शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सरकार विरोधात रस्त्यावर उतरणार - माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा इशारा.
आ. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते डिकसळ येथे विविध विकासकामांचे भुमिपूजन व उद्घाटन समारंभ संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: शिंदे-फडणवीस सरकार हे पुर्णपणे शेतकरी विरोधी असून या सरकारला शेतकरी वर्गाचे काहीही देणे-घेणे नाही,त्यामुळे या मगृर सरकार विरोधात संघर्ष अटळ असून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात रस्त्यावर उतरण्याचा इशारा माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी डिकसळ (ता.इंदापूर )येथे बोलताना दिला आहे.डिकसळ येथे विविध विकासकामांचे भुमिपूजन व उद्घाटन समारंभ श्री.भरणे यांच्या हस्ते पार पडला यावेळी ते बोलत होते.
श्री.भरणे म्हणाले की,आम्ही सत्तेत असताना महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोरोना सारख्या महामारीमुळे राज्याच्या महसुलामध्ये प्रचंड प्रमाणात घट झालेली असताना सुद्धा शेतकरी कष्ठक-यांना न्याय देण्याची भुमिका आम्ही घेतली होती.परंतु दुर्दैवाने महायुतीचे सरकार आल्यापासून शेतकरी बांधवांच्या पाठीमागे संकटांचे ग्रहण लागले आहे.
वीजबिल माफ करतो म्हणून मोठ-मोठ्या आणा-बाका करणारे आज वीजबिलावर अवाक्षर काढत नाहीत,ग्रामीण भागामध्ये विजेचा खेळखंडोबा झाला असताना सुद्धा हे सरकार याकडे कानाडोळा करत आहे.तसेच आमच्या काळामध्ये पाण्याचे योग्य नियोजन करत होतो,त्यामुळे उन्हाळ्यात देखील पाणीटंचाई जाणवत नव्हती.परंतु या सरकारने पाण्याचे नियोजन न केल्याने याचा खूप मोठा फटका इंदापूर तालुक्याच्या शेतीला बसला आहे.त्याचबरोबर मध्यंतरीच्या अवकाळीमुळे शेतीचे नुकसान झाले होते,त्याच्या मदतीचे सुध्दा अजून काहीच झाले नाही.
अशा अनेक अडचणींमुळे सध्या शेतकरी बांधव पुरता हवालदिल झालेला आहे.तरी या नाकर्ते सरकारला वठणीवर आणण्यासाठी तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांनी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल,यामध्ये तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमच्या सोबत आहे,हा विश्वासही आमदार भरणे यांनी शेतकरी बांधवांना दिला आहे.

