प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी* :-
केज तालुक्यातील पैठण येथे सेंद्रिय शेती विषयक मार्गदर्शन बैठक मंगळवार रोजी घेण्यात आली.यावेळी विविध गट नोंदणी करण्यात आली.
कृषि विभागाच्या आत्मा चे उमेश माळी , योगेश पाटील
,पानी फाउंडेशन चे विनोद ठोंबरे,पर्यावरण मित्र डॉ हनुमंत सौदागर,सरपंच पुत्र रुस्तुम चौधरी,पत्रकार मनोराम पवार यांच्यासह कानडीबदन, आनंदगाव, पाथरा, सावळेश्वर, पैठण आदी गावातील शेतकरी उपस्थित होते.
कृषी विभागाच्या कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा च्या माध्यमातून परंपरागत कृषि विकास सेंद्रिय शेती योजना राबविली जात आहे आता ही योजना व्यापक पध्दतीने राबविली जाणार असल्याची माहिती आत्माचे बीड प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांनी दिली .राज्यातील शेतीक्षेत्रात रासायनिक खतांचा असंतुलित वापर, तसेच कीटकनाशकांचा अतिप्रमाणात आणि अनावश्यक वापर रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला मोठ्या प्रमाणावर चालना देण्यात येत आहे. त्यानुसार सेंद्रिय शेती-विषमुक्त शेतीसाठी चालना देण्यात येणार आहे
परंपरागत कृषि विकास योजनेच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीच्या प्रसारासोबतच त्यातील शेतमालाच्या वितरणासाठी व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. यामुळे विषमुक्त फळे, भाजीपाला आणि अन्नधान्य उपलब्ध होणार आहेत .सेंद्रिय शेतीसाठी कमी खर्चाचे तंत्रज्ञान विकसित करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, पिकांचे अवशेष वापरून शेतातच सेंद्रिय शेती निविष्ठा तयार करण्याची प्रणाली विकसित करणे, ही प्रणाली सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने तयार करून इतरत्र प्रसारित करणे, राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार सेंद्रिय निविष्ठा योग्य पद्धतीने वापरण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध करणे, सेंद्रिय शेतमालाच्या वितरणासाठी बाजारपेठ आणि स्वतंत्र विक्री व्यवस्था निर्माण करणे, सेंद्रिय शेतमालाच्या निर्यातीस प्रोत्साहन देणे, सहभाग हमी पद्धतीने सेंद्रिय शेतीचे गट प्रमाणीकरण करून घेणे आदी उद्दिष्टे या योजनेची असणार आहेत,शेतीमध्ये रासायनिक खतांचा असंतुलित वापर तणनाशके-कीटकनाशकांच्या अतिवापरामुळेही जमिनीची सुपिकता कमी झाली आहे. या साऱ्यांचा परिणाम म्हणून उत्पादित शेतमालात आरोग्यास अपायकारक अशा रासायनिक घटकांचे प्रमाण वाढून त्याचा मानवी आरोग्यावर अतिशय विपरीत परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांचा जैविक शेतीतून उत्पादित होणाऱ्या उत्पादनांकडे वाढता कल आहे.
परदेशातूनही अशाच फळपिकांना मागणी आहे. त्यातून सेंद्रिय (जैविक) शेतीची गरज मोठ्या प्रमाणावर भासू लागली आहे.
या योजना अंतर्गत केज मध्ये सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची उत्पादक कंपनी देखील नोंदणी करण्यात येत आहे तालुक्यात एकाच गावात कमीतकमी 20 शेतकऱ्यांचा 50 एकरचा एक गट या प्रमाणे गट तयार करण्यात आले असून त्याचे प्रशिक्षण घेण्यात आले असून सभोवतालच्या 7-8 गावात मिळून वरील प्रमाणे 25 गटांची नोंदणी करण्यात येणार असून त्याची शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली जाईल ,एका शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 1 हेक्टर पर्यंत लाभ दिला जाईल व सहभागी सर्व शेतकऱ्यांना लागवड ते काढणीपर्यंत किमान 3 प्रशिक्षण दिले जाणार ,सेंद्रिय शेती साठी लागणाऱ्या सर्व निविष्ठा कशा तयार कराव्यात याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीस शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे आभार शाहीर मधुकर कदम यांनी केले.

