shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आदर्श माता - पिता पुरस्काराने जीवनधन्य झाले = डॉ.कमलजितकौर बतरा


श्रीरामपूर प्रतिनिधी:
पुणे येथील गुरुकुलतर्फे मिळालेला आदर्श माता-पिता पुरस्कार म्हणजे जीवनात केलेल्या प्रामाणिक कार्याचे फळ आहे, श्रीमंती आली तरी जमिनीवर पाय घट्ट ठेवणे हीच खरी आनंदवाट आहे, असे विचार डॉ.कमलजितकौर बतरा यांनी व्यक्त केले. 


पुणे येथील गुरुकुलतर्फे झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना  त्या बोलत होत्या. व्यासपीठावर उपस्थित गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्मा. ऋषीतुल्य  व्यक्तिमत्त्व असलेले डॉ.अशोक कामतसर,कार्याध्यक्ष श्रीकृष्ण अष्टेकरसर,सचिव प्राध्यापक प्रभाकर स्वामीसर, समन्वयक सौ. शुभदाताई वर्तक तसेच धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिर सत्कार्योत्तेजकसभा यांचे सर्व पदाधिकारी संयोजक श्री रमण चितळे सर , सौ मंजुश्री गोखले मॅडम आदि सर्व बंधू भगिनी, आणि पत्रकार मित्र उपस्थित होते. 
डॉ.कमलजितकौर बतरा आपल्या भाषणात म्हणाल्या, आजच्या मातृदिनी आदर्श माता - पिता पुरस्कार मिळाल्याचा आनंद द्विगुणित झाला आहे. सर्वप्रथम मी आणि माझे पती डॉ. कुलवंतसिंग बतरा यांच्यावतीने गुरुकुल प्रतिष्ठान, सुश्री लक्ष्मीजी गिडवानी, अष्टेकरसर यांचे  मनःपूर्वक आभार मानते, ज्यांनी आमची आदर्श माता, पिता पुरस्कारासाठी निवड केली . खरंतर जगातले सर्वच माता-पिता आपल्या मुलांसाठी आदर्श असतात.आम्ही सुद्धा आमच्या माता- पितांचा आदर्श पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयास केला. आपल्या मुलांनी गर्वाने आपली इतरांशी ओळख करून द्यावी,  इतकीच आमची अपेक्षा होती. त्यासाठी स्वतः सचोटीने, प्रेमाने आणि शांतपणे जीवनातील संघर्षाचा सामना केला .सुखात परमेश्वराचे आभार मानले आणि दुःखात सहनशीलता मागितली. गरिबीत मान ताठ आणि  श्रीमंतीत पाय जमिनीवर ठेवण्याचे बळ मागितले. ३७ वर्षांपूर्वी आम्ही पुण्याहून गावी आलो. श्रीरामपूर येथील राहत्या घरातच बैठकीच्या खोलीत दवाखाना आणि बेडरूम मध्ये पेशंट ऍडमिट करून पुढे २५ बेडचे अद्यावत हॉस्पिटल सुरू केले. 


