shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कांगारूंनी लावला पाकिस्तानच्या स्वप्नाला सुरूंग


              बंगलोरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमची खासीयत जगजाहीर असल्यामुळे विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाल्यापासून तेथील ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना दुसऱ्या ठिकाणी हलवावा हि पाकिस्तानची काव काव अखेर अपेक्षित पराभवाने संपुष्टात आली. बंगलोरची खेळपट्टी फलंदाज धार्जिणी आहे. तेथील सिमारेषा छोटया आहेत. त्याचा लाभ सातत्याने आयपीएल खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना होईल हे पाकिस्तानी संघ प्रबंधनाला ठाऊक होते. त्यामुळेच त्यांनी ते स्थान बदलण्याची विनंती आयसीसीकडे केली. मात्र आयसीसीने त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवली. या दरम्यान खूप मोठा कालावधी होता. तेवढ्या वेळात पाकिस्तानी संघ व खेळाडू आपल्या ध्येयधोरणत व खेळात सुधारणा व बदल घडवून आणू शकत होते. परंतु सुधरतील ते पाकिस्तानी कसले ?

            जुम्मा के रोज म्हणजे पाकिस्तानसाठी पवित्र अशा शुक्रवारी ऑस्ट्रेलिया विरूध्द नियोजित झुंज झाली. विशेष म्हणजे मनात बंगलोरच्या खेळपट्टीची आधीपासूनच भिती असलेल्या पाकिस्तानसाठी जमेची बाजू म्हणजे नाणेफेकीचा कौल त्यांच्याच बाजूने लागला. भारतात खेळताना निव्वळ नाणेफेक, खेळपट्टी, सिमारेषा यांचाच विचार न करता वातावरण, रात्री पडणारे दव ( ड्यू ), स्थानिक प्रेक्षक यांचाही विचार करावा लागतो. परंतु एवढया सगळ्या बाजूंचा बारकाईने विचार करून निर्णय घेईल तो पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम कसला ? वास्तविक फलंदाजांना पोषक अशा खेळपट्टीवर विना दबाव प्रथम फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभारून कांगारूंना अडचणीत आणण्याची मोठी संधी बाबर जवळ उपलब्ध होती. मात्र त्याने तिची माती केली व कांगारूंना प्रथम फलंदाजीस पाचारण केले. मग हातची संधी दवडण्याइतके ऑस्ट्रेलियन खेळाडू दूतखुळे नाहीत.
                पाकिस्तानी कर्णधाराने आपला जिगरी मित्र व उपकर्णधार शादाब खानला संघाबाहेर ठेवले व उसामा मीरला संधी दिली. प्रत्यक्षात हि चाल फेल ठरली. सलामीवीर डेव्हीड वॉर्नर व मिचेल मार्शने या स्पर्धेतील आतापर्यंतच्या सामन्यात आलेल्या अपयशाचा वचपा या सामन्यात काढायचा ठरविले व तसे केलेही, आणि या कामी त्यांना पाकिस्तानी कर्णधार व सर्वच क्षेत्ररक्षकांनी मदत केली.
                  विश्वचषक स्पर्धेतील आपला पहिलाच सामना खेळणारा उसामा मीर याने डेव्हीड वॉर्नर नऊ धावांवर असताना हातात अलगद येऊ पाहणारा चेंडू छाती जवळून धरणी मातेला अर्पण केला आणि त्यानंतर पाकिस्तानी संघाची दुर्दशाच सुरू झाली. त्यानंतर वॉर्नर एकशेनऊ धावांवर असताना आणखी एक झेल पाकिस्तानी क्षेत्ररक्षकांनी सोडून आपल्या अडचणीत भरच घालून घेतली. वॉर्नर द्विशतक ठोकेल असे वाटत असतानाच एकशे त्रेसष्ठ धावांवर त्याचा बळी पडला. तत्पूर्वी मिचेल मार्श एकशे एकवीस धावांची लयलूट करून परतला होता. या दोघांनी विक्रमी दोनशे एकोणासाठ धावांची सलामी देऊन आपल्या संघास सुस्थिती प्राप्त करून दिली. या दोघांच्या मोठ्या खेळीनंतर कांगारुंचा डाव अपेक्षित धावा करू शकला नाही व तिनशे सदुसष्ठ धावांवरच समाधान मानले. वॉर्नर व मार्श यांच्या शतकी खेळानंतर सर्वाधिक धावा होत्या मार्कस स्टेईनसच्या एकविस ! 
