भारताने आपल्या सलग चौथ्या सामन्यात एकतर्फी विजय मिळत तेराव्या विश्वचषक स्पर्धेत मायदेशात खेळताना आपली गुणतालिकेतील स्थिति जैसे थे ठेवली. वास्तविक पाहता भारताला हा सामना चाळीसाव्या षटकापर्यंत जिंकता येऊ शकत होता. शिवाय भारताची परिस्थितीही फारच दयनीय होती असेही काही नव्हते. परंतु विराट कोहलीचे शतक व्हावे हा जणू राष्ट्रीय प्रश्न होता ? येथे संघाची गुणतालिकेतील स्थिती खास करून धावगती इतर सर्व प्रतिस्पर्ध्यांपेक्षा सरस करण्याची नामी संधी होती. कारण सामना स्पर्धेत फारसे भवितव्य नसलेल्या व तुलनेने कमजोर बांगलादेश विरूद्ध होता. भारताने भले हा सामना आठ गडी व सात चेंडू राखून जिंकला असला तरी अग्रक्रमावर असलेल्या न्युझिलंडपेक्षा गुणतालिकेत पिछाडीवर आहे. परंतु दोघांचेही गुण सारखे आहे. भारताचे आणखी पाच सामने बाकी असून त्यामध्ये इंग्लंड, न्युझिलंड, दक्षिण आफ्रिका या तुल्यबळ संघाशी आहे. शिवाय हे सामने स्पर्धा निर्णायक टप्प्यात गेल्यानंतर होणार आहे. त्यामुळे अगोदरच्या स्टेजवरच धावगतीसह सर्व बाजू आपल्या कक्षेत असाव्यात, जेणे करून टिम इंडियाला नॉक आऊट स्टेजवर जाण्यापूर्वी उंच मनोधैर्याची शिदोरी पाठीशी असावी.
येथे राहुल व कोहलीने थोडी तत्परता दाखवली असती तर भारत गुणतालिकेत अग्रस्थानी दिसला असता. परंतु कोहलीचे शतक व्हावे हिच प्रमुख बाब असेल तर ती संघाच्या फायद्याची नक्कीच नसेल. कोहलीने अठ्ठेचाळीसावे वनडे शतक ठोकून सचिन तेंडुलकरच्या एकोण पन्नास शतकांच्या विक्रमाला जवळ जवळ गाठले असून तो विक्रम त्याने याच विश्वचषक स्पर्धेत बरोबरी करून पादाक्रांत करावा हि माझ्या सह समस्त क्रिकेट रसिकांची भावना, इच्छा व अपेक्षा आहे. मात्र ती होताना भारताच्या "मिशन वर्ल्ड विन" ला कुठलाच धक्का बसता कामा नये.
भारत -पाकिस्तान सामन्याला ज्याप्रमाणे वेगळंच ग्लॅमर असतं त्यापैकी जराही भारत -बांगलादेश या शेजारी देशांतील सामन्याला नसतं. मागील काही दिवसांपूर्वीचा रेकॉर्ड बघितला तर पाकिस्तानपेक्षा बांगलादेशनेच भारताला नुसतेच सतावले नाही तर अधिक हरविलेही आहे. हा सामना विश्वचषकासाख्या प्रमुख स्पर्धेतील असल्याने भारत डोळ्यात तेल घालून खेळणार हे उघड होतेच. त्यातच बांगलादेशचा कर्णधार व ओरिजनल अष्टपैलू खेळाडू साकिब अल हसन तंदुरूस्ती अभावी न खेळल्याने अननुभवी नजमुल हसन शांतोने कर्णधारपद भुषविले. बांगलादेशने पुण्याच्या फलंदाज धार्जिण्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यांच्या सलामीवीरांनी तो सार्थ ठरविलाही. मात्र नंतरच्या फलंदाजांना तो टेंपो पुढे नेता न आल्याने बांगलादेशला मोठी धावसंख्या रचता आली नाही. माजी कर्णधार मोहम्मदुल्लासारखा प्रमुख फलंदाज आठव्या क्रमांकावर खेळला ही बाब कोणालाच पसंत पडली नसावी. मोहम्मदुल्लाच्या अनुभवाचा लाभ मधल्या फळीत खेळून बांगलादेशला अधिक घेता आला असता व मोठी धावसंख्या रचता आली असती. हिच बाब मोहम्मदुल्लाने केलेल्या ४६ धावांनी सिद्ध करून दाखवली.
भारताच्या गोलंदाजांना सुरुवातीला मार बसला मात्र नंतर सर्वच गोलंदाजांनी चांगली कामगिरी केल्याने बांगलादेशचे वारू जास्त भरकटले नाहीत. मात्र भारताला हार्दिक पांड्याच्या अनपेक्षित दुखापतीने जोराचा झटका बसला. सामन्याच्या नवव्या षटकातच व विशेष स्वतःच्या पहिल्याच षटकात हार्दिक पांड्याच्या पायाचे स्नायू दुखावले व त्याला मैदान सोडावे लागले. भारताचे सुदैव की इतर गोलंदाजांनी व नंतर फलंदाजांनी त्याची उणीव भासणार नाही याची दक्षता घेतली.
दोनशे सत्तावन्न धावांचे लक्ष गाठताना भारताचे सलामीवीर रोहित शर्मा व शुभमन गिलने ताबडतोड सुरुवात केली. कर्णधार रोहित सन २०१९ च्या स्पर्धेसारखाच झकास फॉर्मात आहे. मात्र तो त्याच्या फटकेबाजीवर नियंत्रण ठेवू शकत नसल्याने त्याच्या व संघाच्या अडचणीत वाढ होत आहे. पाकिस्तान व बांगलादेश विरुद्ध शतकं त्याच्या नजरेच्या टप्प्यात होती परंतु बेफिकीर वृत्तीने त्याचा घात केला. गिल व श्रेयस अय्यरनेही आपल्या कर्णधाराचीच री ओढली व संघाला अडचणीत टाकून निघून गेले. मात्र परत एकदा केएल राहुल व विराट कोहलीने संघाची धुरा आपल्या मजबूत खांद्यावर घेत संघाचा विजय साकारला. मात्र दोघांनीही कोहलीच्या शतका ऐवजी संघाची धावगती कशी इतरांपेक्षा सरस होईल याचा गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे. कारण भारताचा पुढचा सामना अव्वल स्थानावरील न्युझिलंडशी त्यांना सुट होणारे वातावरण असलेल्या जगातील सर्वात उंचावर असलेल्या धर्मशाळा येथील मैदानावर होणार आहे. त्यामुळे न्युझिलंड पेक्षा सरस धावगतीने व अग्रक्रमाने टिम इंडिया न्युझिलंडविरूध्द मैदानात उतरली असती तर त्यांचाच आत्मविश्वास भक्कम राहिला असता. बरे असे टिम इंडियासाठी पांड्याची दुखापत चिंतेची बाब असली तरी भारत सर्व पर्याय तयार ठेवण्यास सक्षम आहे. त्याचा प्रत्यय पुढे जाताना नक्कीच येईल.
लेखक -.
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

