उजनी पाणलोट क्षेत्रात 3 तर भांडगाव मध्ये एका बुडीत बंधाऱ्यास मंजुरी द्यावी - हर्षवर्धन पाटील
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
फोटो:- मुंबईत उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांचेशी हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील विकास कामांच्या निधीबाबत गुरुवारी चर्चा केली.
इंदापूर : प्रतिनिधी दि.29/7/23
उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये कुंभारगाव, डाळज नं.1, कालठण नं.1 असे 3 व भांडगाव मध्ये भीमा नदीवर 1 या प्रमाणे इंदापूर तालुक्यात एकूण 4 बुडीत बंधारे बांधण्यास मंजुरी द्यावी. तसेच भाटनिमगाव येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधी द्यावा, अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे मुंबईत गुरुवारी (दि.27) निवेदन देऊन केली व या संदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
इंदापूर तालुक्यामध्ये उजनी पाणलोट क्षेत्राच्या परिसरातील हजारो एकर शेती तसेच गावो-गावच्या नळ पाणीपुरवठा योजना ह्या उजनीच्या पाण्यावरती अवलंबून आहेत. अलीकडच्या काळात उन्हाळ्यामध्ये धरणाच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत असल्याने शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने कुंभारगाव, डाळज नं.1, कालठण नं.1
या गावांमधील पाणलोट क्षेत्रामध्ये बुडीत बंधारे बांधण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी निवेदनात केली आहे.
तसेच भीमा नदीवर भांडगाव येथे प्रसिद्ध म्हसोबा देवस्थान असल्याने तेथे महाराष्ट्रातून भाविकांची वर्षभर ये-जा असते. शिवाय या परिसरातील शेतकऱ्यांना भीमा नदीच्या पाण्यावरती अवलंबून राहावे लागत आहे, त्यामुळे भांडगाव येथे भीमा नदीमध्ये बुडीत बंधारा बांधण्यासाठी मंजुरी मिळावी, अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री व जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बुडीत बंधाऱ्यांच्या मागण्या संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश जलसंपदाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
• चौकट :-
======
भाटनिमगाव बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधीची मागणी
------------------------------------------------
भीमा नदीवरती भाटनिमगाव येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्याची पडझड झाल्याने त्यातून पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे बंधाऱ्या मध्ये पाणीसाठा अधिक काळ राहत नसल्याने उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना व जनतेला पाणीटंचाईचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे भटनिमगाव बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी जलसंपदा विभागाने निधी मंजूर करावा, अशी मागणी यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केली.
____________________________

