shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आदरयुक्त दरारा निर्माण करणारे;पालकासारखे ममत्व असणारे बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर साहेब

बीड:-
अधिकारी म्हटले की, कुणी नाही म्हटले तरी लोकांच्या मनावर आपोआप एक प्रकारचे दडपण व दबाव निर्माण होतो. त्यातही जर अधिकारी शीघ्रकोपी वृत्तीचे असले तर मग त्यांचा धाक व दडपण लोकांच्या मनावर जरा जास्तच निर्माण होते. अशा अवस्थेत मग सर्वसामान्य जनतेचे काही प्रश्न किंवा समस्या असल्या तरी आणि ते सोडविणे अधिकाऱ्यांच्या अखत्यारीतील असल्या तरी अशा अधिकाऱ्यांसमोर ते प्रश्न किंवा त्या समस्या मांडण्याचे धारिष्ट्य लोक करत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. परंतु काही अधिकारी असेही असतात की, त्यांच्या पदांनुसार भलेही त्यांचा दरारा असतो परंतु त्यांच्या कार्यकृतीतून ते या दराऱ्याला अगदीच आदर युक्त करतात. यामुळे अशा अधिकाऱ्यांना एकतर जनतेचा विश्वास संपादन करून आपले कर्तव्य चांगल्या पद्धतीने निभावता येते. शिवाय जनतेमध्ये आपली व आपल्या कार्याची प्रतिमाही चांगली व आश्वासक तयार करता येते. याच प्रकारातील अधिकारी म्हणजे विद्यमान बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर होय. ठाकूर साहेबांनी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यापासून स्वतःविषयी संपूर्ण जिल्हावासियांच्या मनात फक्त स्वतःचा आदरयुक्त दराराच निर्माण केला असे नाही तर त्यांनी आपल्या कार्यातून जनतेसाठी पालकासारखे ममत्व सुद्धा वेळोवेळी दाखवून दिले आहे. आज या सदरात जनतेचे आदर मिळवून जनतेला पालकाचे ममत्व देणारे बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या विषयी ......

बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांचे पूर्ण नाव नंदकुमार त्र्यंबक ठाकूर आहे. त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे झाला. त्यांच्या आई गृहिणी तर वडील माध्यमिक शाळेत शिक्षक होते. त्यांचे बालपण मनमाड येथेच गेले. मनमाड येथील नगर परिषद च्या शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण इंडियन हायस्कूल मनमाड येथे घेतले. यानंतर धुळे जिल्ह्यातील एग्रीकल्चर कॉलेजमध्ये त्यांनी बीएससी चे शिक्षण घेतले. बीएससी नंतर त्यांनी एमएससी एग्रीकल्चर चे शिक्षण अहेमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील कृषी विद्यापीठात घेतले. येथून पदवी मिळविल्यानंतर त्यांनी बँक ऑफ इंडिया मध्ये कलार्क या पदावर सहा महिने नोकरी केली. तसे त्यांची इच्छा होती इंजिनीयर होण्याची परंतु इयत्ता बारावी मध्ये इंजिनीयरिंग चे शिक्षण घेण्यासाठी आवश्यक तेवढे गुण न मिळाल्याने त्यांनी कृषी विद्यापीठात प्रवेश घेतला. कृषी विद्यापीठातून पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी दोन वर्षे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयात कार्यासन अधिकारी या पदावर कर्तव्य निभावले. येथे असतानाच त्यांनी एमपीएससी परिक्षेची तयारी सुरू केली. १९९४ ते १९९६ या काळात एमपीएससीची तयारी करून परीक्षा देत ते यात उत्तीर्ण झाले व डीवायएसपी पद मिळविले. या पदावर त्यांची गोंदिया येथे डीवायएसपी म्हणून सन २००० मध्ये प्रथम नियुक्ती झाली. २००० ते २००३ अशी तीन वर्षे ते गोंदिया येथे डीवायएसपी पदावर कार्यरत होते. येथून नंतर सोलापूर जिल्ह्यात डीवायएसपी पदावर त्यांनी २००३ ते २००६ असे चार वर्षे कर्तव्य निभावले. २००७ ते २०११ अशी चार वर्षे त्यांनी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे सेवा बजावली. येथून २०११ साली त्यांची अप्पर पोलीस अधीक्षक पदी पदोन्नती होऊन या पदावर ते रत्नागिरी येथे रुजू झाले. येथे त्यांनी २०११ ते २०१४ पर्यंत अप्पर पोलीस अधीक्षक पद यशस्वीरित्या भूषविले. येथून मग त्यांची बदली जळगाव जिल्ह्यात २०१४ साली झाली. तिथे ते अप्पर पोलीस अधीक्षक या पदावर २०१४ ते २०१७ पर्यंत राहिले. येथून पुन्हा त्यांची बदली महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे २०१७ साली झाली. तिथे ते २०१७ ते २०१९ असे दोन वर्षे राहिले. २०१९ साली त्यांची मुंबई डीसीपी पदावर बदली झाली. तिथे त्यांनी २०१९ ते २०२२ अशी तीन वर्षे मुंबईचे डीसीपी म्हणून वाखाण्याजोगे कार्य केले. मग मुंबईच्या डीसीपी पदावरून त्यांची बदली सन २०२२ साली बीड जिल्हा पोलीस अधीक्षक पदी झाल्याने ते दिनांक ०८ जून २०२२ पासून बीड जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचे कार्य अत्यंत यशस्वीरित्या सांभाळत आहेत.

