मत्स्य विभागाची सात वर्षात पहिल्यांदाच कारवाई
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
इंदापूर: दि. १६ / इंदापूर तालुक्यात अनेक वर्षापासून चालू असलेल्या मांगुर माशाची तस्करी करणाऱ्यांवर मत्स्य विभागाकडून पहिल्यांदाच कारवाई करण्यात आली. शासनाची बंदी असलेल्या मांगुर माशांची तस्करी करणाऱ्या मांगुर चोरांच्या टेम्पोवर (गाडी नं. MH 42 BF 5995) पोलिसांनी काल कारवाई केली. शासनाची बंदी असलेल्या मांगुर माशांची चोरटी वाहतूक होत असलेल्या टेम्पोची माहिती मिळाल्यानंतर इंदापूर पोलिसांनी राजवडी येथील पुलाजवळ टेम्पो ताब्यात घेतला व त्यानंतर इंदापूर येथील डम्पिंग ग्राउंड येथे खड्डा करून मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय पद्धतीने दोन ते तीन टन मांगुर साठा नष्ट करण्यात आला. टेम्पो चालक व मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी टेम्पो मालकाचे नाव सध्या तरी गुलदस्त्यात ठेवले असले तरी सदरचे वाहन राजकीय वरदहस्त असणाऱ्या कालठण परिसरातील एका मोठ्या मांगुर तस्कराचे असल्याचे बोलले जात आहे.
इंदापूर हे मांगुर उत्पादन व वाहतूक करणारे सर्वात मोठे ठिकाण आहे. गेल्या दहा वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांमार्फत याविषयी आवाज उठवला जात होता. परंतु मत्स्य विभागाची यापूर्वीची भूमिका संशयास्पद होती. किरकोळ मांगूर उत्पादकांवर कारवाईचा फार्स केला जात होता व राजकीय वरदहस्ताने लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या बड्या धेंडावर कारवाई करण्याचे धाडस प्रशासनाने आजपर्यंत दाखवले नव्हते त्यामुळे मांगुर तस्करी करणारांची सामान्य नागरिकांना दमदाटी करण्यापर्यंत मजल गेली होती. पोलिसांनी गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच मांगुर वाहतूक करणाऱ्या गाडीवर कारवाई केलेली आहे त्यामुळे "देर आये दुरुस्त आये" या उक्तीप्रमाणे सामान्य लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतु ही कारवाई एवढ्यावरच न थांबता येणाऱ्या काळामध्ये उत्पादन व वाहतूक करणाऱ्या मांगुर तस्करांवर ठोस कारवाई करून मांगूर उत्पादन पूर्णपणे बंद झाले पाहिजे असे सामान्य लोकांचे म्हणणे आहे.
मांगुर उत्पादनाचे केंद्र व सर्व ठावठिकाणे मत्स्य विभाग व पोलिसांना ठाऊक असल्याचे बोलले जात आहे. मत्स्य व्यवसाय विभाग व पोलीस खाते यांच्या बोटचेपी धोरणामुळे मांगुर तस्करी करणाऱ्या गावगुंडांची मुजोरी वाढलेली आहे. मांगुर उत्पादनासारख्या शासन विरोधी कृत्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांवर मांगूर चोरांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मांगुर उत्पादनाविरुद्ध आवाज उठवतो म्हणून कालठण येथील एका युवकाला राजकीय वरदहस्त असणाऱ्या मांगुर तस्करी करणाऱ्या गावगुंडाकडून यापूर्वी मारहाण देखील झाली होती परंतु सदरचे प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत न जाता गाव पातळीवरच मिटवण्यात आलेले होते. पोलीस खात्याकडून मांगुर तस्करांच्या मुसक्या कायमच्या आवळल्या जाणार का याकडे सामान्यांचे लक्ष लागले आहे.

