अहमदनगर :- नगर तालुक्यातील देहरे येथे दि.२१ रोजी वै.हभपश्री सखाराम सिताराम जेठे महाराज यांचे बद्रीनाथ धाम (उत्तराखंड) येथे दर्शन घेतल्यानंतर निधन झाले.त्याप्रयोजनार्थ आनंदमाई संस्थान देहरे येथे हभप शिवाजी महाराज देशमुख यांचे हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.
हभप श्री सखाराम महाराज जेठे यांनी आयुष्यभर अध्यात्मिक व सामाजिक कार्य केले. त्यांनी तीन लक्ष एकावन्न हजार राम नाम जप करुन वहीत नोंदविले होते.तसेच अनेक प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये प्रत्यक्ष जाऊन समाजसेवा, देशसेवा, ईश्वरसेवा, आई वडीलांची सेवा,गोसेवा,सुसंस्कारीत कसे घडावे याविषयी प्रबोधन केल्यानंतर सुमारे चारशे शाळांनी त्यांना सही शिक्यासह प्रमाणपत्र दिले आहेत तसेच अभंग,गवळणी, ओव्या व सुमारे तीनशेच्यावर कविता लिहिल्या आहेत.
जेठे महाराजांंनी निस्वार्थ भावनेने समाजसेवा व ईश्वरसेवा केली.त्याचप्रमाणे पुर्ण भारत भ्रमण करुन अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिल्या आहेत.तसेच जगन्नाथपुरी,रामेश्वरम,द्वारका या तीन धामांचे दर्शन घेतले होते.चौथे धाम बद्रीनाथांचे दर्शन राहिल्यामुळे ते बद्रीनाथांचे दर्शन घेण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांनी विशाल बद्रीनाथांचे दर्शन घेऊन यात्रेकरूच्या माध्यमातून कुटुंबियांना फोटो पाठवले होते.
बद्रीनाथ धाम येथे दर्शनाचे वेळी सोबतचे यात्रेकरूं बरोबर काढून पाठवलेले जेठे महाराजांचा अखेरचा फोटो..!
त्यानंतर दर्शन घेतल्यानंतर काही तासातच जेठे महारांजांचे बद्रीनाथ धाम येथे निधन झाले..त्यांचा अंत्यविधी उत्तराखंड येथील पवित्र तीर्थक्षेत्र विष्णुप्रयाग येथील अलखनंदा व ढौली गंगा संगमावर करण्यात आले.
यानंतर कुटुंबियांच्यावतीने उदकशांती पूजना निमित्त तीर्थक्षेत्र नेवाशाचे संत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे मठाधिपती हभप श्री शिवाजी महाराज देशमुख यांचे हरिकीर्तनाची सेवा पार पडली.
यावेळी देशमुख महाराज यांनी आपल्या सुश्राव्य वाणीतून गोसेवा,देशसेवा,समाजसेवा याविषयी अनेक दाखले देऊन निरूपण केले.
यावेळी महाराष्ट्रातील अनेक दिग्गज मंडळी,जिल्हयातील पंचक्रोशीतील भाविक भक्त, देहरे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