माणुसकीच्या नात्याने सेवा केली. अनेकांचे आशीर्वाद लाभले. ३५ वर्षांपूर्वी श्रीरामपूर तालुक्यात टायफॉईडची भयंकर साथ आली होती .सलाईन आणि औषधांचा खूपच तुटवडा निर्माण झाला होता, त्यावेळी डॉक्टर कुलवंतसिंग यांनी स्वतःच्या हॉस्पिटलसाठी तसेच इतर हॉस्पिटलसाठी पहिल्यांदा १ ट्रक भरून सलाईन स्वतः जाऊन आणले आणि सर्व हॉस्पिटलमध्ये पुरवले ना नफा ना तोटा या तत्त्वाने.पुढे नवीन हॉस्पिटल काढणाऱ्या डॉक्टरांना लागणारे साहित्य पुरविण्याचे काम सुरू केले .आपल्याला जे सहन करावे लागले ते नवीन होतकरू डॉक्टरांना सहन करावे लागू नये यासाठी कधीच पैशासाठी पाठपुरावा केला नाही . त्यानंतर डॉक्टर कुलवंतसिंग यांनी  सर्जिकलचे मोठे होलसेल दालन  सुरू केले. त्यात मुलांनी भर घालून इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये प्रगती केली. श्रीरामपूर ,नगर, नाशिक येथे देवा लाईफ सायन्सेसच्या ब्रँचेस सुरू केल्या. मलेशिया येथे फॅक्टरी  आणि सिंगापूर येथे ऑफिस घेतले. बिझनेस वाढवला. नेहमीच सचोटीच्या राजमार्गाने चालून प्रगती केली. गुरुनानक देवजींनी शिकवलेले तीन सुवर्ण सिध्दांता  प्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला .नाम जपो, किरत करो, वंडछको परमेश्वराचे सतत स्मरण करीत इमानदारीने आपला उद्योग धंदा करायचा आणि झालेल्या कमाईतून इतरांनाही मदत करायची ही नीति अवलंबून जीवन मार्गावर आम्ही चालत राहिलो. मातृभूमी,माता - पिता, समाज आणि ज्यांनी आपल्याला आपले मानले, सन्मानाने जगण्याचे बळ दिले त्या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीचे ऋण आमच्यावर आहे आणि त्या ऋणातच राहण्याचा आनंद आम्ही अनुभवतो. आज या पुरस्काराने  सिंहावलोकन करण्याची संधी मिळाली. खरंतर कुटुंबातील सर्वांची साथ महत्त्वाची असते. माझे आदरणीय सासू-सासरे यांची पुण्याई,परमेश्वराची कृपा, आमची मुलं कुलजितसिंग आणि जस्मित सिंग तसेच सुना परविंदरकौर आणि गुरप्रीतकौर यांची महत्त्वाची साथ लाभली.

गुरुकुल प्रतिष्ठान नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते.संत साहित्य प्रकाशित करून समाज कल्याणाचे महत्वपूर्ण कार्य करीत आहे.
आजच्या या आनंदसोहळ्या निमित्त आम्ही गुरुकुल प्रतिष्ठान साठी खारीचा वाटा उचलुन  कृतज्ञता व्यक्त करतो.  माता संतकौर आणि पिता रामसिंग यांच्या स्मृती प्रित्यर्थ ३१ हजारचा चेक गुरुकुल प्रतिष्ठानला अर्पण करीत आहोत. ही संकल्पना आमच्या मुलांचीही होती.  यापुढेही आमच्या मुलांना असे सत्कार्य करण्याची बुद्धी आणि प्रेरणा परमेश्वर देवो .
पुनश्च एकदा गुरुकुल प्रतिष्ठान , सुश्री लक्ष्मीजी गिडवानी, अष्टेकर सर  तसेच सर्व पदाधिकारी यांचे मनःपूर्वक आभार मानते. 

सौ. मंजुश्री गोखले यांच्या समर्थ रामदास विषयी कादंबरी साठी हार्दिक अभिनंदन करते .पुढील लेखनासाठी शुभेच्छा देते. यापुढेही त्यांच्याकडून अशीच साहित्य सेवा घडो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि माझ्या शब्दांना विराम देते .
उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि पत्रकार बंधूचे आभार मानते.

धन्यवाद.डॉ.अशोक कामत यांनी भाषण करून आदर्श उपक्रमाचे व बतरा परिवाराचे कौतुक केले.या कार्यक्रमात प्रसिद्ध लेखिका सौ. मंजुश्री गोखले यांच्या 'समर्थ 'कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले.डॉ.कुलवंतसिंग बतरा यांनी उपक्रमाचे कौतुक करून आभार मानले.

वृत्त विशेष सहयोग
प्रा.डॉ.बाबुराव उपाध्ये सर
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close