जगात आपली ओळख होत असते ती आपल्या प्रतिभा, प्रतिमा व संस्कृतीमुळे. यापैकी आपली संस्कृती विकृत असेल तर आपल्या इतर दोनही गोष्टींना तडा जातो व आपली जनमानसात असलेली इभ्रत मातीमोल होऊन जाते. तसे पहाल तर हि इज्जत मिळवायला अपार कष्ट व परिश्रम घ्यावे लागतात. मात्र काही असे कपाळ करंटे असतात की, स्वतःच्या विकृती मनोवृत्तीमुळे वैयक्तीक हानी करून घेतातच पण आपल्या देशाच्या संस्कृतीचे लक्तरे जगाच्या वेशीवर टांगून इतरांच्या टिकेचे धनी बनतात. या स्वयंघोषित महाटॅलेंटेड लोकांमुळेच असभ्यतेचे नको असलेले प्रदर्शन होत असते.
वरील पूर्ण बाबींमध्ये चपखलपणे फिट बसतात ते ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू. मग ते चालू पिढीतले असोत किंवा मागच्या कोणत्याही. या लोकांच्या डोक्यात यशाची हवा इतक्या लवकर जाते की, त्यापुढे स्वतःची व देशाची इज्जत त्यांच्यासमोर कस्पटासमान असते. जागतिक पातळीवर सर्वच खेळात ऑस्ट्रेलियाची कामगिरी अतिशय नेत्रदिपक आहे. त्यामुळे त्यांची सर्वच जगात वाहव्वा केली जाते. मात्र यशाची नशा माणसाला किती खालच्या पातळीवर घेऊन जाऊ शकते याचे मुर्तिमंत उदाहरण म्हणजे ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ व त्यांचे क्रिकेटपटू !
मैदानावरचा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियन्स किती गलिच्छ स्लेजिंग ( शिवीगाळ ) करतात हे जगजाहीर असून या प्रकारासाठी एखादा विश्वकरंडक असता तर तेच त्याचे लाईफटाईम विजेते राहिले असते. इतके किळसवाणे प्रकार ते विरोधी संघातील खेळाडूंचे मानसिक संतुलन बिघडविण्यासाठी करतात. जिंकणं हे त्यांचं मुख्य ध्येय असल्यामुळे क्रिकेटपटू अंडर आर्म बोलींग, बॉल टॅम्परींग, मॅच फिक्सींग, स्पॉट फिक्सींग, स्लेजिंग हे गैरमार्गाचे प्रकार तर आता त्यांचे नित्याचेच झाले असून कोणत्याही संघाविरूद्धच्या मालिका तसेच सामन्याआधी त्यांचे माजी खेळाडू, प्रसिद्धी माध्यमे विरोधी संघांवर दबाव आणण्याचे नानाविध प्रकार करतात. इतकेच नाही तर ऑस्ट्रेलियात सामना चालू असेल तर तेथील प्रेक्षक देखील टोकाची भूमिका घेतात. विरोधी संघातल्या चांगलं खेळणाऱ्या खेळाडूंना ते सातत्याने टारगेट करून खच्ची करण्याचा प्रयत्न करतात. मद्यप्राशन केलेले हे प्रेक्षक सिमारेषेवर क्षेत्ररक्षक करणाऱ्या खेळाडूंना अगदी सळो की पळो करून सोडतात. यामुळे काही विरोधी खेळाडू सिमारेषेवर क्षेत्ररक्षण करायला नको म्हणतात. या मागे या सर्वांचा उद्देष एकच असतो की काही होवो त्यांचा संघच जिंको. संपूर्ण ऑस्ट्रेलियन्स जमातीचीच हि धारणा असल्यामुळे त्यांच्यापैकी एकाला लपवावे व दुसऱ्याला दाखवावे अशी कुठलीच सोय नाही. कारण ते सगळे एकाच माळीचे मणी आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियन्स खेळाच्या कोणत्याही क्षेत्रात कितीही प्रविण असले तरी त्यांच्या विषयी जगभर असलेली आदराची भावना आता तिळमात्रही शिल्लक राहीलेली नाही.
जागतिक स्तरावर क्रिकेट सन १९७७ पासून अधिकृतरित्या सुरू झाले अगदी तेंव्हापासून जागतिक स्तरावर ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे हजारो किस्से व कारनामे कुप्रसिद्ध आहेत. आजवर माझ्या तरी वाचण्यात किंवा ऐकण्यात आले नाही की, कुठल्या तरी ऑस्ट्रेलियन खेळाडूला त्याच्या सभ्य वागणुकीसाठी सभ्यतेने खेळ केला म्हणून मानाचा
" फेअर प्ले '' अवॉर्ड मिळाला. उलट चांगल्या खेळाचा खेळखंडोबा करण्यातच हे खरेखुरे विश्वविजेते आहेत.
