्षिक उद्योग पाहणीतील आकडेवारीचा उपयोग करण्यात येतो. देशाच्या व राज्याच्या उद्योग क्षेत्र वाढीसाठी आवश्यक असलेल्या उद्योग पाहणीची माहिती शासनास देऊन उद्योगांनी सहकार्य करण्याचे आवाहन अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक विजय आहेर यांनी केले.
वार्षिक उद्योग पाहणीचा क्षेत्रकामातून संकलित करण्यात येणाऱ्या माहितीची गुणवत्ता वाढविण्यासाठी व क्षेत्रकामाचा दर्जा उंचाविण्याच्या दृष्टीकोनातून सन २०२१-२२ या वर्षांच्या क्षेत्रकामासाठी राज्यातील क्षेत्रीय अधिका-यांची तीन दिवसीय कार्यशाळा दि. १९ ते २१ एप्रिल २०२३ या कालावधीत नियोजन विभागाच्या अधिनस्त अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई तर्फे यशदा, पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी श्री. आहेर बोलत होते.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगम, (भा.प्र.से.) हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून, औद्योगिक सांख्यिकी विभागाच्या उपमहानिदेशक सौम्या चक्रवर्ती, राष्ट्रीय नमूना पाहणी विभागाच्या पुणे येथील क्षेत्रीय कार्यालयाचे संचालक आलोक कुमार, जिल्हा उद्योग केंद्र पुणेचे महाव्यवस्थापक पी. डी. दाळकर, प्रादेशिक सांख्यिकी कार्यालयांचे सह संचालक दिनेश वाघ, श्रीमती हर्षदा आंबेकर, अहमदनगर जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक दीपक दातीर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
संचालक विजय आहेर म्हणाले, प्रशिक्षणाचा पुरेपुर लाभ घ्यावा व जरी मनुष्यबळाची कमतरता असली तरी कामाचे योग्य नियोजन करुन शासनासाठी व उद्योग क्षेत्रासाठी महत्वाची असलेली माहिती या पाहणीच्या माध्यमातून वेळेत व गुणवत्तापुर्ण उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यशदाचे महासंचालक चोकलिंगम यांनी देशातील सर्व्हेचा इतिहास माहितीचे महत्व आणि त्याचा वापर आणि त्यामुळे होणारे अपेक्षित, अनपेक्षित परिणाम याबाबत उदाहरणासह अतिशय रंजक पद्धतीने उपस्थितांच्या ज्ञानात भर घातली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपसंचालक श्रीमती दिपाली धावरे यांनी वार्षिक उद्योग पाहणीबाबत सर्व उपस्थितांना अवगत केले.
कार्यशाळेच्या दुस-या दिवशी अपर संचालक डॉ जितेंद्र चौधरी हे नियंत्रक व तज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या संबंधित अनुभवी प्रशिक्षकांद्वारे वार्षिक उद्योग पाहणीच्या कामाचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण संगणकावर घेण्यात आले व प्रशिक्षणार्थीच्या अडचणीचे निराकरण करण्यात आले.
कार्यशाळेच्या समारोपाप्रसंगी यशदाचे उपमहानिदेशक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी (भा.प्र.से.), पुणे हे अध्यक्ष स्थानी होते. तर प्रमुख अतिथी म्हणुन अपर संचालक पुष्कर भरकर उपस्थित होते.
या कार्य शाळेत एकूण १६४ अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
*वृत्तसंकलन: समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर

