अहमदनगर (जिमाका वृत्तसेवा) :
ॲप आधारित वाहनांच्या प्रवासी वाहतुकीसाठी नियमावली तयार करण्यात येत आहे. यासाठी नागरिकांनी २० मे २०२३ पर्यंत प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रत्यक्ष किंवा ई-मेल च्या माध्यमातून अभिप्राय सादर करावेत. असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.
केंद्र शासनाने ओला, उबर व इतर ॲग्रीगेटर्स कंपन्यांसाठी जारी केलेल्या ॲप आधारित मार्गदर्शक सुचना विचारात घेऊन ॲप आधारित वाहनांच्या प्रचलनासाठी नियमावली महाराष्ट्र शासन तयार करणार आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना www.morth.nic.in या संकेतस्थळावर जनतेकरीता उपलब्ध आहे.
सेवा निवृत्त अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र मोटार वाहन समुच्चक नियमावलीचा मसूदा तयार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे समिती स्थापन करण्यात आली आहे.
तरी याविषयी ज्यांना आपले अभिप्राय, मत सादर करावयाचे असतील, त्यांनी आपले मते, अभिप्राय (dycommr.enf1@gmail.com) या ई-मेल आयडीवर अथवा संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रत्यक्षरित्या २० मे २०२३ पर्यंत सादर करावेत. प्राप्त मते व अभिप्राय विचारात घेऊन सूचना अंतिम करण्याविषयी शासनातर्फे पुढील कार्यवाही करण्यात येईल.असे ही परिवहन विभागाने कळविले आहे.
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर

