भारताचे यश अनेकांना आवडत नाही. काही ना काही पिल्लं काढून रंगाचा भंग करण्याची लत लागलेल्या नतभ्रष्टांना त्यांची जागा दाखवून टिम इंडियाने धडाक्यात अंतिम फेरी गाठून विश्वकरंडकाचे आपणच असली दावेदार आहेत हे दाखवून दिले. बुधवारी अरबी समुद्राच्या निळ्याभोर पाण्यालाही फिके पाडील असे भारतीय समर्थकांच्या निळ्या जर्सीतील अफाट गर्दीने भरलेल्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील वातावरण भारतीय खेळाडूंमध्ये वेगळाच संचार करून गेले. सामन्याच्या सुरुवातीलाच इंग्लिश मिडीयामध्ये एक सनसनाटी वृत्त प्रसिद्ध झाले की, भारताने आयसीसीने ठरवून दिलेली सहा नंबरची खेळपट्टी सामन्यासाठी न घेता फिरकीला साथ देणारी अर्थात स्वतःच्या फायद्याची क्रमांक दोनची खेळपट्टी सामन्यासाठी निवडली. मात्र प्रत्यक्ष सामन्यात दोन्ही संघांकडून धावांचा जो पाऊस पडला व फिरकी गोलंदाजांना बळी मिळविण्यासाठी अक्षरक्ष: धावांचे मोल खर्चावे लागले. तरी सुध्दा ते मोठा डल्ला मारू शकले नाहीत.
दुसरीकडे भारताचा पारंपारीक "हितचिंतक" पाकिस्तानमधून स्वतःच्या नाकर्तेपणाला झाकण्यासाठी भारताला बदनाम करण्याची जराही संधी सोडली जात नाही. भारताला जिंकण्यासाठीच सदर स्पर्धेचे आयोजन कसे करण्यात आले. खेळपट्टया भारताच्या सोयीच्याच बनवल्या जातात. स्टेडियममध्ये लावलेल्या फ्लड लाईटमध्ये प्रतिस्पर्ध्यांना त्रास व्हावा हाच मुख्य उद्देश असतो. पंच भारताच्या फेव्हरमध्येच असतात. डिआरएसचा लाभ भारतालाच कसा इंतरापेक्षा जास्त दिला जातो. सर्व सामनेच फिक्स केले जातात. या नेहमीच्या आरोपांशिवाय नाणेफेकीसाठी नाणे उडवताना कर्णधार रोहित शर्मा मुद्दाम नाणे लांब उडवतो व मैदानावरील मॅच रेफ्री नाणेफेक भारताने जिंकली नसली तरी भारतच नाणेफेक जिंकला असे सांगतो. असा जावई शोध पाकिस्तान कडून दिर्घ काळ कसोटी खेळलेल्या वेगवान गोलंदाज सिकंदर बख्त याने करून आपल्या भारत द्वेषाचे संपूर्ण जगासमोर वक्तव्य केले. प्रत्यक्ष नाणेफेकीवेळी ५ ते ६ लोक तिथे असतात व डोळ्यातलं कुसळही शोधून काढतील असे शक्तीशाली कॅमेरे मैदानाच्या कानाकोपऱ्यात बसवलेले असताना हवेत उडवलेलं नाणं कोणाच्या बाजूने पडलं हे चित्रीत होत नसेल ? का त्यावेळीही ते कॅमेरे बंद करून ठेवले जातात ? असा नवा शोध या नतभ्रष्टांनी लावला नाही तर बरे होईल.
नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागताच कर्णधार रोहित शर्माने फलंदाजीचा निर्णय घेतला. आघाडीला येऊन शब्दशः लिडींग फ्रॉम फ्रंट हे काय असतं हे रोहित शर्मा सातत्याने या स्पर्धेत करत आला. ते त्याने या सामन्यातही करून संघाला आक्रमक सुरूवात करून दिलीच. शिवाय स्वतःचे शतक -अर्धशतक - विक्रम व्हावेत याची कुठलीही लालसा न ठेवता त्याने समोर येईल त्या गोलंदाजाला सरळ सिमारेषेपार फेकून देण्यात कुठलीही कुचराई न केल्याने संघाला मजबूत सुरुवात मिळाली व त्याचा लाभ नंतरच्या फलंदाजांनी उचलला. शुभमन गिलनेही कर्णधाराच्या पावलावर पाऊल ठेवत आक्रमक खेळी केली खरी परंतु मुंबईची उष्णता त्याला असह्य झाली. पायात गोळे येऊ लागल्याने शतक खुणावत असताना मैदान सोडावे लागले.
