विश्वचषक स्पर्धा अर्ध्यावर आली असतानाच गतविजेता इंग्लंड क्रिकेट संघ स्पर्धेतून अधिकृतरित्या बाद झाला आहे आणि त्यावर स्टँप मारण्याचं पवित्र काम केलं आहे ते टिम इंडियानं. क्रिकेटचे जन्मदाते असलेले इंग्रज आपल्या अहंकार व दुसऱ्यावर हुकुमत गाजविण्याच्या खोडीमुळे व आपण करतोय तेच खरं या मनमानी वृत्तीमुळे आजमितीला गुणतालिकेत सर्व संघांपेक्षा खराब धावगती व अधिक पराभव झाल्यामुळे तळाला लोंबकळत आहे. स्पर्धेच्या शेवटीही या परिस्थितीत बदल होईल असे वाटत नाही.
सुपर संडेला लखनौच्या अटलबिहारी वाजपेयी - इकाना स्टेडियमवर भारत व इंग्लंड यांच्यातील एक बहुप्रतिक्षित लढत झडली. इंग्लिश कर्णधार जोश बटलरने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीस पाचारण करताना विजयाची आशा धरली होती. कारण भारत भलेही अपराजित असला तरी भारताने यापूर्वी मिळविलेले सर्व विजय धावांचा पाठलाग करून मिळविले होते. त्यामुळे बटलरला भारतीय गोलंदाजांच्या कुवतीविषयी शंका होती व ' गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. याचे प्रमुख कारण म्हणजे जोरदार फॉर्मात असलेले भारताचे टॉप ऑर्डर फलंदाज अवघ्या चाळीस धावात तंबूत परतले होते. त्यात सलामीवीर शुभमन गिलची हाराकिरी, अनुभवी फलंदाज विराट कोहलीची हतबलता. नऊ चेंडू खेळूनही कोहली खातं उघडू शकला नाही यावरून हि बाब सिद्ध होते. तर श्रेयस अय्यरची मुर्खताच जास्त कारणीभूत होती. श्रेयस मधल्या फळीत खेळणारा चांगला फलंदाज आहे. फिरकी गोलंदाजी तो चांगल्या प्रकारे खेळू शकतो परंतु जलदगती गोलंदाजी खेळताना आखूड टप्प्याच्या चेंडूवर त्याची गाळण उडते. आता हे जगजाहीर झाले असून त्याच्या या कमकुवत बाबींवर सर्वच विरोधी संघांनी अभ्यास करून त्याला आखूड टप्पाच्या चेंडूचा भडिमार करण्याची योजना राबवून त्याला बाद करण्याचा सपाटाच लावला आहे. येथेही इंग्लंडने तेच केले. आता पुढील सामन्यांमध्ये श्रेयस अय्यर कदाचित भारतीय संघात खेळताना दिसणार नाही व भारतीय संघ प्रबंधनाने त्याला त्याच्या तंत्रात योग्य तो सकारात्मक बदल झाल्यासच अंतिम संघात खेळवावे. अन्यथा निर्णायक सामन्यात फजिती होऊ शकते.
भारताचे तीन प्रमुख फलंदाज स्वस्तात परतल्यानंतर इंग्लंड वरचढ भासू लागले तेंव्हा नेहमी आक्रमक खेळ करणाऱ्या कर्णधार रोहित शर्माने आपल्या धोरणात बदल करत बचावात्मक पवित्रा घेत के एल राहुल सोबत संघांची घडी परत एकदा व्यवस्थित करताना स्वतः शतकाच्या जवळ जाऊनही संघ हिताचा विचार करत धावगती वाढवण्याचा प्रयत्न करताना स्वतःच्या विकेटचे बलिदान देताना शतकाच्या मोह दूर ठेवला. रोहितच्या वैयक्तिक ८७ धावा याच सामन्यातील सर्वाधिक धावा व एकमेव अर्धशतक ठरले. राहुल एकोणचाळीस व सुर्यकुमार यादव ४९ यांनी आपली जबाबदारी योग्यरित्या बजावली. खास करून सुर्यकुमारने टिट्वेंटी टाईप कोणतीही मारझोड न करता परिस्थितीनुसार खेळ करताना सर्वांचे मनं जिंकले. याचा लाभ त्याला पुढील सामन्यात हार्दिक पांड्या संघात परतल्यानंतरही श्रेयस अय्यर ऐवजी संघात स्थापित होण्यात होईल. बुमराहा सोळा व कुलदिप यादव नाबाद नऊ धावा यांनी संघ पूर्ण पन्नास षटके खेळून काढत दोनशे एकोणतीस ही समाधानकारक धावसंख्या फलकावर लावली. तिनशे तीस धावांचे लक्ष गाठताना इंग्लंडने तीस धावांची सलामी दिली खरी मात्र त्यानंतर बुमराहाने सलग दोन व मोहम्मद शमीने पाठोपाठ दोन फलंदाज बाद करून चाळीसवर चार अशी पॉवर प्लेमध्ये इंग्लंडची दांडी गुल करत भारताचा विजय होणार हे निश्चित केले. त्यानंतर कोणताच इंग्लिश फलंदाज न स्थिरावल्याने अवघ्या एकशे एकोणतीस धावात इंग्लंडचा गाशा गुंडाळला. स्वतः कमी धावा करूनही भारताने शंभर धावांचा मोठा विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान बळकवाताना उपांत्य फेरीत जागा मिळविण्याचा मान पहिल्या क्रमांकाने मिळविला.
इंग्लंडच्या डावात मोहम्मद शमीने चार, बुमराहाने तीन, कुलदिप यादव दोन व रविंद्र जडेजाने एक बळी मिळविला. मोहम्मद शमीने संधी मिळालेल्या दोन सामन्यात नऊ बळी मिळवून त्याच्यावर झालेल्या अन्यायाचा राग विरोधी फलंदाजांवर काढून भारतीय संघ प्रबंधनाला आपल्या चुकीचा पश्चाताप करायला लावला. बुमराहा जबरदस्त जोमात आहे. कुलदिपने चालू असलेल्या स्पर्धेतील सर्वोत्तम चेंडू टाकताना इंग्लिश कर्णधार जोश बटलरचा अक्षरशः मामा बनविला. बेन स्टोक्स हा जगातला सर्वोत्तम खेळाडू असला तरी विशिष्ट दिवशी परिस्थितीनुसार खेळावे लागते हे तो विसरला की त्याच्यातील अहंकाराने त्याचा घात केला हे त्याने मोहम्मद शमी सारखा जागतीक दर्जाचा गोलंदाज तुफानी मारा करताना भान व जान न ठेवता मारलेला बेजबाबदार फटकाच सर्व काही सांगून जातो.
या सामन्यात जगातले तीन सर्वोत्तम फलंदाज विराट कोहली, ज्यो रूट व बेन स्टोक्स शुन्यावर बाद झाले. भारताचा कर्णधार रोहित शर्मा शंभर आंतरराष्ट्रीय सामन्यात नेतृत्व करणारा भारताचा सातवा तर जगातला पन्नासावा कप्तान बनला. या सामन्यातील रोहितची फलंदाज व कर्णधार म्हणून कामगिरी टिम इंडियासाठी नक्कीच फायद्याची राहिली, शिवाय संघातील इतर खेळाडूंसमोर आदर्शवत अशीच आहे. रोहित भारताला सध्या तरी योग्य दिशेने घेऊन जात असल्याचे आनंददायक दृश्य क्रिकेट पटलावर तरळत आहे.
लेखक -.
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

