विश्वचषक स्पर्धा संपली, भारताचा अनपेक्षित पराभव झाला. भारतीय रसिक निराश झाले. त्यानंतर किमान भारतात तरी प्रेक्षक लवकर सावरणार नाहीत. असे अनेक तज्ञांचे मत बनले होते. मात्र विश्वचषकातल्या भारताच्या आकस्मिक पराभवानंतरही गुरूवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू झालेल्या पाच सामन्यांच्या द्विपक्षीय टि- ट्वेंटी मालिकेतील विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या सामन्याला प्रेक्षकांनी लावलेल्या अभूतपूर्व उपस्थितीने साक्षात क्रिकेटनेच तमाम प्रेक्षकांचे आभार मानले असेल. यामुळे एक बाब सिध्द होते की, भारतात क्रिकेट खरोखर लोकप्रिय तर आहेच पण भारतीय क्रिकेटरसिक परिस्थितीशी समरस होण्यास तत्पर आहेत.
दोन्ही संघांनी आगामी टि२० विश्वचषक स्पर्धेची तयारी म्हणून संघ बांधणीस सुरूवात करण्याच्या उद्देशाने नवीन खेळाडूंना चाचपून बघण्याच्या उद्देशाने संघात नवोदितांना संधी दिली. भारताने वनडे विश्वचषकात फारसी चमकदार कामगिरी न करणाऱ्या सुर्यकुमार यादवकडे संघाची धुरा दिली तेंव्हा अनेकांनी भुवया होत्या. मात्र बीसीआय व निवड समितीचं धोरण भविष्याच्या दृष्टीने साफ असल्याचं सामना संपल्यानंतर सर्वांच्याच लक्षात यायला वेळ लागला नसेल.
टि ट्वेंटी सामना म्हंटला की फलंदाजांची चांदी व गोलंदाजांची मुस्कटदाबीच असते. त्यातच जर सामना पाटा खेळपट्टीवर होणार असेल तर मग विचारूच नका. फलंदाज गोलंदाजांवर घणाघाती हल्ले करतात व गोलंदाज पुरते हतबल होऊन जातात व डावाच्या शेवटी त्यांचे पृथ:करण खूपच लाजिरवाणे होऊन बसते. अगदी अशीच घटना या सामन्यात झाली. यावेळी ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडने क्षणाचाही विलंब न लावता प्रथम फलंदाजी घेतली. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पॅट कमिन्सने प्रथम क्षेत्ररक्षण घेतले होते. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय यावेळीही सार्थ ठरवून भारतीय गोलंदाजांचे कंबरडेच मोडले. शमी, बुमराहा, सिराज, जडेजा, कुलदिप यांच्या अनुपस्थितीत मुकेशकुमार वगळता सर्वच गोलंदाजांची यथेच्छ धुलाई स्टिवन स्मिथ, जोश इंग्लिश यांनी केली. स्मिथने अर्धशतक केले तर इंग्लिशने पन्नास चेंडूत एकशे दहा धावा ठोकून दोनशे आठ अशी भक्कम धावसंख्या उभी केली. तेंव्हा एवढी मोठी धावसंख्या भारताचे नवखे फलंदाज पेलू शकतील का ? असा प्रश्न चर्चीला जाऊ लागला.