सलोखा राखत असल्याने दिवसेंदिवस आदर वाढत आहे 

बीड जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून ते रुजू झाल्यापासून आतापर्यंत बीड शहर असो की, जिल्हा. कुठेही काहीही अघटित किंवा अप्रिय घटना घडली तर तिथे ते जातीने हजर होऊन बिघडलेले वातावरण चुटकीसरशी चांगले करतात. ही त्यांची खासियत बीड जिल्हावासी त्यांच्या गेल्या १७ महिन्याच्या कार्यकाळात पहात आहेत. मग बशीरगंज, कालिका नगर, के.एस.के. महाविद्यालय येथील घटना असो की, केज तालुक्यातील घटना असो. कोणत्याही समाजातील किंवा कोणत्याही जाती धर्मातील वेगवेगळ्या गटात कोणत्याही मुद्द्यावरून काहीही घडले तरी ठाकूर साहेब त्याचा भडका होणे तर दूर साधी ठिणगी सुद्धा पडू देत नाही. मग प्रकरण हिंदू-मुस्लिम अशा वेगवेगळ्या धर्माचे का असेना. प्रत्येक वेळी सलोखा राखणे ही त्यांची खासियतच त्यांचा सर्वसामान्यांच्या मनात, डोक्यात व नजरेत आदर वाढवीत आहे.

विभागातील रखडलेले कार्य मार्गी लावत आहेत 

जिल्हा पातळीवर पोलीस प्रशासनातील पदोन्नत्या या गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या होत्या. त्या पदोन्नत्या ठाकूर साहेबांनीच मार्गी लावून जवळपास ५०० पोलीस कर्मचाऱ्यांना अधिकारी पदी पदोन्नती दिली. शिवाय पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या हा सुद्धा पोलीस दलात अनेकदा कळीचा मुद्दा होतो व बदल्यांमध्ये अनेकदा आरोप प्रत्यारोप होतात परंतु ठाकूर साहेबांनी यात सुद्धा आपल्या प्रशासकीय दृष्टिकोनातून योग्य प्रकारे समन्वय साधत कोणत्याही आरोप प्रत्यारोपाविना जवळपास ३०० पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याची साधी तक्रार सुद्धा आली नाही. म्हणजेच बीड जिल्हा पोलीस दलाच्या प्रशासनिक स्तरावर सुद्धा ठाकूर साहेबांनी आपल्यातील एक उत्कृष्ट अधिकारी दाखवून दिला आहे.


जातीय तेढ व दोन नंबर मध्ये वन टू का फोर करणाऱ्यांवर धडक व कडक कारवाया

शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, गुन्हेगारीने डोके वर काढू नये, जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर तसेच दोन नंबरचे उद्योग करणाऱ्यांवर वेगवेगळे पथक नेमून धडक व कडक कारवाया करण्याचा खाक्या सुद्धा ठाकूर साहेबांनी अवलंबलेला आहे. यामुळे त्यांच्या कार्यकाळात कोणत्याही समाजासमाजात जातीय तेढ निर्माण होत नाही. सर्वजण गुण्यागोविंदाने राहत आहेत. शिवाय चोरटी वाळू, मुरूम, मटका व गुटखा या दोन नंबरच्या धंद्यांना व हे धंदे करून माफिया झालेल्यांना ठाकूर साहेब हे माफ नही किया अशाच प्रकारे कारवाया करत आहेत. शिवाय गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनेकांना बीड जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा बडगा उगारला असून आतापर्यंत त्यांनी अनेक गुन्हेगारांना बीड जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. यामुळे त्यांचा दरारा हा एक वेगळीच उंची गाठतो आहे.

शेतीवाडीच्या प्रश्नांसाठी जलद गती न्यायालयांची गरज 

बीड जिल्ह्यात पोलीस अधीक्षक पदावर आल्यापासून पहात आहे की, इथे इतर क्षेत्रातील वेगवेगळे गुन्हे तसे अत्यंत कमी आहेत. किंबहुना इतर प्रकरणातील गुन्हे हाताळताना बीड जिल्हा पोलीस प्रशासनाला जास्त त्रास होत नाही. मात्र शेतीवाडी चे गुन्हे जास्त आहेत. इतर गुन्ह्यामध्ये पोलीस हस्तक्षेप करून आपल्या पातळीवर त्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या करीत आहेत. मात्र शेतीवाडी ही बीड जिल्ह्यात एक अशी बाब झाली आहे की, यात पोलिसांनी कितीही हस्तक्षेप केला, कितीही सामोपचाराने प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न केला, तरीही त्याला म्हणावे तसे यश अजूनही येत नाही. इतकेच काय जमिनीच्या छोट्याशा तुकड्यासाठी भावकीतील किंवा शेजारील शेतकरी एक दुसऱ्याचे मुडदे पाडण्यासाठी सुद्धा मागे पुढे पहात नाहीत. हे कुठेतरी थांबण्याची गरज आहे. असे प्रकरण न्यायालयात जाऊन तिथे वर्षानुवर्षे व पिढ्यानपिढ्या रेंगाळतात. यामुळे अशा प्रकरणातील कटुता ही काही संपायला तयार नाही. ही बाब पाहता अशा प्रकरणांसाठी जलद गती न्यायालयांची आवश्यकता आहे. जेणेकरून न्यायालयात अल्पावधीत अशा प्रकरणांचा निकाल लागावा व समाजात वाढत असलेली कटूता संपावी. असे मतही यावेळी नंदकुमार ठाकूर यांनी व्यक्त केले.


