shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निळवंडे धरणातील दोन टी. एम.सी.पाणी शासनाच्या पाणीवाटप निर्णयानुसार आरक्षित करावेः माजी आ.भानुदास मुरकुटे


श्रीरामपूर प्रतिनिधी:
आमदार असताना मी निळवंडे धरण बिनकालव्याचे व्हावे अशी मागणी केली होती.ती मान्य झाली असती तर आज पाटपाण्याला मुकावे लागले नसते. निळवंडेच्या पाणीसाठ्यावर श्रीरामपूर, राहुरी व नेवासे तालुक्यांचाही हक्क असल्याने पाणी उपलब्धतेचे दाखले घेवून शासकीय खर्चाने बांधलेले   प्रवरा नदीवरील को,प. बंधारे,टाकळीभान,मुठेवाडगाव टेलटँकसह ओढ्यांवरील बंधारे,पाझर तलाव आदिंसाठी शासनाच्या  पाणी वाटप निर्णयातील तरतुदीनुसार निळवंडे धरणातील दोन टी.एम.सी.पाणी आरक्षित करावे, अशी मागणी माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केली आहे.      

     
                 जायकवाडी धरणासाठी भंडारदरा व निळवंडे धरणातून ३.३६ टी.एम.सी. पाणी सोडण्याचे निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना श्री.मुरकुटे म्हणाले की, समन्यायी पाणी वाटप कायदा हा अन्यायकारक आहे. या कायद्यातील तरतूदीमुळे आजची बिकट स्थिती उदभवली आहे.भविष्यात भंडारदरा लाभक्षेत्राचा पाणीप्रश्न गंभीर होणार आहे.मी आमदार असताना निळवंडे धरण हे बिनकालव्याचे व्हावे अशी आग्रही मागणी केली होती.पण ती निळवंडेचे लाभधारक असणाऱ्यांच्या  राजकीय दबावामुळे मान्य झाली नाही.निळवंडे आपल्या मागणीनुसार बिनकालव्याचे झाले असते तर आपले भागाला १९.५ टी.एम.सी.पाणी उपलब्ध झाले असते.सन २००३ मध्ये समन्यायी पाणी वाटप कायद्याचे विधेयक आले तेव्हा मी आमदार असतो, तर हा कायदा संमत होवू नये यासाठी प्रयत्न केले असते असे श्री.मुरकुटे म्हणाले.                                                  नुकतेच निळवंडेचे कालवे कार्यान्वित झाले आहेत.या धरणाचे पाणी अकोले,संगमनेर व राहाता तालुक्याला मिळणार असल्याने त्यांना लाभ होईल.तर श्रीरामपूर ,राहुरी वा नेवासा तालुक्यांचे नुकसान होणार आहे. आजवर आपल्याला भंडारदरा धरणाचे ११ टी.एम.सी.व निळवंडेचे ८.५ टी.एम.सी.पाणी मिळून १९.५ टी.एम.सी.पाणी मिळत होते.पण निळवंडेचे कालवे कार्यान्वित  झाल्याने निळवंडेचे मिळणारे  ८.५ टी.एम.सी.पाणी कमी होणार आहे.निळवंडेच्या पाण्याचा संगमनेर व राहाता तालुक्यांना सर्वाधिक लाभ आहे.तर श्रीरामपूर तालूक्यातील दिघी या एकमेव गावाला निळवंडेचे पाणि मिळणार असल्याने श्रीरामपूर तालुक्याला निळवंडेचा काहिच फायदा नसून उलट नुकसान होणार आहे.
                श्री.मुरकुटे यांनी पुढे नमुद केले की,नुकत्याच झालेल्या निर्णयानुसार भंडारदरा धरणातून २ टी.एम.सी. व निळवंडे धरणातून १.३६  टी.एम.सी, असे एकुण ३.६ टी.एम.सी. पाणी जायकवाडीसाठी सोडले जाणार आहे. याशिवाय खरीपासाठी वापर झालेल्या पाणीही हिशोबात धरले जाणार आहे.भंडारद-यातून २ टी.एम.सी.पाणी जायकवाडीसाठी सोडले जाणार  असल्याने आपल्या भागासाठी भंडारदर्‍याचे केवळ ९ टी.एम.सी. पाणी उपलब्ध असणार आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.                                      सन १९८९ च्या पाणी वाटप निर्णयानुसार भंडारदरा धरणाचे तालुकानिहाय पाणी वाटप झाले आहे.या वाटपानुसार अकोले (१२%), संगमनेर (१८%) राहाता (१६%), श्रीरामपूर (३६%), राहुरी (१५%) व नेवासा (३%) असे पाणी निर्धारित केले आहे. ही टक्केवारी ओव्हरफ्लोच्या पाण्यासाठीही लागू आहे. निळवंडे धरण हे ओव्हरफ्लोवर बांधले असल्याने यातील धरण साठ्यावर श्रीरामपूर, राहुरी व नेवासा तालुक्यांचा निर्धारित  टक्केवारीनुसार हक्क आहे. प्रवरा नदीवरील को.प.बंधारे, टाकळीभान व मुठेवाडगाव टेलटँक,ओढ्यांवरील बंधारे,दगडी साठवण बंधारे ,पाझर तलाव आदी कामे शासकीय खर्चाने झाली आहेत.हि कामे करताना 'पाणी उपलब्धतेचे दाखले' घेण्यात आले होते.हे सर्व मुद्दे लक्षात घेवून पाणी वाटप निर्णयानुसार  निळवंडे धरणातील २ टी.एम.सी. पाणी आरक्षित ठेवावे अशी मागणी श्री.मुरकुटे यांनी केली असून गावगावच्या ग्रामपंचायत,संस्था आदिंनी याबाबतचे ठराव करुन मागणी करावी असे आवाहन केले आहे.

*पत्रकार इम्रान एस.शेख - श्रीरामपूर
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close