जिल्ह्यातील दलित संघटना संतप्त
सहांपैकी दोघा आरोपींना अटक
श्रीरामपूर प्रतिनिधी:
तालुक्यातील हरेगाव येथील चार मागासवर्गीय युवकांना अर्धनग्न करून आणि झाडाला उलटे टांगून अमानुष मारहाण केल्याप्रकरणी श्रीरामपूर पोलिसांनी सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोन आरोपींना शनिवारी रात्री अटक करण्यात आली आहे. गुरुवारी घडलेली या घटनेचा व्हिडीओ सोशल माध्यमात व्हायरल झाल्यानंतर येथील वातावरण तणावपूर्ण बनले होते.
या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी शुक्रवारी हरेगाव बंद ठेवून घटनेचा निषेध करीत आरोपींना ऊ अटक करून कठोर कारवाईची मागणी केली होती. पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, दलित संघटनांचे कार्यकर्ते आदींनी रुग्णालयाला तातडीने भेट दिली.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी घटनेचा तपशील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. सहा आरोपींपैकी पप्पू पारखे आणि दीपक गायकवाड या दोघांना अटक करण्यात आली आहे. "पोलिसांना तातडीने कारवाईचे आदेश दिले असून गृहमंत्री फडणवीस यांनी लक्ष घातले आहे. त्यामुळे नागरिकांनी संयम पाळावा आणि बंद करू नये," असे आवाहन पालकमंत्री ना.विखे यांनी केले आहे.
*नेमका हा काय प्रकार आहे?*
गुरुवार दि.२५ ऑगस्ट सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हरेगाव येथील चार मागासवर्गीय तरुणांना शेळी आणि चार कबुतरे चोरल्याच्या संशयावरून हरेगाव-उंदीरगाव शिवारात युवराज नाना गलांडे, मनोज बोडखे, पप्पू पारखे, दीपक गायकवाड, दुर्गेश वैद्य, राजू बोरगे यांनी शेतातील विहिरीकडे नेले. तिथे त्यांना अर्धनग्न करून हात-पाय बांधून उलटे टांगून अमानुषपणे मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सायंकाळी समाज माध्यमावर व्हायरल झाला. त्यानंतर दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
अमानुष मारहाण झालेले चारही मुलांना तातडीने साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, प्रभारी उपअधीक्षक संदीप मिटके,श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, तालुका पोलीस स्टेशनचे दशरथ चौधरी आदींनी घटना स्थळी धाव घेतली आणी तात्काळ तपासचक्रे फिरवत सहापैंकी दोघांना अटक केली पुढील तपास श्रीरामपूर पोलिस करत आहे.
सहयोगी:दीपक कदम- श्रीरामपूर
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