बीडच्या लोकांबद्दल ठाकूर साहेबांचे मत 

मुलाखती दरम्यान बीडच्या लोकांबद्दल ठाकूर साहेबांना विचारले असता त्यांनी स्पष्ट सांगितले की, बीडचे लोक हे मनाने अत्यंत साफ आहेत. त्यांना विश्वासात घेऊन अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य नीट बजावले तर ते अधिकाऱ्यांना अधिकारी न समजता आपल्याच कुटुंबातील एक व्यक्ती समजतात. काहीजण वडीलधारी तर काही जण भाऊ तर कुणी काका-मामा सुद्धा समजतात व या नावांनी संबोधन सुद्धा करतात. शिवाय वेळप्रसंगी आदरातिथ्य करण्यातही बीडकर मागे नाहीत असेही त्यांनी मोठ्या मनाने सांगितले.

ठाकूर साहेबांना मिळालेले पुरस्कार

नक्षली एरियात चांगली सेवा केल्याबद्दल राज्य शासनाकडून खडतर सेवा पुरस्कार मिळाला. तर केंद्र शासनाकडून अंतर्गत सुरक्षा पदक मिळाले. चांगले प्रशिक्षण देण्याकरिता केंद्रीय गृहमंत्री यांचा होम मिनिस्टर मंडल इन ट्रेनिंग हा पुरस्कार मिळाला. तर राष्ट्रपती पदकाने सुद्धा त्यांना महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

ठाकूर साहेबांच्या कुटुंबीयाविषयी थोडक्यात 

नंदकुमार ठाकूर यांची पोलीस प्रशासनामध्ये आतापर्यंत २३ वर्षे सेवा झालेली आहे. त्यांना एक भाऊ, एक बहीण, पत्नी व तीन मुली असून तिन्ही मुलींचे शिक्षण सुरू आहे तर पत्नी गृहिणी आहेत.


शहिंशाह वली दर्गाहला संदल चढविण्याचा मान मिळालेले पहिलेच पोलीस अधीक्षक 

शहरातील सुप्रसिद्ध सुफी संत हज़रत कोचकशाह वली उर्फ शहिंशाह वली यांचा संदल व उर्स नुकताच काही दिवसांपूर्वी पार पडला. यावेळी संदल चढविण्याचा मान बीडच्या इतिहासात प्रथमच पोलीस अधीक्षकांना मिळाला. हा मान नंदकुमार ठाकूर यांना मोठ्या अभिमानाने देण्यात आला आणि ते शहिंशाहवली दर्गाला संदल चढविणारे पहिलेच बीड जिल्हा पोलीस अधीक्षक ठरले.

कायद्याचा बडगा आणि पालकाचे ममत्व दाखविणारे ठाकूर साहेब

पोलीस अधीक्षक म्हणून एकीकडे कायद्याचा बडगा उगारून बेधडक कारवाया करणारे ठाकूर साहेब तर दुसरीकडे चांगल्या लोकांसाठी त्यांच्या हाके वर धावून जाणारे ठाकूर साहेब. असे दोन भिन्न रूप एकाच वेळी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात बीड जिल्हावासियांना अनुभवायला मिळते आहे.



हा नंदादीप असाच तेवत राहो!

बीडचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नंदकुमार ठाकूर आपले कर्तव्य इमाने इतबारे पार पाडत आहेत. त्यांच्या कर्तव्यदक्षतेला बीड जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून मानाचा तुरा रोवणाऱ्या दीपा मुधोळ-मुंडे यांची सुद्धा त्यांना तेवढीच तोलामोलाची साथ मिळत आहे. नंदकुमार ठाकूर आणि दीपा मुधोळ-मुंडे ही गोड जोडी बीड जिल्हा प्रशासनामध्ये जिल्हावासियांसाठी सातत्याने दक्ष राहून कर्तव्य निभावत आहेत. अशा या जोडीला त्यांच्या नावातील पहिल्या अक्षरांची जोड देऊन नंदादीप म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आणि हा नंदादीप प्रशासकीय सेवेत अशाच प्रकारे आपल्या कर्तव्यदक्ष बाणेदारपणाने सतत तेवत राहो अशा या अनुषंगाने दोघांनाही खूप-खूप हार्दिक हृदयी शुभेच्छा देतो.

एस.एम.युसूफ़
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - 9021 02 3121
बीड जिल्हा विशेष प्रतिनिधी
close