गतविजेत्या इंग्लंडची एक्झिट पक्की ?
इंग्लंडचा नवीन प्रशिक्षक ब्रेंडन मॅकलम याने अतिआक्रमक खेळण्याचा नवा फॉर्म्यूला
" बॅजबॉल " इंग्लिश खेळाडूंच्या गळी उतरवला व तो त्यांच्या पचनी पडलाही. त्याचा फायदा इंग्लंडला क्रिकेटच्या तिनही प्रारूपात मोठया प्रमाणात होऊ लागला. या गदारोळात इंग्लंडचा कफल्लक फलंदाजही जगातल्या कोणत्याही संघाच्या चांगल्यात चांगल्या गोलंदाजाचा पालापाचोळा करू लागला. यामुळे सर्वच संघ या आगीत होरपळू लागले. पण म्हणतात ना हवा बदलायला वेळ लागत नाही. वाऱ्याचा रुख बदलताच आग लावणारा त्याच आगीचा शिकार ठरतो. अगदी तीच गत शनिवारी विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडची झाली आणि त्या आगीची धग इतकी भयंकर होती की बॅजबॉलचे निर्मातेच त्या आगीत जळून खाक झाले. त्यामुळे त्यांचे गतविजेतेपद राखणे तर सोडाच उरली सुरली पतही जाण्याच्या मार्गावर आहे. हा लेख लिहीला जाईपर्यंत ते गुणतालिकेत नवव्या स्थानावर होते. तेही सुदैवाने त्यांची एकच धाव तळाच्या अफगाणिस्तान पेक्षा अधिक राहीली. नाहीतर आक्रमकतेचा तथाकथीत ठेका घेतलेल्या इंग्लंडच्या इज्जतीचे लक्तरे क्रिकेटच्या कुंभमेळ्याच्या वेशीवर टांगण्याची वेळ आली असती.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रखरखत्या उन्हात सफेद चेंडूच्या खेळातील विद्यमान विजेते इंग्लंड व "चोकर्स फेम" साऊथ आफ्रिका आमने सामने आले. तत्पूर्वी हे दोन्ही संघ स्पर्धेत सहभागी असलेल्या व तुलनेने कमजोर अनुक्रमे अफगाणिस्तान व नेदरलँडविरूध्द संघांविरूध्द नामुष्कीजन्यरित्या पराभूत झाले होते. त्यामुळे आपली गेलेली पत राखून गुणतालिकेत स्वतःला सन्मानजनक स्थान मिळवून देण्याच्या उद्देशाने मैदानात उतरले. इंग्लंडच्या संघात "ग" ची बाधा फैलावलेली असताना आफ्रिकन संघातही "ब" ची एलर्जी असल्याचे जाणवते.
" ब " म्हणजे बवुमा. टेंबा बवुमा हा कृष्णवर्णीय बुटक्या शरीरयष्टीचा चांगल्यापैकी फलंदाज व द.आफ्रिका संघाचा विद्यमान कर्णधार. त्याचा वर्ण आफ्रिकेत तुच्छ समजला जातो. त्यामुळे संघात असलेल्या गोऱ्या बहुल संघात त्याला विशेष मान मिळत नाही. शिवाय त्याच्यात नेतृत्व गुणांचा मोठा अभाव दिसतो. त्यामुळे सहकारी गोऱ्या खेळाडूंचे त्याला विशेष सहकार्यही मिळत नाही. त्याच साखळीचा एक भाग म्हणजे नेदरलँडविरूध्द गोऱ्या खेळाडूंचा झालेला खराब खेळ व त्यानंतर मिळालेला धक्कादायक पराभव होय. बवुमा इंग्लंडविरुद्ध प्रकृत्ती अस्वस्थ असल्यामुळे खेळला नाही. वास्तविक त्याची प्रकृती खरंच खराब होती हे कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. मात्र या मागे मोठे षडयंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वर्ल्डकप पूर्वी ऑस्ट्रेलिया विरुद्ध आफ्रिका मायदेशात पाच सामन्यांची वनडे मालिका खेळले. त्यातील पहिले दोन सामने आफ्रिकन संघ हरला. त्यानंतर अशाच तथाकथीत दुखापतीमुळे बवुमाला बाहेरचा रस्ता दाखवला गेला. त्यानंतर घडलेली आश्चर्याची बाब म्हणजे आक्रिकेने उर्वरीत सर्व सामने लिलया जिंकून मालिकाही खिशात घातली. असाच योगायोग पुन्हा एकदा चालू विश्वचषक स्पर्धेत आपण बघितलाच आहे. असेच जर गलिच्छ राजकारण आफ्रिकन संघात होत राहिले तर ते कधीच व कुठलाच विश्वचषक जिंकू शकणार नाहीत.
