स्वतः प्रामाणिक प्रयत्न करायचे नाही. दुसऱ्याचे यश देखवत नाही आणि आपल्याला मोठे फळ मिळावे म्हणून दुसऱ्याचे नुकसान होऊन आपला मोठा फायदा व्हावा. अशी जगातल्या सर्वात स्वार्थी व्यक्तीची मानसिकता असते. अगदी या धोरणात तंतोतंत बसतो तो पाकिस्तानी क्रिकेट संघ. सध्या भारतात सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत याच प्रकारची धारणा पाकिस्तानी क्रिकेट संघ, त्यांचे समर्थक व प्रसारमाध्यमे बाळगून आहेत व त्यासाठी खास करुन अल्लाहला साकडे घालून प्रामाणिक कष्ट व मेहनत करून वर आलेल्या संघाच्या अपयशासाठी मन्नते मागितल्या जात आहेत. यासाठी विशेष अशा कुदरत का निजाम या परवलीच्या शब्दाचा वापर करून थेट निसर्गालाच ब्लॅकमेलिंग करण्याचा अघोरी प्रयत्न सुरू आहे.
सध्या सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेला सुरूवात होण्यापूर्वी पाकिस्तानचा संघ आयसीसीच्या मानांकनात अव्वल स्थानी होता. त्यांचे फलंदाज व गोलंदाजही मोठ्या प्रमाणात पहिल्या दहा क्रमांकात होते. कर्णधार बाबर आझम तर मागील ९६१ दिवसांपासून प्रथम मानांकन काबीज करून बसला होता. त्यांचे हे सगळे कारनामे आयसीसीचे सहसदस्य देश, त्यांच्यापेक्षा कमी मानांकनाचे तुलनेने कमजोर असलेल्या नेपाळ, हाँगकाँग, युएई, झिंबाब्बे, आयर्लंड, नेररलँड, बांगलादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका या व इतर संघाविरूध्द केले होते. या संघांसोबत खेळताना मोठमोठे विजय तसेच धावांचे भले थोरले इमले बाबर व कंपनी उभारयचे. शिवाय शादाब खान, हारिस रौफ, मोहम्मद नवाज, शाहिन आफ्रिदी, नसिम शहा, हसन अली, इफ्तिखार अहमद व मंडळी पोत्याने बळी मिळवून आपला विक्रमांचा खजिना फुगवून ठेवत असे.
मात्र आशिया चषक, विश्वचषक तसेच बहुराष्ट्रीय स्पर्धेत त्यांच्या या महान कर्तृत्वाचा फुगा फुटतो आणि विजेतेपद सोडाच त्याच्या जवळपास पोहोचण्याचे त्राणही या पाकिस्तानी खेळाडू व संघात राहत नाही. विद्यमान विश्वचषकात त्यांचे खरे पितळ उघडे पडले आहे. नेदरलँड, श्रीलंका, बांगलादेश या तळाच्या संघांवर विजय हिच त्यांची या स्पर्धेतील मोठी कामगिरी आहे. त्यांचा चौथा विजय कुदरत का निजामचा प्रताप ठरला तो न्युझिलंडविरूध्द. बंगलोरच्या त्या सामन्यात न्युझिलंडने ४०० धावा करूनही पावसाच्या व्यत्ययामुळे सामना पूर्ण होऊ न शकल्याने डिएलएस प्रणालीचा लाभ पाकिस्तानला झाला व एक अनपेक्षित विजय झोळीत पडल्याने त्यांना थेट उपांत्य फेरीचे स्वप्न पडायला लागले. ते केवळ या चार विजयांमुळे शक्य नसल्याने इतर संघांच्या कामगिरीवर त्यांचे समिकरण अवलंबून होते. हे अवाक्यात नसलेले गणित जुळण्यासाठी मग हे पाकिस्तानी, हा संघ त्या संघा विरूध्द हरावा व त्याची धावगती याच्यापेक्षा कमी राहावी व आम्हाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळावा. असा धावा अल्लाहकडे करू लागले.
पाकिस्तानचे हेच खेळाडू फिटनेस मध्ये सर्वात रद्दाड आहे. मेहनत करायला टाळाटाळ करतात. फलंदाजी, गोलंदाजीचा तांत्रिक व कौशल्यमय सराव करण्यात कुचराई करतात. क्षेत्ररक्षणाचा सराव तर यांना जीव घेणा वाटतो. बिर्याणी खाण्यात यांना कोणीच मागे टाकू शकत नाहीत. संघात अंतर्गत राजकारण, हेवेदावे करतात. स्वत:चे व मित्र परिवारांचे हित कसे साधले जाईल यावरच जोर देतात. सध्याचा पाकिस्तानी संघ तर कर्णधार बाबर आझमचा दोस्ती यारी फ्रेंडस इलेव्हन क्लब असल्याचाच बोलबोला सगळीकडे आहे. संघातले सर्व खेळाडू कर्णधाराच्या मर्जीतलेच असल्यावर त्यांच्यावर कोणाचाच धाक नसणार हे उघड आहे, आणि मग या परिस्थितीत संघाची कामगिरी खालावणार नाही तर मग काय होईल ?
