विद्यार्थ्यांनी न्यूनगंड बाजूला ठेवून आयुष्यात मिळालेल्या संधीचे सोने करावे. -आ. दत्तात्रय भरणे
इंदापूर येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर संपन्न
इंदापूर : औद्योगिक प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना, लोकसेवा व राज्यसेवा परीक्षा देत असताना काय करावे याचे मार्गदर्शन करावे. विद्यार्थ्यांनी न्यूनगंड बाजूला ठेवून, आपण आयुष्यात मिळालेल्या संधीचे सोने केले पाहिजे. आपल्यातील कलागुणांना वाव दिला पाहिजेत. एखाद्या विषयात आपण काम करीत असताना, त्यामध्ये आपण स्वतःला झोकुन दिले पाहिजे. त्यामूळे आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे. असे मत आमदार दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र शासन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इंदापूर जि. पुणे यांच्या वतीने छत्रपती शाहू महाराज, युवाशक्ती करिअर शिबीर शनिवार ( दि. २७ मे २०२३ ) रोजी, इंदापूर शहरातील शहा सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आले होते.
यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, तहसिलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी विजयकुमार परिट, पोलीस निरीक्षक दिलीप पवार, मुख्याधिकारी रामराजे कापरे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अतुल झगडे, पत्रकार रामदास पवार सोलनकर सर, नगरसेवक बाळासाहेब ढवळे, बी. के. सोनवणे, रामेश्वर माने, वॉलमाऊंटचे आर. चौगुले, ड्रीम फाऊंडेशनचे काशिनाथ भतगुणकी, पवार चॅरिटेबल ट्रस्टचे रामदास पवार, प्रा. डॉ. काशिनाथ सोलनकर, प्राचार्य डी. एन. गरगडे, जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी बी. आर.शिंपले व सचिन खामगळ आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार भरणे म्हणाले की, मी इयता पाचवीत असताना, कारखाना संचालक व्हावे असे वाटायचे. नंतर मी कारखाना अध्यक्ष झालो. घोलप साहेब यांच्याकडे पाहून बँकेचे संचालक होण्याचे ठरवले, त्यांनतर जिल्हा परिषद अध्यक्ष झालो. मंत्रालयात मला आमदारांची शिफारस मागितली म्हणून मी आमदार झालो. खरे तर लांबच्या गावाला देवाला जायची गरज नाही, आई वडिलांची सेवा करा, आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. सर्व काही मिळवता येऊ शकते यासाठी केवळ जिद्द व सकारात्मक विचार असणे आवश्यक आहे. असेही यावेळी भरणे म्हणाले.
यावेळी युवाशक्ती करिअर शिबिरामध्ये एकूण ५०० युवक युवतींनी सहभाग घेतला होता. त्यांना करिअर निवडीचे मार्गदर्शन मान्यवरांनी केले. तर ड्रीम फाऊंडेशन कडून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या ७५ मुलांना आर्थिक मदत करणार अशी ग्वाही ड्रीम फाऊंडेशनचे भतगुणकी यांनी दिली. युवकांच्या प्रतिसाद पाहून भविष्यात, पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नोकरी महोत्सव आयोजित करण्याचा मानस, ट्रस्टचे अध्यक्ष रामदास पवार यांनी व्यक्त केला. यावेळी तहसिलदार श्रीकांत पाटील, पोलीस निरीक्षक दिलीप पवार, प्राचार्य डी. एन. गरदडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पोलीस निरीक्षक दिलीप पवार म्हणाले, स्पर्धा परीक्षा देण्यासाठी तुम्हांला शालेय जीवनात भरपुर गुण असणे आवश्यक नाही, मात्र नंतरच्या काळात मात्र निरंतर अभ्यास केल्यास नक्कीच यश मिळते.