इंग्लंड संघ व प्रबंधन कुठल्या भ्रमात वावरतात कुणास ठाऊक ? खेळपट्टी, वातावरण यांचा कुठलाच विचार न करता मनाला वाटेल तसा संघ निवडतात. बरेचसे इंग्रज खेळाडू आयपीएल सातत्याने खेळत असल्याने व सरस कामगिरीची शिदोरी पाठीशी असतानाही संघ प्रबंधन त्यांना संधी देताना दिसत नाही. मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन यांना वगळून इंग्लंडने स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतला. वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी वरदान ठरणारी असते. त्यामुळे खेळपट्टीचा फायदा घेण्यासाठी कोणताही संघ प्रथम फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभी करून प्रतिपक्षावर दबाव आणून सामना खिशात घालतो. हे साधं सोपं सुत्र सर्वश्रूत असूनही इंग्लंडने द. आफ्रिकेला प्रथम फलंदाजीस बोलावून आपला मृत्यूलेख स्वतःच लिहीला आणि त्यावर शिक्कामोर्तब केले, ते प्रथम त्यांच्या निष्प्रभ गोलंदाजी, ढिसाळ क्षेत्ररक्षण व बेजबाबदार फलंदाजीने.
खराब सुरुवातीनंतरही बवुमाच्या ऐवजी खेळणाऱ्या रीझा हेंड्रीक्स, रासी वान ड्यूसेन, हेन्रीक क्लासेन व मार्को जेनसन यांच्या आक्रमक खेळीने इंग्रजांच्या " बॅजबाॅल " फॉर्मूल्यालाही केराची टोपली दाखवली आणि आपल्या तडफदार खेळाने स्वप्नातीत तीनशे नव्व्यान्नव धावांचा पहाड उभा केला. त्यानंतर आफ्रिकन गोलंदाजांनी टिच्चून व भेदक मारा करताना इंग्लंडच्या" बॅजबाॅल " फॉर्मूल्याची वाट लावली. इंग्लिश संघ गडी बाद होत असतानाही परिस्थिती नुसार खेळ करत नाहीत. हि विश्वचषक स्पर्धा आहे. येथे एक एक धाव व गुण महत्त्वाचा असताना आपल्या फायद्यासाठी काही वेळा आपले तत्व बाजूला ठेवावे लागतात. मात्र इंग्लंडची मोडेल पण वाकणार नाही हि पध्दत त्यांचे ताबूत बुडविण्यास पुरेशी आहे. त्यांचा हा अडेलतट्टूपणा त्यांच्या वनडे इतिहासातील सर्वात मोठा पराभव होण्यास कारणीभूत ठरला.
द. आफ्रिकेने भले संघात अंतर्गत राजकारण काहीही असो स्वतःची गाडी पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आणली आहे. गुणतालिकेत ते तिसऱ्या स्थानावर असले तरी त्यांची धावगती सर्वांपेक्षा सरस आहे. स्पर्धा जशी पुढे सरकेल तशी त्यांची हिच धावगती त्यांना फायद्याची ठरेल.
मुंबईचे वातावरण, खेळपट्टी व खेळाचे नियम दोन्ही संघासाठी सारखेच असताना त्याच परिस्थितीत द. आफ्रिकेने सरस खेळ केला मात्र इंग्लिश संघाला तेथील उष्णता, दमटपणा जास्त त्रासदायक असल्याने पराभव झाल्याची उपरती झाली. स्वतःच्या कमजोर बाबींवर इलाज करण्याऐवजी दुसऱ्याच्या नसलेल्या चुकांचे भांडवल करण्यात इंग्रज पूर्वीपासूनच वाकबगार आहेत. मात्र येथे त्यांची कोणतीच डाळ शिजणार नसल्याने त्यांनी स्पर्धेतून स्वतःची अनाकलनीय एक्झिट होणार नाही याचा विचार करून उपाय करावेत. उगीच नको तेथे लांबडं नाक खुपसू नये अन्यथा त्याच नाकाचा शेंडा तुटल्याशिवाय राहाणार नाही.
लेखक -.
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