पाकिस्तानमध्ये असं एकही क्षेत्र नाही की त्यात राजकारण्यांचा प्रभाव नाही. क्रिकेटमध्ये पैसा मोठ्या प्रमाणात असल्याने येथे हक्क सांगायला अनेक जण डूख धरून बसलेले असतात. क्रिकेट तर केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधानाच्या आश्रयाखाली चालते. त्यामुळे क्रिकेट बोर्ड राजकरणाचा अड्डाच असतो. नुकतेच खेळाडूंची आर्थिक गुंतवणूक असलेल्या एका कंपनीत निवड समिती प्रमुख इंझमाम उल हक याला हितसंबंध जोपासल्याच्या कारणावरून पदावरून हाकलले आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाची न्युझिलंड - श्रीलंका सामन्यावर मोठी नजर होती. या सामन्यात श्रीलंका जिंकली असती तर उपांत्य फेरीचे दरवाजे पाकसाठी उघडू शकत होते. मात्र न्युझिलंडच्या विजयाने पाकिस्तानचे स्वप्न चक्काचूर होण्याची लक्षणे आहेत. तसे पहाल तर पाकिस्तानचा इंग्लंडविरूध्द शेवटचा साखळी सामना शनिवारी होणार आहे. मात्र त्याच्यात पाकला विजय मिळवायचे असेल तर त्यांनी त्यांच्या क्रिकेट इतिहासात आजवर न केलेली कामगिरी करून इंग्लंडला हरवायचे आहे. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली तर इंग्लंडला २८७ धावांनी हरवायचे आहे आणि दुसरी फलंदाजी केली तर इंग्लंडने ठेवलेले टारगेट सोळा चेंडूत पूर्ण करणे गरजेचे आहे. पाकिस्तानी खेळाडूंची मानसिकता व सध्याचा फॉर्म बघता याच्या जवळपास फिरायचीही त्यांची कुवत आहे असे वाटत नाही. त्यामुळे आयजीच्या जीवावर बायजी उधार ठेवण्याचे पाकिस्तानचे दिवस संपले असल्याचे प्रतित होऊन दिवाळीच्या आधी आपला गाशा गुंडाळून त्यांना मायदेशी जावं लागेल.
टिम इंडियाने या स्पर्धेत नेहमी प्रमाणे साखळीमध्ये सर्व सामने जिंकून अव्वल स्थान गाठले. भारतीय फलंदाजांनी अफलातून कामगिरी केली. जलदगती गोलंदाज स्विंग व सिमचा योग्य उपयोग करतात. फिरकी गोलंदाज आपल्या बोटे व मनगटाच्या जादूने प्रतिस्पर्धी फलंदाजांना नाचवतात. क्षेत्ररक्षकही जीव तोडून प्रयत्न करतात. नाणेफेकीचा कौलही योग्य वेळी भारताच्या बाजूने पडतो. या सर्व बाबी पाकिस्तानचे काही माजी खेळाडू, भारताचा द्वेष करणारे व काही विघ्नसंतोषी महाभागांना पचनी पडत नाही. यामध्ये भारताने स्वतःच्या फायद्यासाठी षडयंत्रे रचली असून आयसीसीच्या मदतीने भारत गैरफायदा घेत असल्याचे रडगाणे सुरू केले आहे. शिवाय खेळपट्टयाही आपल्याच सोयीच्या बनवून भारत विश्वचषक जिंकण्यासाठी प्रयत्न करत असून सगळे सामने फिक्स असल्याचा जावईशोध पाकिस्तानची काही नाठाळ मंडळी करत आहे.
या मागे बीसीसीआय, भारतीय खेळाडू, टिम मॅनेजमेंट यांचे कष्ट व मेहनत किती आहे याच भानही पाकिस्तानच्या काही विघ्नसंतोषी लोकांना नसल्याने विनाकारण भारताविषयी गैरसमज पसरविले जात आहे. पाकिस्तानला जर खरोखर विश्वविजेते व्हायचे असेल तर त्यांनी अंतर्गत राजकारण थांबवावे, योग्य खेळाडूंच्या निवडी कराव्यात, खेळपट्टयांचा दर्जा सुधारावा, दर्जेदार व वरच्या मानांकनाच्या संघांसोबत सातत्याने खेळावे, मेहनतीत कुचराई करणे सोडून द्यावे. पोषक आहार घ्यावा. या बाबी साधल्या तर पाकिस्तानला कुणाच्याही कोणत्याच उपकार व मदतीची गरज लागणार नाही. त्यासाठी त्यांनी पहिला भारत द्वेष थांबवला पाहिजे. नाही तर त्याच तिकीटावर तोच खेळ सुरूच राहील.
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल नंबर - ९०९६३७२०८२.

