प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. १४/ दोन धर्मात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट केल्याप्रकरणी करमाळा पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी तत्काळ असे मेसेज करणाऱ्यांवर कारवाई केली. अशा वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर कोणालाही पाठीशी घातले जाणार नसून कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी दिला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यामध्ये एकजण पोस्ट करणारा आहे तर दुसरा संबंधित ग्रुपचा ऍडमीन आहे. या प्रकारानंतर करमाळ्यात अनेक ग्रुपवर ‘ओन्ली ऍडमिन’ सेटिंग करण्यात आली असल्याचे दिसत आहे. करमाळ्यात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टवर पोलिसांचे बारीक लक्ष आहे. यातच एका ग्रुपवर गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीने दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होईल अशी पोस्ट केली होती. संबंधित माहिती करमाळा पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली तेव्हा संबंधित ग्रुपच्या ऍडमिनने देखील ही पोस्ट डिलीट केली नाही त्यामुळे हा कलम ५०५(२) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक चंद्रकांत ढवळे यांनी यामध्ये फिर्याद दिली आहे.

