श्रीरामपूर प्रतिनिधी:
ऑगस्ट महिना निम्मा सरला तरी लाभक्षेञात पाऊस नसल्याने ऊसासह, शेतातील उभी खरीपाची पिके सुकू लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. अशा स्थितीत भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असून शेतातील उभ्या पिकांना जीवदान देण्यासाठी प्रवरा डावा व उजव्या कालव्यांना पाणी सोडून तातडीने शेतीसाठी आवर्तन घ्यावे आणि पिकांना जीवदान द्यावे, या मागणीसाठी लोकसेवा विकास आघाडीच्यावतीने शुक्रवार ता.१८ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १ वा. माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयावर श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांचा मोर्चा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती अध्यक्ष हिंमतराव धुमाळ यांनी दिली.
याबाबत माहिती देताना श्री.धुमाळ म्हणाले की, राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस होत असताना भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रात माञ दोन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. यामुळे अद्यापही खरीपाच्या पेरण्या झाल्या नाहीत. पावसाअभावी खरीप हंगाम जवळपास वाया गेल्यासारखा आहे. काही तुरळक भागात पेरण्या झाल्या पण उतरलेली कपाशी, सोयाबीन, भाजीपाला पिके माना टाकू लागली आहेत.
शेतक-यांनी उन्हाळ्यात मोठ्या मेहनतीने जगविलेली ऊसासह अन्य पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. अनेक दिवस पाऊस नसल्याने विहिरी व बोअरवेलही कोरडे पडू लागले आहेत. यामुळे आणखीनच भयानक स्थिती निर्माण झाली आहे. सुदैवाने भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरण भरले आहे. अशा स्थितीत धरणातून शेतीसाठी प्रवरा डावा व उजव्या कालव्यांना पाणी सोडून आवर्तन घेवून पिकांना जीवदान देवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने माजी आ.मुरकुटे यांचे नेतृत्वाखाली शुक्रवार दि.१८ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १ वाजता मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी श्रीरामपूर रेल्वे स्टेशनजवळील हनुमान मंदिर येथे उपस्थित रहावे, असे आवाहन श्री.धुमाळ यांनी केले आहे.
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क श्रीरामपूर - *9561174111

