आहो महापौरताई, आम्हा महिलांची कुचंबना कधी थांबणार ?, महिलांचा संतप्त सवाल
नगर / प्रतिनिधी :
नगर : १२ / स्वच्छता अभियानातील पुरस्कार प्राप्त अहमदनगर मनपाच्या अस्वच्छतेची पोलखोल महिला काँग्रेसच्या रणरागिनींनी केली आहे. मध्यवर्ती बाजारपेठेत असणाऱ्या एकमेव स्वच्छता गृहाच्या अस्वच्छतेचे स्टिंग ऑपरेशन महिलांनी केले. यावेळी स्वच्छतागृहाची झालेली पडझड, अस्वच्छता, पाणी नसणे, घुशींचा सुळसुळाट, दुर्गंधी अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत.
मध्यवर्ती बाजारपेठेमध्ये गंज बाजारात महिलांसाठी केवळ एकच स्वच्छतागृह असून एका वेळी दोन महिलांनाच उपयोगी येईल एवढे छोटे आहे. त्याचीही दयनीय अवस्था आहे. महापालिकेच्या महापौर महिला आहेत. ५० % नगरसेविका महिला आहेत. तरिही महिलांची कुचंबना सुरू आहे. ती कधी थांबणार, असा जाहीर सवाल यावेळी महिला काँग्रेसने केला आहे.
शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या संकल्पनेतून "राईट टू पी - स्वच्छतागृहाचा अधिकार" या मोहिमेअंतर्गत शहरातल्या महिला, युवतींना स्वच्छ, सुरक्षित व मोफत स्वच्छतागृह मिळावेत यासाठी चळवळ उभी केली जात आहे. पहिल्या टप्प्यात शहराच्या विविध भागातील स्वच्छतागृहांची पाहणी महिला काँग्रेसने सुरू केली आहे. या मोहिमेला महिलांसह पुरुषांचा देखील पाठिंबा मिळत आहे. महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षा उषाताई भगत, ब्लॉक अध्यक्ष पूनमताई वनंम, शहर जिल्हा उपाध्यक्ष राणीताई पंडित, सुनीताताई भाकरे, रेखाताई जाधव आदींसह महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी झाल्या आहेत.
या स्टिंग ऑपरेशनमध्ये अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. उषाताई भगत म्हणाल्या की, बाजारपेठेत अनेक व्यापारी अस्थापना, दुकाने, शोरूम आहेत. तसेच भाजीवाले, फेरीवाले देखील आहेत. दुकानांमध्ये काम करणाऱ्या महिला कामगारांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे. बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी महिला आपल्या लहान मुलांसह दररोज येतात. एमजी रोड, कापड बाजार, मोची गेली, सारडा गल्ली, गंज बाजार, सराफ बाजार, आडते बाजारसह बाजारपेठेमध्ये महात्मा फुले, भाजी मंडई या परिसरात केवळ एकच स्वच्छतागृह आहे. ते अस्वच्छ असल्याबाबत भगत यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
राणीताई पंडित म्हणाल्या की, बाजारपेठेमध्ये आम्ही केलेल्या सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले आहे की, दिवसभरात सुमारे साडेतीन ते चार हजार महिला दररोज या स्वच्छतागृहाच्या वापरासाठी येत असतात. मात्र इथली दुर्गंधी पाहून त्यांना तसेच परतावे लागते. यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आतमध्ये लाईट नसल्यामुळे अंधार आहे. त्यामुळे महिलांना भीती वाटते. पुनमताई वनंम म्हणाल्या की, महिला स्वच्छतागृहाची वास्तू ही सुरक्षित असली पाहिजे. मात्र इथे वास्तुचीच पडझड झालेली आहे. संडासच्या भांड्यातून खालून घुशी वर येतात. महिलांना अक्षरशः नाकाला पदर लावून या ठिकाणी जावे लागते. सुरक्षा नसेल तर महिलांनी स्वच्छतागृहाचा वापर कसा करायचा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
सुनिताताई भाकरे म्हणाल्या की, इथे पाण्याची सुद्धा सोय नाही. बाहेरून पाणी घेऊन जावे लागते. बऱ्याचदा तर पाणी सुद्धा नसते. मनपाने या ठिकाणी ठेकेदार नेमलेला नाही. खाजगी व्यक्ती या ठिकाणी काम करत असून वापरासाठी पाच ते दहा रुपयांचे शुल्क आकारले जाते. महिलांना मोफत स्वच्छतागृह उपलब्ध करून देणे ही मनपाची जबाबदारी आहे. पण ते निभावत नाही. शहराच्या महापौर महिला आहेत. अनेक पक्षांच्या अनेक महिला नगरसेविका आहेत. मात्र कोणीच यावर कधी महासभेत आवाज उठवला नाही. हे दुर्दैव आहे. काँग्रेस मात्र यासाठी चळवळ उभी करत असून महिलांना त्यांचा अधिकार मिळवून देण्यासाठी आम्ही मनपाकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे महिला काँग्रेसने म्हटले आहे.
पुरुष कामगार, व्यापाऱ्यांची ही मागणी -
यावेळी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी पुरुषांच्या स्वच्छ्तागृहासाठी देखील आवाज उठवण्याची मागणी केली. पुरुषांच्या स्वच्छतागृहाची देखील हीच दुरावस्था असल्याचे गाऱ्हाणे व्यापाऱ्यांनी व दुकानांतील पुरुष कामगारांनी यावेळी मांडले. किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली बाजारपेठेतील विविध प्रश्नांसंदर्भात मनपा आयुक्तांची लवकरच भेट घेतली जाणार असून त्यावेळी एकत्रितरित्या सर्व प्रश्न आम्ही मांडू, असे आश्वासन यावेळी महिला काँग्रेसने दिले.

