shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ऊस पिकासाठी पाण्याचे व खताचे योग्य नियोजन महत्त्वाचे - डॉ.आर. जी. यादव


श्रीरामपूर प्रतिनिधी:
तालुक्यात ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते मात्र अनेक भागात ऊस पिकावर तपकिरी तांबेरा, हुमणी किडी, पांढरी माशी किडी, कांडी किडी आदी रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव जाणवतोय. त्यामुळे हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे. तसेच ऊस पिकासाठी पाण्याचे व खताचे योग्य नियोजन महत्त्वाचे असल्याचे मत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे कीटक शास्त्रज्ञ डॉ.आर.जी. यादव यांनी माळवाडगाव येथे व्यक्त केले.

         अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ. भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस पिकावर असलेल्या रोगाचा प्रादुर्भाव आणि त्यावरील उपाय योजना याची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथील कीटक शास्त्रज्ञ डॉ.आर.जी. यादव व रोग शास्त्रज्ञ डॉ.गणेश कोटगिरे यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी तालुक्यातील अनेक भागात ऊस पिकाची पाहणी करून त्यावर असलेल्या रोगाचा प्रादुर्भाव तसेच त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत माहिती शेतकऱ्यांना दिली. माळवाडगाव येथील प्रगतशील शेतकरी बबन भाऊसाहेब आसने यांच्या ऊस पिकाची पाहणी केली. त्यानंतर याबाबत शेतकऱ्यांना हुमणी किडीचे एकात्मिक नियंत्रण करण्यासाठी ऊस लागवड अगोदर शेत दोन ते तीन वेळा उभे आडवे खोलवर नांगरावे तसेच शेतातील ढेकळे तव्याचा कुळव किंवा रोटावेटर वापरून फोडावेत. भुईमूग अथवा ताक पिकाचा हुमणीग्रस्त शेतात सापळा पीक म्हणून वापर करावा. उभ्या ऊसात खुरपणी, तगरणी अथवा बांधणी करताना जमिनीतून बाहेर पडणाऱ्या अळ्या गोळा करून माराव्यात. होलोट्रकिया प्रजातीचे भुंगेरे जमिनीतून एकाच वेळी बाहेर पडतात आणि बाभूळ व कडुनिंबाच्या झाडावर जमा होतात. फांद्या झाडून जमिनीवर पडलेले भुंगेरे गोळा करून पाण्यात टाकून मारावे. ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात ल्युकोफोलीस प्रजातीचे भुंगेरे उसाच्या पानावरून गोळा करून मारावेत. त्यामुळे हुमणी किडीचे नियंत्रण करणे शक्य होईल. तसेच पांढरी मिशी किडीचे नियंत्रण करण्यासाठी कीडग्रस्त शेतात मानाच्या मागील बाजूस दिसणारे काळे कोश व पांढरी बाल्यावस्था असलेली दोन पाने ऑगस्ट ते सप्टेंबर व जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात काढावी (Imidacloprid 17.8% SL) हे ०.३ मि.ली./लिटर पाण्यात फवारणी करावी. तसेच जैविक कीटकनाशक बिव्हिएम ५ मि.लि.लिटर पाण्यात फवारणी करावी. ऊसाची लागवड आडसाली किंवा पूर्व हंगामी केल्यास पांढरी माशीचा प्रादुर्भाव कमी होतो. पांढरी माशी रोखण्यासाठी युरियाचा वापर जास्त न करता पोटॅशचा वापर जास्त प्रमाणात करावा आणि पाणी वेळेवर देणे गरजेचे आहे. त्यामुळे देखील पांढरी माशी किडीचे नियंत्रण करणे शक्य होईल, अशी माहिती वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटचे रोग शास्त्रज्ञ डॉ.आर.जी. यादव यांनी दिली. यावेळी अशोक सहकारी साखर कारखान्याचे उपमुख्य शेतकी अधिकारी प्रदीप शिंदे, उस विकास अधिकारी विजयकुमार धुमाळ, किरण काळभोर, संकेत लासुरे, अभिषेक लबडे, शेतकी विभागाचे भाऊसाहेब आसने, गुलाबराव वाघ, शेतकरी नानासाहेब आसने, विजय हुरुळे, बबन आसने, संजय आसने, बाबासाहेब आसने, पत्रकार संदिप आसने आदी यावेळी उपस्थित होते.

ऊस पिकावरील किडीचे नियंत्रण करण्यासाठी पाण्याचे नियोजन अतिशय महत्त्वाचे आहे ऊस पिकाला पाणी जास्त झाले तरी किडीचा प्रादुर्भाव होतो आणि कमी झाले तरी देखील किडीचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे आपल्या जमिनीचे माती परीक्षण करूनच पाण्याचे योग्य नियोजन आणि खतांचा योग्य वापर करून ऊस पिकावरील रोग नियंत्रण करणे शक्य होईल. - आर. जी. यादव, कीटक शास्त्रज्ञ- वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी,पुणे

*माळवाडगाव येथे ऊस पिकाची पाहणी करून माहिती देताना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे कीटक शास्त्रज्ञ डॉ.आर. जी. यादव, रोग शास्त्रज्ञ गणेश कोटगिरे समवेत अशोक कारखान्याचे अधिकारी- कर्मचारी व ऊस उत्पादक शेतकरी. (छाया - संदीप आसने)*

संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close