               या दरम्यान पाकच्या सर्वच गोलंदाजांची पिटाई होत असताना आपल्या सुरुवातीच्या चार षटकात अवघ्या चौदा धावा देणाऱ्या प्रमुख गोलंदाज शाहिन आफ्रिदीला बाबर पार विसरून गेला होता. चौतीसाव्या षटकात त्याला आफ्रिदीची आठवण आली. मग आफ्रिदीने आपला जलवा दाखवताना कर्णधार बाबर सह ऑस्ट्रेलियन संघालाही ताळ्यावर आणले. सगळे गोलंदाज मार खात असताना आफ्रिदीने पाच फलंदाज बाद करून ऑस्ट्रेलियाचे चारशे पार करण्याचे स्वप्न उध्वस्त करून पाकिस्तानी फलंदाजांना मार्ग सोपा करून दिला.
                प्रत्युत्तरात पाकचे सलामीवीर अब्दुल्ला व इमामने शतकी भागीदारी केली खरी परंतु स्वत:चा जम बसवल्यावर धावगती वाढवून मोठी खेळी करण्याची गरज असताना बेजबाबदार फटके मारून बाद झाले. याचा परिणाम नंतर येणाऱ्या फलंदाजांच्या मानसिकेतवर झाला. धावगती व चेंडू यांचे समिकरण जुळत नसताना गडी बाद होण्याचा सिलसिलाही सुरूच होता. त्याचा परिपाक म्हणजे पाक संघाने सुरू केलेल्या नव्या परंपरेनुसार त्यांचा डाव पुर्ण पन्नास षटके न खेळताच संपुष्टात आला.
                  आयसीसीचा तथाकथीत नंबर वन फलंदाज व पाक कर्णधार बाबर आझम कमजोर संघांविरूध्द धावांच्या राशी ओततो व ताकदवान संघांविरूद्ध शेपूट घालून पळतो. हे या सामन्यात पुन्हा एकदा सिद्ध झालं. संघाला त्याच्या कडून धावांची व खेळपट्टीवर उभे राहून इतर फलंदाजांकडून चांगली कामगिरी करून घेण्याची गरज असताना बाबर सर्व जबाबदारी झटकून बाद झाला. त्यानंतर रिजवान, शकील व इफ्तिखार यांच्या खेळातही जबाबदारी पेक्षा बेफिकीरीच दिसली.
                 फलंदाज म्हणून बाबरचे अपयश पाकसाठी मारक ठरत असताना कर्णधार म्हणून त्याची कोणतीच चाल यशस्वी ठरली नाही. क्षेत्ररक्षण लावण्यात तो चुकीचा ठरतो, गोलंदाजीत परिस्थितीला धरून बदल करत नाही. इतकेच नाही तर संघ निवडताना दोस्ती - यारीवर त्याचा जास्त भरवसा दिसतो. परंतु हे दोस्तच भर मैदानात त्याला दगा देत असल्याने पाकच्या अडचणी वाढत आहेतच शिवाय आता तर या स्पर्धेत राहिलेले पाचही सामने जिंकले नाही तर उपांत्य फेरीपूर्वीच पाकचे आव्हान संपुष्टात येण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. एक कर्णधार या नात्याने बाबर आझमला आता जागे होण्याची वेळ आली आहे.  आजमितीला पाकमध्ये त्याची गणणा एक खलनायक म्हणून व्हायला लागली असून बाबरने परिस्थिती नियंत्रणात आणली नाही तर त्याच्या विरूध्द पाकमध्ये मोठा उद्रेक होण्याची शक्यता आहे. तसे बघाल तर अजून त्यांचे पाच सामने बाकी आहेत. त्यात ते सुधारणा करून फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी मारू शकतात. कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असून कधीही फासा बदलू शकतो. त्यासाठी स्वतःचे बलस्थाने ओळखण्याची व त्याचा योग्य उपयोग करण्याची वेळ आली आहे. तरी पाकिस्तान संघ सहजासहजी गुडघे टेकणार नाहीत आशी आशा करायला हरकत नाही. कारण पाकचे स्पर्धेतून बाद होणे विश्वचषकाच्या रंजकेत विरजण टाकू शकते.

लेखक -.
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close