भारताच्या डावाची सुरुवात यशस्वी जयस्वालने उपकर्णधार ऋतूराज गायकवाडसह केली. मात्र दुहेरी धाव घेताना जयस्वालने गडबड केली व एकही चेंडू न खेळता ऋतूराज धावचित झाला. डायमंड डकचा बळी ठरण्याची आंतरराष्ट्रीय सामन्यातील ऋतूराजची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर जयस्वालही या दबावाचा सामना करु शकला नाही व एकवीस धावांवरच त्याचा प्रवास थांबला. त्यानंतर मात्र कर्णधार सुर्यकुमार यादव व ईशान किशनने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना जोरदार चोप देत भारताची धावगती कधीही घसरणार नाही याची दक्षता घेतली. ईशानने ५४ धावांची जलद खेळी केली सुर्यासाबतची त्याची शतकी भागिदारी भारतीय डावास सदृढता देऊन गेली. सुर्यकुमार यादवने ४२ चेंडूत ८० धावा ठोकून १९३ च्या सरासरीने धावगती राखताना भारताला अगदी विजयाच्या समीप नेले. मात्र रोहित शर्माच्या पावलावर पाऊल ठेवत निस्व:र्थी खेळी करण्याची त्याची पध्दत यावेळी विजय जवळ येऊनही अडचण वाढवते की काय अशी शंकेची पाल मनात चुक चुकून गेली. त्यानंतर तीन फलंदाज अक्षर पटेल, रवि बिश्नोई व अर्शदिप सिंग झटपट बाद झाले. त्यातील शेवटचे दोन आततायीपणाच्या नादात धावबाद झाले. मात्र नवा उभारता सितारा रिंकू सिंग एक बाजू लावून उभा होता. एवढया पडझडी नंतरही त्याने त्याची एकाग्रता सांभाळून धावसंख्या बरोबरी झाल्यानंतर शेवटच्या षटकात पाचव्या चेंडूवर सर्व क्षेत्रक्षकांनी त्याच्या भोवती कोंडाळे केल्यानंतरही घणाघाती घाव लावून गगनचुंबी षटकार खेचून भारताला दोन गडी राखून विजय मिळवून दिला. मात्र विजयाच्या धामधुमीत तिसऱ्या पंचांनी तो चेंडू नोबॉल असल्याची सायरन वाजवली. तेंव्हा अनेकांना काय झाले ते समजलेच नाही. मात्र नियमानुसार निर्णायक फटका मारण्यापूर्वी जी धाव आधी मिळाली तिच्यामुळे भारताचा विजय साकारला. मात्र रिंकूने मारलेला तो षटकार अधिकृत धावसंख्येत गणला गेला नाही. रिंकू शतकाच्या जवळ नव्हता. म्हणून षटकार न दिला गेल्यामुळे त्याचे काही नुकसान झाले नाही. संघ जिंकला याचे समाधान मात्र त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. एव्हाना षटकार मारताना त्याचा झेल घेतला असता तरी चेंडू नो बॉल असल्यामुळे नोबॉलची एक धाव मिळून भारत जिंकले असते व तो नाबादच राहिला असता.
दोनशे नऊ एवढी मोठी धावसंख्या गाठून भारताने प्रथमच इतके मोठे आव्हान पार केले. त्यामुळे भारतीय खेळाडूंमध्ये नवा उत्साह संचारेल व उर्वरीत मालिकेत टिम इंडिया आणखी जोमाने लढेल. या सामन्यात सुर्यकुमार यादवच्या धडाकेबाज खेळीमुळे भारताचा विजय साकार होण्यास मोठा हातभार लागला. टि२० चा खेळ सुर्याच्या तंत्राला साजेसा असल्याने येथे त्याच्या मनाप्रमाणे घडले. विश्वचषक स्पर्धेत सुर्याला योग्य प्रकारे न हाताळले गेल्यामुळे तो यशस्वी ठरू शकला नाही. यामध्ये सुर्यापेक्षा त्याला हाताळणारे संघ प्रबंधनच कमी पडल्याचे स्पष्ट झाले. तेथे त्याला त्याच्या मर्जी प्रमाणे खेळू न दिल्याने भारताच्या पदरी योग्य ते दान पडले नाही व याचा फटका खास करून अंतिम सामन्यात भारताला बसला.
एंकदर तीन फलंदाज वगळता भारताच्या फलंदाजांनी साफ निराश केले. कदाचित बऱ्याच दिवसांनी हे सर्व खेळाडू संघ म्हणून एकत्र खेळत असल्याने त्यांच्यात ताळमेळीचा अभाव दिसला असावा. पण त्याचा परिणाम तिन फलंदाज धावबाद होण्याने संघास भोगावा लागला. पुढे जात ते अनुभवाने सुधरतील. कर्णधार सुर्या भारताच्या क्षेत्ररक्षणावेळी काहीसा अपरिपक्व वाटला. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचा कर्णधार पहिलाच सामना असल्याने व तो जिंकल्यामुळे त्याच्याही आत्मविश्वासात भर पडेल व त्याचा फायदा पुढे जात संघाला व त्यालाही होईल. परंतु फलंदाज म्हणून त्याची छाप निव्वळ पडलीच असे नाही तर सुर्याच्या तेजाने कांगारू वाळवंडलेच नाही तर होरपळले असे म्हंटल्यास वावगे ठरू नये.
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल नंबर - ९०९६३७२०८२.

