प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी:-
मराठवाड्यातील प्राचीन साहित्य परंपरा अंबाजोगाईच्या आदयकवी मुकुंदराज यांच्या विवेक सिंधु या काव्य ग्रंथा पासून सुरू झाली.म्हणजेच महाराष्ट्रातील मराठी भाषेची पायाभरणी मराठवाड्यात झाली हे विशेष होय.मराठवाडयातील संत नामदेव, संत जनाबाई, संत गोरोबा काका, संत एकनाथ,संत रामदास इतर कवी या बालाघाटातील प्रदेशात होवुन गेले.भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर बरोबर एका वर्षाने म्हणजे 17 सप्टेंबर 1948 ला मराठवाडा निजामाच्या राजवटीतुन मुक्त झाला.तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेलांच्या नेतृत्वाखाली व स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासह सर्व नेत्यांनी रझाकारशी लढा दिला.
मराठवाड्याने जवळ जवळ दोनशे वर्षं वेगवेगळ्या निजामाच्या जुलमी राजवटीतुनही आपले संयमी, स्वाभिमानी विचार पेरलेले दिसून येतात.मराठवाड्यातील नरहर कुरुंदकर ,बी.रघुनाथ,त्रंबक आसरडोहकर,यु.म.पठाण,रा.रं.बोराडे, इंद्रजित भालेराव, अनुराधा पाटील, लक्ष्मीकांत तांबोळी, भगवान देशमुख इत्यादींनी मराठवाड्याचे वर्णन पद्य व गद्य साहित्यातुन केले आहे.
पुणे येथील कवी चंद्रकांत वानखेडे यांच्या माय मराठी दिवाळी अंकात केज येथील डॉ.बी.जे.हिरवे यांची मराठवाडा ही कविता वाचनात आली.
डॉ.हिरवे यांचे कविता व लेख दै.चंपावती पत्र बीड या दैनिकात मी वाचत आलो आहे. मराठवाडा मुक्ती दिनानिमित्ताने त्यांची पुणे येथील कवी चंद्रकांत वानखेडे यांनी संपादित केलेल्या माय मराठी दिवाळी अंकात प्रकाशित झालेली कविता मी वाचली होती.त्या अनुषंगाने मी या कवितेची समीक्षा करण्याचा मोह मला आज होत आहे.
गोदावरीच्या पाण्याला
मराठवाड्याची तहान
मांजरेच्या पाण्याने
पिकविले बालाघाटाचे रान !
यातुन ते ब्रम्हगिरीतुन उगम पावलेली गोदावरी नदी, मांजरा नदी,सिंधफना नदी व त्यांच्या धरणातील पाण्या मुळे ही भुमी सुजलाम झाली आहे हे सांगतात.
देवगिरीच्या प्रांतात
स्वातंत्र्याचा रचला पाया
स्वामी रामानंद तीर्थांचा
लढा कसा जाईल वाया..!
निजामाच्या काळात संपुर्ण मराठवाडा गुलामगिरीच्या जोखडात होता.देवगिरीच्या किल्ल्यावरुन दिलेला लढा आणि मुक्ती संग्रामासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांनी दिलेला लढा निरर्थक होवुन शकत नाही असे कवी लिहितात.
मराठवाड्याची ही
मनोहर अंबा नगरी
मुकुंदराजांनी लिहीली
मराठीची विवेक सिंधुची वैखरी!
मराठवाड्याचे महाराष्ट्रातील महत्त्वाचे योगदान काय असेल तर ते म्हणजे मराठी भाषेचे व मराठी कवितेचे आद्य कवी मुकुंदराज यांची कर्मभूमी ही मराठवाड्यातील अंबा नगरी... निजामकालीन मोमिनाबाद व आजचे अंबाजोगाई...! मराठी कवितेची पहिली हाक या प्रदेशात गुंजली ही बाब आमच्यासाठी स्वाभिमानाची आहे .
नांदेडचे गुरूद्वार
गोदा ही शहारली
परभणीच्या मातीत
उर्दू गझल बहरली
या प्रांतात हिंदुच्या बरोबरच शिख समाज,मुस्लिम , इसाई,पारसी , बौद्ध समाज गुण्यागोविंदाने राहतात व प्रत्येक भाषा ही साहित्यातुन पाझरते असे कवी म्हणतात.शिखांचे गुरूद्वारा हे शिवालया एवढेच पवित्र मानतो .
मस्जिद व उर्दू भाषा या पुढेही पवित्र राहतील हा आशावाद कविचे श्रेष्ठत्व सिध्द करते.
परळीतला वैद्यनाथ
औंढयातही शिव आहे
माझ्या मराठवाड्याचा
स्वाभिमान हाच जीव आहे...!
या मराठवाड्याच्या पवित्र भूमीत भारत देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक परळीत वैद्यनाथाचे पवित्र मंदिर आहे.
धार्मिक व्रत व स्वाभिमानी बाणा या भुमीचचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे हे कवी अधोरेखित करतात.
वेरूळ मध्ये कैलास
अजिंठ्यातही बुद्ध आहे
संतांच्या भुमीचा
वारा ही शुद्ध आहे..!
जगप्रसिद्ध वेरूळ व अजिंठा या लेण्यातुन संपुर्ण जगाला वेड लावले आहे.वेरुळ मध्ये शिव दर्शन तर अजिंठा येथे बौद्ध लेणीतुन भगवान गौतम बुद्ध जगाला शांतीचा संदेश देत आहेत.
या कवितेचा शेवट खुपचं मार्मिक व संवेदनशील असा प्रा.बाबासाहेब हिरवे यांनी केला आहे हे ही साहित्यिक व विचारवंत यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यांना पुढील लेखनासाठी शुभेच्छा...!

