अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा:
शासनाच्या कौशल्य विकास योजनेचा प्रचार करण्यासाठी रविवार दि. १७ सप्टेंबर २०२३ रोजी पी.एम.स्कील रन या मॅरेथॉन स्पर्धेचे जिल्ह्यातील १६ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये सकाळी ७ ते ८ च्या दरम्यान आयोज करण्यात आले आहे.
या मॅरेथॉन दौडमध्ये सुमारे २००० विद्यार्थी, पालक, अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत. कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केलेले असून, कौशल्य प्रशिक्षणाबाबत व्यापक जनजागृती करणे, कौशल्याला सन्मान, समृध्दी प्राप्त व्हाही यासाठी या स्पर्धेचे आयोजन केलेले असून या स्पर्धेत वय वर्षे १६ व त्यापुढील वयाच्या विर्द्यार्थ्यांना यात सहभाग घेता येईल. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी क्यु.आर.कोड स्कॅन करुन किंवा https://runforskill.globalsapio.com/ या लिंकवर नाव नोंदणी करता येईल. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही. तसेच स्पर्धेकरीता पाच कि.मी. लांबीचे अंतर ठेवण्यात आलेले असून या स्पर्धेतील विजेत्या पुरुष व महिला यांना प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे रु.३०००/- , रु.२०००/- व रु. १०००/- रकमेची रोख बक्षीसे त्या त्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मान्यवरांच्या हस्ते देण्यात येतील.
याच उपक्रमाचा भाग म्हणुन जिल्हास्तरीय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अहमदनगर येथील स्पर्धेचा मार्ग अहमदनगर क्लब (भुईकोट किल्ल्याजवळ) स्टेट बँक चौक - चांदणी चौक- नगर कॉलेज - मार्केट यार्ड चौक- माळीवाडा बसस्टॅण्ड - इंपिरियल चौक- चाणक्य चौक ते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अहमदनगर असा निर्धारीत आहे.
या मॅरेथॉन दौड उपक्रमामध्ये जिल्ह्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये जास्तीत जास्त तरुणांनी सहभाग घ्यावा असे आवाहन एस.डी. शिंदे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, अहमदनगर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

