श्रीरामपूर प्रतिनिधी:
राज्य सरकारच्या राज्य अधिस्वीकृती समितीवर पत्रकार प्रकाश कुलथे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सायंकाळी ही निवड जाहीर केली.समितीवर दुसऱ्यांदा निवड झालेले कुलथे हे नाशिक विभागातील एकमेव पत्रकार ठरले आहेत.
पत्रकार कुलथे हे शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीच्या विश्वस्तपदी कार्यरत आहेत. जिल्ह्यातील अनेक पत्रकारांना त्यांनी कल्याण निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत केली आहे. विशेषतः कोरोना काळात पत्रकारांवर आलेल्या संकटात कुलथे यांनी वैद्यकीय उपचारांना मदत मिळवून दिली आहे. त्यामुळे कुलथे यांच्या या निवडीचा जिल्ह्यातील पत्रकारांना आगामी काळात विशेष लाभ होणार आहे.
श्रीरामपूर पत्रकार संघाचे ते सचिव म्हणून काम पाहत आहेत. महाराष्ट्र संपादक परिषदेचे (मुंबई) कुलथे हे कार्याध्यक्ष आहेत. नाशिक येथील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर लाड सुवर्णकार संस्थेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. या सर्व संघटनांवर कुलथे यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना राज्य अधीस्वीकृती समितीवर स्थान मिळाले आहे.
त्यांच्या निवडीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महासंचालक ब्रिजेश सिंह, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, माहिती उपसंचालक ज्ञानेश्वर इगवे, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे. स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख यांच्यासह अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकारांनी या नियुक्तीचे स्वागत केले आहे.तथा पत्रकारीता क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संकलन:
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111

