कामचुकार शिक्षकांवर कारवाई
करण्याची शिक्षकांचीच मागणी
अहमदनगर प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादी यावेत यासाठी सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यातून निवडक ३०० विद्यार्थी निवडून त्यांच्यासाठी ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.
शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची ओळख व्हावी म्हणून राज्य परीक्षा परिषदेतर्फे दरवर्षी पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाते. जिल्हा परिषदेसह सर्व माध्यम, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील विद्यार्थी यात सहभाग नोंदवतात. परंतु असे असतानाही या परीक्षेचा निकाल फारच कमी लागतो. मागील वर्षी जिल्ह्याचा पाचवीचा निकाल २६ टक्के, तर आठवीचा निकाल १६.८७ टक्के एवढाच होता.त्यामुळे या निकालात वाढ व्हावी, तसेच राज्याच्या गुणवत्ता यादीत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा समावेश व्हावा,यासाठी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील,माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत जिल्ह्यात अनेकदा शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेण्यात आल्या.शिवाय शालेय स्तरावर जादा तासही घेण्यात आले.त्याच धर्तीवर आता निवडक ३०० विद्यार्थ्यांची निवड
करून त्यांची विशेष तयारी करून घेतली
जाणार आहे. पुढील वर्षीची शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार आहे.त्या परीक्षेच्यादृष्टीने हे नियोजन सुरू आहे.
१ डिसेंबर २०२३ रोजी तिसरी ते आठवीपर्यंतच्या सर्व माध्यम, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील विद्यार्थ्यांची नवोदय व शिष्यवृत्ती पूर्वतयारी सराव परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार आहे.या परीक्षेचा निकाल त्याच दिवशी जाहीर करून जिल्हास्तरावर गुणवत्ता यादी तयारी केली जाईल.त्यात पाचवीचे १५० व आठवीचे १५० असे एकूण ३०० विद्यार्थी निवडले जातील.त्यांचे पुढे मुख्य परीक्षेपर्यंत ऑनलाईन वर्ग घेतले जातील.
*ऑनलाईन सत्राचे स्वरूप पुढीलप्रमाणे राहणार आहे-
सर्व माध्यम, सर्व व्यवस्थापन शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी संधी, निवडीसाठी १ डिसेंबरला ऑफलाईन परीक्षा,जिल्ह्यातील तज्ज्ञ शिक्षकांमार्फत मार्गदर्शन,३ डिसेंबर २०२३ ते १६ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ऑनलाईन सत्राचे आयोजन,ऑनलाईन तासिकेची लिंक निवडलेल्या विद्यार्थ्यांना पाठवण्यात येईल. तासिकेची वेळ दररोज सकाळी ७ ते ८. विद्यार्थ्यांसह त्यांचे वर्गशिक्षकही सहभागी होणार.
*प्रशासनाचे धोरण प्रशासनामुळेच फेल
मागील दोन-तीन वर्षापासून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे यांच्या विशेष आग्रहास्तव जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून शिष्यवृत्ती परीक्षेतील परीक्षार्थींची फी भरली जाते. त्याचबरोबर नियमित सराव परीक्षा घेतल्या जातात.त्यासाठीचे परीक्षा प्रश्नपत्रिका देखील जिल्हास्तरावरून पुरविल्या जातात. शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील यांनी यासंदर्भात विशेष नियोजन करून संपूर्ण शिक्षण विभागाची यंत्रणा शिष्यवृत्ती परीक्षेसाठी कामाला लावली आहे.दर आठवड्याला सराव परीक्षा घेतली जाते. दररोज शाळेमध्ये सकाळी जादा तास घेतला जातो.परंतु या जादा तासाला काही शिक्षक दांडी मारतात अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. जिल्ह्यातील पाचवीचे वर्ग शिक्षकांवर या निमित्ताने मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.काही शाळांमधून पाचवीचे वर्ग शिक्षक तसेच मुख्याध्यापक हे अतिशय काळजीने शिष्यवृत्तीची तयारी आपल्या मुलांकडून करून घेतात तर काही शाळांमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेकडे खूपच दुर्लक्ष आहे. जादा तास घेतले जात नाहीत.शिक्षक या तासाला येतच नाहीत अशी सुद्धा परिस्थिती आहे.याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी ही जबाबदारी गटशिक्षणाधिकाऱ्यांवर सोपवली आहे.परंतु नगर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बाबुराव जाधव वगळता या संदर्भात जिल्ह्यात इतर ठिकाणी गटशिक्षण अधिकारी यांनी हा विषय फारशा गांभीर्याने घेतलेला नाही असे दिसते.विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख हे सुद्धा या संदर्भात पर्यवेक्षीय यंत्रणा म्हणून शिष्यवृत्ती परीक्षेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आज तरी दिसून येते. ऑनलाइन परीक्षेतून जे विद्यार्थी निवडले जातील फक्त त्यांचीच तयारी होईल इतर विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होईल अशी भीती काही जाणकार शिक्षकांनी व्यक्त केली आहे.या संदर्भात जिल्हा परिषदेने तिसरी ते पाचवीच्या वर्गासाठी जादा तासांचे नियोजन दिले असताना जिल्ह्यात ठराविक शाळा सोडल्या तर इतर शाळांमध्ये याबाबत फारसे गांभीर्य दिसून येत नाही.त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल मागच्या वर्षी पेक्षा यावर्षी वाढतो की कमी होतो हे परीक्षेचा निकाल लागल्यावर दिसून येईल.
ज्या ठिकाणी पहिली ते सातवीचे वर्ग आहेत तेथे पाचवी,सहावी व सातवीच्या वर्ग शिक्षकांनी शिष्यवृत्ती परीक्षेच्या वर्गाला अध्यापन करणे अपेक्षित आहे.मात्र पाचवीचे वर्ग शिक्षक वगळता इतर शिक्षक त्यांना सहकार्य करीत नसल्याचे चित्र आहे. बऱ्याच ठिकाणी मुख्याध्यापकांना सुद्धा शिक्षक जुमानित नाहीत असे दिसते तर काही ठिकाणी सर्वजण मिळून अतिशय परिश्रमपूर्वक कार्य करतांना दिसून येत आहेत.शिष्यवृत्ती परीक्षा संदर्भात दिसून येणारा हा विरोधाभास संपवण्यासाठी शिक्षण अधिकाऱ्यांनी विशेष पथक नेमून त्या मार्फत शिक्षकांना मार्गदर्शन करावे व शिष्यवृत्ती परीक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करावी अशी मागणी पाचवीच्या अनेक वर्ग शिक्षकांनी केली आहे.या परीक्षेकडे केंद्रप्रमुखांचे सपशेल दुर्लक्ष होते.मात्र आता नवीन केंद्रप्रमुखांची नियुक्ती झाल्यामुळे हे नवीन कारभारी कशा पद्धतीने शिष्यवृत्ती परीक्षा आपल्या केंद्रात हाताळतात यावर या परीक्षेचे यश अवलंबून आहे.
ग्रामीण भागातील पालक अशिक्षित असल्याने ते या परीक्षा संदर्भात मुलांच्या तयारीकडे फारसे लक्ष देत नाही सर्व तयारी शाळा पातळीवरच करून घ्यावी लागते त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी वाढली आहे ज्या शाळांमध्ये सामूहिक पद्धतीने या परीक्षेसाठी परिश्रम केले जातात त्या शाळांचा निकाल अतिशय चांगला लागतो असे जिल्ह्यात उदाहरणे आहेत मात्र बहुतांश ठिकाणी मुख्याध्यापक व शिक्षक यांनी शिष्यवृत्ती हा विषय गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत नाही.
पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

