shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ग्रामीण विनोदी साहित्यिक स्व. नामदेवराव देसाई


 मराठी ग्रामीण विनोदी साहित्यिक नामदेवराव देसाई म्हणजे गावगाड्यातील एक विनोदी शब्ददालनाचे जणू ज्ञानपीठ होते.त्याबद्दल मी (डॉ. बाबुराव उपाध्ये) त्यांच्या 81व्या वाढदिवसाच्यानिमित्ताने 04डिसेंबर 2020रोजी 'नामानिराळा 'हा गौरवग्रन्थ प्रकाशित केला. पत्रकार प्रकाश कुलथे, सौ.स्नेहलता कुलथे यांच्या स्नेहप्रकाश प्रकाशनतर्फे हा ग्रन्थ प्रकाशित झाला.त्यामध्ये अनेकांचे लेख आहेत. नामदेवराव देसाई याची खारघर येथील कन्या सौ. प्रीती शुभम घोगरे यांनी आपल्या वडिलांविषयी आठवणी सांगताना  लिहिले आहे, ते वाचनीय आहे, ते पुढीलप्रमाणे "आमचे दादा यांचे निधन झाले आणि आम्ही सर्व भावंडे  सैरभैर झालो. खरं तर आज अशाप्रसंगी त्यांच्या बद्दलच्या भावना, आठवणी लिहून देताना काळीज अक्षरशः जड झालेय.त्यांच्याबद्दल कितीही लिहिलं तर कमीच आहे.

आम्ही दादांना नेहमीच लोकांच्या घोळक्यात, घेरलेले बघितले आहे. ते जिथे जायचे तिथले वातावरण मिश्किल होऊन जायचे.दादांनी त्यांच्या आयुष्यात प्रेमाचे स्नेही खूप जमवले. ते नेहमी म्हणायचे "मी पैश्याने मोठा नाही पण समाजात मानाने मोठा झालो हिच माझी मोठी दौलत आहे" याबद्दल त्यांनी  कधीही लोकांमध्ये वावरताना गर्व केला नाही. कायम ते आपुलकीने आणि प्रेमाने च वागायचे. मला आठवते ते माझ्या लहानपणी श्रीरामपूरला  मेनरोडपासून शेवटच्या टोकापर्यंत जाईपर्यंत रामराम करताना त्याचा हात वरच असायचा आणि चहापाण्यासाठी लोक प्रेमाने त्यांना आग्रहने बोलवायचे. मला मोठी गंमत वाटायची.त्या काळात त्यांच्या खिश्यात कधीच 50 रुपयापेक्षा जास्त पैसे नसायचे. कधीही त्यांना तशी गरजच पडली नाही.
अशोकनगर, सोनाईला  असताना सतत लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्ते आणि पुढारी अशी मंडळी आमच्या घरी यायची. मग तर आम्हाला किस्से ऐकायची मेजवानीच असे. कधी कविता रंगायच्या, कधी शायरी, कधी अध्यात्मिक ग्रंथाचे दाखले तर कधी विनोदी किस्से, पण एकूणच काय तर चालते बोलते विद्यापीठ होते दादा. गप्पांच्या ओघात खूप काही शिकवून जायचे.
आईची आणि त्यांची केमिस्ट्री खूप भारी होती. आई भोळी भाबडी, हसतमुख, त्यांच्या वर अतिशय प्रेम करणारी. ती त्यांच्या लिखाणाची प्रेरणा च होती. आम्हा भावंडांना त्यांची आदरयुक्त भीती होती पण आम्ही अगदी मनमोकळेपणाने कुठल्याही विषयावर त्यांच्यासोबत गप्पा मारायचो. ते आम्हाला जीवनात कुठल्याही परिस्थितीत कसे जगायचे हे अनेक दाखले देऊन त्या त्या प्रसंगात खूप शिकवून जायचे. खरं तर आमचा विशाल वटवृक्ष होता आणि आम्ही त्यांच्या सावलीत निर्धास्त होतो.

12.06.23 रोजी ते अचानक आम्हाला पोरकं करून निघून गेले.हे दुःख पचवणे सोपे नाही पण आनंद ह्या गोष्टीचा वाटतो आता ते पुन्हा त्यांच्या लाडक्या सौ. कडे गेले आणि दोघेही आनंदाने आम्हाला तिथूनच आशीर्वाद देत आहेत.
त्यांच्या आठवणीचा ठेवा अंतःकरणात खूप जतन करून ठेवला आहे. त्याच्याच आधारे पुढील जीवनात वाटचाल राहील." हॆ एका संवेदशील मुलींचे मनोगत सदगदित करणारे आहे. 
 स्व.नामदेवराव दामोदर देसाई यांनी लिहिलेले 'पंचनामा '(1983), 'भ्रष्ठाचार कसा करावा? '(1997)हॆ त्यांचे ग्रामीण विनोदी कथासंग्रह अतिशय लोकप्रिय ठरले.त्यांनी 'आस्था 'चित्रपटात भूमिका केली. पु. ल. देशपांडे यांच्या 'तुझे आहे तुजपाशी 'या नाटकातील काकाजींची त्यांची भूमिका फार गाजली.त्यांनी लोकनाट्य लेखनही केले.अनेक वृत्तपत्रात पत्रकरिता केली.   शिक्षकही झाले, साखर कारखान्यात हेड टाईम किपर झाले.अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. आयोजक झाले.साहित्य परिषदा आणि मंडळाचे मार्गदर्शक झाले. जेष्ठ नागरिक मंडळात सहभागी झाले. शेती, शेतकरी, सर्वसामान्य माणूस हा त्यांच्या लेखणीचा विषय झाला.  हसवता हसवता त्यांनी वाचकांना अंतर्मुख केले.माणसांना जवळ करणारे एक देवमाणूस म्हणून त्यांचे संतपण मनात साठून आहे, 'रंगात रंगुनी रंग माझा वेगळा 'असे ते वेगळेच नि जीवननिरपेक्ष होते.सगळ्यांसाठी त्यांनी भरपूर केले,पण हात रिकामेच होते. श्रीरामपूरला शेवटी भाडे देऊन एका छोट्या खोलीत राहत होते.मोठेपणा त्यांनी खूप पाहिला, अनुभवला पण ते जमिनीवरच राहिले.सौ. जयश्रीताईंचे निधन झाले नि ते एकाकी झाले. मुलगा नितीन यांच्या आग्रहाने ते कोळगावला गेले. मधल्या काळात त्यांनी जीवावरचे दुखणे अनुभवले पण दुर्दम्य इच्छाशक्ती आणि परिवाराचे उत्कट प्रेम यामुळे त्यांनी दुःखावर विजय मिळविला होता. परंतु सोमवारी 12जून2023ला ते रात्री एक वाजता सर्वांना सोडून गेले.झाले बहु, होतील बहु पण नामदेवरावांसारखे विनोदवीर होणे कठीण आहे, जगाला हसवता हसवता ते जगायला शिकवून गेले, त्यांच्या चरणी ही शब्दफुले अर्पितो !

=डॉ. बाबुराव उपाध्ये, श्रीरामपूर 
भ्रमणसंवाद  9270087640

*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

close