प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २८ / करमाळा शहरात एका कंपनीच्या नावाने बनावट रंग विक्री करत असल्याच्या संशय आल्याने करमाळा पोलिसांनी धाड टाकली. या दुकानातील बनावट रंगही ताब्यात घेण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली असून यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. घरासाठी वापरण्यात येणाऱ्या एका कंपनीचा बनावट रंग करमाळ्यात विक्री केला जात असल्याची माहिती संबंधित कंपनीला मिळाली होती. करमाळा शहरातील फुलसुंदर चौकात हे दुकान आहे. संबंधित कंपनीचे मुख्यालय हे मुंबईत आहे. संबंधित रंगाची तक्रार आल्यानंतर दिल्ली येथील पाच जणांच्या पथकाने याची शहानिशा केला. तेव्हा संबंधित रंग हा बनावट असल्याचे निदर्शनास आले असे या पथकाकडून सांगण्यात आले.
या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे पोलिस निरीक्षक गुंजवटे यांनी सांगितले आहे. मात्र या कारवाईमुळे रंग विक्रेत्यांमध्ये घबराटीचे वातावरण असून यामधील नेमका सूत्रधार कोण असेल याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

