आदरणीय अण्णा ....
तुमच्या विचार ,आचार व कार्याने बहुजन समाज ज्ञानी झाला आहे..याची जाणीव सदोदित ठेवून गावागावात आधुनिक शिक्षण देणे आवश्यक आहे. आज या धर्मांध वातावरणात तुमचा समतेचा बंधुता हा विचारच देशाला उपयुक्त आहे..देश आणि परदेशात मुलांना पाठविण्यासाठी तळमळ करणारे मन सर्वांस लाभायला हवे. नाटकी ,पाखंडी प्रवृत्ती आज बहुजनाना शिक्षणापासून वंचित करत धर्मांधता पसरवीत आहेत.या काळात तुमचा देश भावना जपणारा ,सर्वांस एकत्र ठेवणारा ,सत्यशोधक ,बहुजन हिताय मार्ग खूप डोळस बनविणारा आहे..विषमता वाढत असताना ,खाजगी करण होत असताना माणसांच्या कष्टाला संधी देणारा ,शिक्षण वाढविणारा,न्याय देणारा विचार आवश्यक आहे...विचार इथे आहेत पण लोक प्रतिनिधी त्या तळमळीचे असण्याची गरज आहे.
स्वाभिमान विकून केवळ स्वार्थ साधण्याची मनीषा बाळगणारे प्रतिनिधी इतरांची दुःखे नीट समजून घेत नाहीत..ज्ञानी निर्व्यसनी आणि कार्यशील लोक प्रतिनिधी, मुक्तिदाते यांची तळमळ घेऊन काम करणारे लोक प्रतिनिधी समाजात कधी निर्माण होतील ? प्रश्न आहेत. शिक्षणात लोकशाही जागरूक करणे ,नीतिमत्ता तयार करण्याची खूप गरज आहे. आर्थिक कारणाने अनेक प्रतिभा करपून गेल्या आहेत. नोकरीसाठी फिरणारे तरुण तरुणी यांची एक दोन पिढया बरबाद झाल्या आहेत. स्वप्ने खूप आहेत,भपका खूप आहे पण प्रत्यक्ष अनुभव वेगळा आहे. सुशिक्षित बेकार ,कंत्राटी कामगार ,तासिका तत्त्वावर काम करणारे,यांचे भवितव्य काय असू शकेल? आर्थिक टंचाईने मोडलेले संसार घेऊन काही जण आपण जगायचे म्हणून जगत आहेत . ही विषमता कधी जाईल हा प्रश्न आहे.. देशात काम देणे शक्य नसेल तर परदेशात काम करायला पाठवा..प्रशिक्षण द्या..देशातच सर्वांस काम,शिस्त,शिक्षण देण्याची गरज जाणवत आहे. पात्रता असूनही चरकात पिळले जाणारे अनेक जण आहेत.
याही परिस्थितीत कमवा आणि शिका , विचार जतन करून स्वावलंबी बनवले जात आहे.. देशात ज्यांच्याकडे पैसा आहे ते संधी मिळवून पुढे जात आहेत. ज्यांच्याकडे कौशल्य आहे पण भांडवल नाही अशा लोकांची कुचंबणा आपण पाहत आहोत. कर्मवीर यांचा विचार निराशा झटकून हिम्मत देणारा आहे. नैतिक ,आहे.लाथ मारेन तिथे पाणी काढीन असा आहे. देश घडविणारा आहे ,आधुनिक आहे,आशावादी आणि उत्साह वाढवणारा आहे. पुढे जाण्याची प्रेरणा देणारा आहे. मातीला किंमत प्राप्त करून देणारा आहे. माणुसकी निर्माण करणारा आहे. असत्य नाकारून सत्याचा प्रकाश देणारा आहे. सेवाभाव. जोडणारा आहे. देश हितकारक असा आहे. आणि मुख्य म्हणजे गरीब पददलित यांच्या कल्याणाचा आहे. वैज्ञानिक दृष्टी देणारा आहे.शेतीचे जीवन घडविणारा आहे. रयत सेवक निर्माण करणारा आहे. आपुलकी आणि सद्भावना निर्माण करणारा असा आहे. रचनात्मक विधायक काम करणारा आहे. अण्णांच्या मनातला विचार प्रश्न सोडविणारा असा खंबीर आहे. ..ही प्रेरणा आयुष्यभर आमच्या मनात राहू दे ..आपल्या छोट्या आयुष्यात छोटे कार्य तरी करूया
प्रा.डॉ.सुभाष वाघमारे
मराठी विभाग प्रमुख
छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा
9890726440