जागतिक स्तरावर खेळल्या जाणाऱ्या अधिकृत क्रिकेट, वनडे, टि २० व कसोटी या तिनही प्रारूपातील ऑस्ट्रेलिया जगातील एकमेव विश्वविजेता संघ आहे. आयसीसीच्या अधिपत्त्या खालील वनडे क्रिकेटचे विक्रमी सहा जेतेपद त्यांनी पटकविले असून, टि२० व कसोटीचे जागतिक विजेतेपदही प्रत्येकी एकदा मिळविले आहे. तर दोन वेळा चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा करताना एकंदर दहा आयसीसी स्पर्धा जिंकणारा ऑस्ट्रेलिया एकमेवद्वितीय आहे. एवढं मोठं जागतिक क्रिकेटवर अधिराज्य गाजविल्या नंतर त्यांच्या डोक्यात यशाची नशा चढणारच. पण ती इतक्या हिन दर्जाची असेल असे मात्र वाटले नव्हते. याचे काही गलिच्छ उदाहरणे आपण स्वतः ऐकले असतील मात्र ज्या कुणाला माहिती नाही त्यांनी येथे ते जर वाचले तर आपल्या रागाचा पारा अगदी थर्मामिटर फोडून बाहेर आल्याशिवाय राहणार नाही.
नुकतीच एकदिवसीय सामन्यांची तेरावी विश्वकरंडक स्पर्धा भारतात संपन्न झाली. या स्पर्धेत अनपेक्षितरित्या कांगारूनी अंतिम सामन्यात हॉट फेव्हरीट यजमान भारताला नमवून स्वतःचे सहावे विजेतेपद मिळवले. मात्र या अनाकलनीय यशाने ऑस्ट्रेलियन खेळाडू इतके बिघडले की त्यांच्या डोक्यात घुसलेली यशाची नशा इतकी रसातळाला गेली की त्यांचे पाय कुठे ठेवावेत याचे भानच ते हरवले. ज्या विश्वजेतेपदासाठी रक्ताचं पाणी केलं त्या ऑस्ट्रेलियन संघातील उन्माद आलेल्या मिचेल मार्श या खेळाडूने चक्क विश्वकरंडकावरच बुट घालून आपले घाणेरडे पाय ठेवत दारू ढोसत होता व त्याला असे करण्यापासून रोखण्याऐवजी त्याला प्रोत्साहन देण्यात त्याचे सहकारी खेळाडू आघाडीवर होते. वास्तविक विश्वकरंडक हा पायाखाली नाही डोक्यावर घेवून उराशी बाळगण्याचा पवित्र ठेवा आहे. मात्र हे गोऱ्या कातडीच्या काळी मनोवृत्ती असलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना सांगूनही समजत नाही. उलट हिच आमची संस्कृती असल्याचे ते निर्लज्जपणे सांगतात.
सन २०२१ मध्ये भारताच्या संयोजना अंतर्गत टि२० विश्वचषक स्पर्धा कोरोना प्रादुर्भावामुळे युएईत आयोजित करण्यात आली होती. तिच्यामध्येही कोणाच्या ध्यानी मनी नसताना ऑस्ट्रेलियाला विजेतेपद मिळाले. त्यानंतर सर्व संघाने मिळून विजयोत्सव साजरा केला. मात्र त्याचे वर्णन आपण वाचले तर आपणास उलटी नक्कीच होईल आणि नाही झाली तर आपल्याला मळमळल्यासारखे नक्कीच होईल. त्याचे असे झाले. सामना संपला, करंडक मिळाला मग सिलेब्रेशनची वेळ आली आणि यांच्यातला सैतान जागा झाला. दिवसभर पायात असलेला घामाने डबडबलेला प्रत्येकाचा एक बुट प्रत्येकाने हातात घेतला, त्यामध्ये मद्य (दारू) टाकून स्वतः पिलेच पिले पण आपल्या बुटातली दारू त्यांनी इतर खेळाडूंनाही पाजली. इतक्या नालायक व गलिच्छ वृत्तीचे हे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू असून त्यांच्यापासून कुठलाही आदर्श न घेण्याची शिकवण ते त्यांच्या असभ्य व असंस्कृत वागण्यातून जणू संपूर्ण जगालाच देत आहेत.
सन २००६ मध्ये भारतात झालेली चॅम्पीयन्स ट्रॉफी ऑस्ट्रेलियाने जिंकली. मुंबईत झालेल्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजला हरविल्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ तत्कालीन आयसीसी अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते परंपरेनुसार झाला. त्यावेळी शरद पवार यांनी करंडक ऑस्ट्रेलियन कर्णधाराच्या हाती दिला, मात्र त्यानंतर सामुहीक फोटो काढण्याच्या घाईत डेमियन मार्टिन या उन्मत्त खेळाडू चक्क शरद पवार यांनाच व्यासपिठावरून खाली ढकलले होते. वरिष्ठांचा मान राखणे इतकेही या नालायक ऑस्ट्रेलियन खेळाडूंना समजत नाही. हे त्यांच्यात नसलेल्या माणुसकी व असंस्कृतपणाचेच लक्षण नव्हे काय ?
इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यात एशेस ही मानाची व महान परंपरा असलेली मालिका खेळली जाते. यातील विजेत्याला मानाचा एशेस कप दिला जातो. ऑस्ट्रेलियन्सची असभ्यता व असंस्कृतपणा माहिती असल्यामुळे मुळ व मोठा एशेस करंडक संबंधितांच्या मालिकेतील विजेत्याला न देता त्याऐवजी त्याची प्रतिकृती असलेला छोटा करंडक दिला जातो. हे का देतात आता मनोमन पटू लागलं आहे.
अखिलाडूवृत्ती साठी कुप्रसिध्द ऑस्ट्रेलियन खेळाडू सध्या गर्वाच्या घरात राहात आहे. मात्र निसर्ग नियमानुसार गर्वाचे घर एकदा खाली होतेच. आता ती वेळ फार दूर नसेल हे मात्र पक्के !
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल नंबर - ९०९६३७२०८२.

