श्रीरामपूर प्रतिनिधी:
येथील रयत संकुलाच्या चेअरमन मीनाताई जगधने यांची रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल वर फेर निवड करण्यात आली आहे.सातारा येथील मुख्यालयात पदमभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांचा ६४ वा पुण्यतिथी सोहळा उत्साहात संपन्न झाला.त्या नंतर संस्थेचे अध्यक्ष मा.शरदचंद्रजी पवार यांच्या व मान्यवर पदाधिकायांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या बैठकीत मीनाताई जगधने यांची मॅनेजिंग कौन्सिल सदस्य पदी सर्वानुमते फेर निवड करण्यात आली.
मीनाताई जगधने यांनी १९९३ पासून शैक्षणिक क्षेत्रात पदार्पण केले.नवनवीन शैक्षणिक तंत्रज्ञान,प्रकल्प,उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्राला उच्च दर्जा प्राप्त करून दिला.मीनाताई या उत्तम कुशल प्रशासक व नियोजक म्हणून त्यांची ओळख आहे. श्रीरामपूर रयत शैक्षणिक संकुल गुणवत्ता व भौतिक सुविधा स्वयंपूर्ण केले आहे.तसेच संकुलात बालवाडी व संस्कार केंद्राची स्थापना करून स्वतः विनामूल्य शिक्षिकेसह सर्व भूमिका पार पाडल्या.आज या शाळेचे वटवृक्षात रूपांतर झाले असून महाराष्ट्रातील गुणवत्तेत अग्रेसर शाळा म्हणून त्याकडे पाहिले जाते.
इयत्ता ५ वी स्कॉलरशिप परीक्षेत या शाळेच्या विद्यार्थ्यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला होता या मागे ताईंचे बहुमोल मार्गदर्शन व प्रेरणा आहे.तसेच विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून एक आदर्शवत व आगळी-वेगळी शाळा म्हणून याची ओळख निर्माण केली आहे.
ताईंच्या दूरदृष्टी व मार्गदर्शनामुळे रयत चा उत्तर विभाग संस्थेच्या सर्व विभागात गुणवत्तेत प्रथम क्रमांकावर आला आहे.मीनाताईने महिला वाचन ग्रुप ची निर्मिती व पुस्तक भिशी सुरू केली.महिला सबलीकरणासाठी व उपेक्षित घटकासाठी त्या सामाजिक कार्यात योगदान देत आहे, राज्याच्या पालक शिक्षक संघावर ताई काम करत आहेत. मिनाताईंच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित केले आहे.तसेच रमाबाई आंबेडकर,माई गुजराती, डॉ.मेबल आरोळे आदी पुरस्काराने ताईंना गौरविण्यात आले आहे.तसेच विविध संस्था व संघटनांनी ताईंच्या सन्मान केला आहे.
मीनाताई जगधने यांच्या निवडीचे शैक्षणिक, सामाजिक , राजकीय,कलासाहित्य क्षेत्रातील मान्यवर तसेच रयत सेवक, पालक,शिक्षक,विविध संस्था व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर

