लातूर : प्रतिनिधी
संभाजी नगर येथे संपन्न झालेल्या सकल राजपूत समाज मेळाव्यात राजपूत भामटा जातीतून ‘भामटा’ शब्द हटविण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असून सदर घोषणेचा सामाजिक कार्यकर्ते भटक्या-विमुक्त समूहाचे अभ्यासक तथा वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष श्रीकांत मुद्दे यांनी निवेदनाद्वारे तीव्र शब्दात आपला निषेध नोंदवला आहे.
यावेळी श्रीकांत मुद्दे म्हणाले की, १८७१ च्या कायद्याने गुन्हेगार जमातीचा ठपका लागलेल्या जाती-जमाती आता कशातरी शिक्षण घेत आहे. डोंगर दऱ्यांतून बाहेर पडून परिश्रमाच्या बळावर मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी धडपड करणाऱ्या या विमुक्त जातीच्या आरक्षणामध्ये खोट्या कागदपत्राच्या आधारावर बोगस राजपूत भामटांनी घुसखोरी केली आहे. संविधानातील तरतुदीनुसार विमुक्त जातीच्या सवलतींवर फक्त विमुक्त जातीचाच अधिकार आहे. राजपूत व राजपूत भामटा या दोन भिन्न जाती आहे. नावातील साम्याचा फायदा घेत सवर्ण असलेल्या, कोणत्याही संविधानिक तरतुदीनुसार मागास नसलेल्या, श्रीमंत राजपूत जातीच्या मंडळींना विमुक्त जातीमध्ये मागील दाराने प्रवेश देण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप श्रीकांत मुद्दे यांनी केला आहे.
भामटा शब्द हटविण्याची मागणी खऱ्या राजपूत भामटांनी केलेली नाही. मागणी करणारे लोक राजपूत भामटा किंवा विमुक्त जाती प्रवर्गातील नाहीत. त्यांची जात मीना आणि काही सवर्ण राजपूत तथा परदेशी आहेत. त्यामुळे राजपूत भामटा या जातीतून ‘भामटा’ हा शब्द वगळल्यास सवर्ण राजपूत जातीला विमुक्त जातीच्या आरक्षण सवलती लाटता येणार आहे. ही अतिशय गंभीर बाब असून भामटा शब्द हटविल्यास त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील असा इशारा श्रीकांत मुद्दे यांनी विविध तालुका व जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांमार्फत पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.
दि.२२/०३/२३ रोजी महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार श्वेता महाले यांनी भामटा शब्द हटविण्याची मागणी केली होती. त्यानंतर विविध संघटनांनी हरकत घेतली आणि आक्षेप नोंदवला होता. त्याअनुषंगाने विधान परिषदेत आ.राजेश राठोड आणि विधान सभेत डॉ.तुषार राठोड यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, ‘‘प्रत्येक जातीची नोंद ही संविधानिक असते आणि त्यात कोणताही बदल करता येत नाही किंबहुना तसा बदल कोणीही कितीही काही केले तरी करता येत नाही.’’ हे सर्व विधीमंडळाच्या पटलावर नोंद घेऊन रेकॉर्डेड केले असतानाही १४ मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमुक्त जातीचे नुकसान करणारी राजपूत भामटा जातीतून भामटा शब्द वगळण्याची घोषणा संभाजीनगर येथे केली. असे झाले तर हा विमुक्त जातीतील घटक समूहांवर अन्याय होईल असेही यावेळी निवेदनात सामाजिक कार्यकर्ते भटक्या-विमुक्त समूहाचे अभ्यासक तथा वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष श्रीकांत मुद्दे यांनी सांगितले. याप्रसंगी लातूर जिल्हाध्यक्ष रमाकांत मुद्दे, सचिन वाडीकर, बालाजी भांडेकर, साहेबराव भांडेकर, दिनेश धोञे, रवी भांडेकर आदी उपस्थित होते.