विराट कोहलीच्या बॅटला जणू धावांचा परिसस्पर्शच झालाय. हवे तेंव्हा धावा व हवे तेंव्हा शतक ठोकत त्याने संघाला मजबूती दिलीच. पण ज्या क्रिकेटच्या देवाची भक्ती करता करता मोठा झाला त्याच क्रिकेटच्या देवासमोर म्हणजे साक्षात भारतरत्न सचिन तेंडूलकर समोर त्याच्याच कर्मभूमीत त्याचाच ४९ शतकांचा व एका विश्वचषकात सर्वाधिक ६७३ धावांचा विक्रम मोडून तेही सचिनच्या २४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा श्रीगणेशा झाला होता त्याच दिवशी हा पराक्रम साकारला.
श्रेयस अय्यर अखूड टप्प्याच्या चेंडूंना अडखळतो हे जगजाहीर झालं होतं. विरोधी कर्णधार व गोलंदाजही त्याच्या या कमजोरीचा लाभ उठवत होते. या बाबीवर त्याने पूर्ण तोडगा काढल्याचे मागील चार डावातील त्याच्या खेळावरून दिसले. सलग दुसऱ्या शतकाने श्रेयसने भारतीय डावाला भव्यतेचा आकार दिला. लोकेश राहुलनेही आपली फलंदाज म्हणून भूमिका शानदारपणे वठविताना यष्टीरक्षणातही कमालीचा प्रभाव दाखवला त्यामुळे गोलंदाजांचे श्रम सार्थकी लागले.
भारताने ३९७ धावांचा डोंगर उभा केला तेंव्हा मागील सामन्यांप्रमाणे भारतीय गोलंदाज यावेळीही किवीज फलंदाजांचं शिकरण करतील असं वाटलं होतं. तशी मोहम्मद शमीने दोन बळी मिळवून सुरुवातही करून दिली होती. मात्र त्यानंतर डॅरेल मिचेल व कर्णधार विल्यमसनने भारतीय खेळाडूंच्या तोंडचे पाणी पळविताना जल्लोषाने न्हाऊन निघालेल्या समस्त प्रेक्षकांना भर स्टेडियममध्ये पिन ड्रॉप सायलेन्स केले होते. त्या दरम्यान भारताचे क्षेत्ररक्षणही सुमार दर्जाचे झाले. हातातले सोपे झेल सुटले. गोलंदाज निष्प्रभ दिसत होते, वाईड चेंडूची खैरातही सुरू होती. एरव्ही उत्साहाने संचारलेला कर्णधार रोहित शर्माही बावरल्यासारखा दिसत होता.
त्यातच किवी कर्णधार केन विल्यमसनचा लॉलीपॉप झेल मोहम्मद शमी कडून सुटल्याने तो या महानाट्याचा खलनायक तर होणार नाही ना ? अशी शंकेची पाल मनात चुकचुकत असताना त्याच शमीने न्युझिलंडचा वरचढ ठरू पाहणारा डाव उधळवताना जम बसलेल्या विल्यमसन व टॉम लॅथमला एकाच षटकात माघारी धाडून सुस्त झालेलं वानखेडे स्टेडियम जागं केलं आणि शमीचं तुफान सात बळी घेऊन थंडावलं तेंव्हा न्यूझिलंडचं आव्हानही अरबी समुद्रात वाहून गेलं.
दमट वातावरणात प्रतिकुल परिस्थितीत शरीर साथ देत नसताना दमदार शतक ठोकून न्युझिलंडला बाहेर काढायचा प्रयत्न करणाऱ्या डॅरेल मिचेलची खेळी भारतीयांच्या डोळयात खुपणाऱ्या आखाचं काम करत होती. परंतु मोहम्मद शमीने त्यालाही आपल्या जाळ्यात घेरले. शेवटच्या टप्प्यात कुलदिप, बुमराहा यांनीही धारदार कामगिरी केली, त्यामुळे भारताला सत्तर धावांचा मोठा विजय मिळालाच परंतु बहुचर्चित आयसीसी स्पर्धांच्या नॉकआऊट सामन्यात न्युझिलंडला हरविण्याचे कठीण कार्यही पार पाडून विश्वविजेता बनण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले.
भारताचा कर्णधार रोहित शर्मा भले मागच्या विश्वचषक स्पर्धेत ठोकलेल्या पाच शतकांइतकी कामगिरी करू शकला नसला तरी केवळ संघाचं हित महत्वाचं समजून स्वार्थी पणाचा लवलेशही त्याला शिवला नसल्याने त्याच्या बिनधास्त खेळाचं सर्वत्र कौतुक होत आहे. शिवाय विक्रम करण्यात तोही मागे नाही. मात्र तो विक्रसाठी खेळत नाही तर विक्रम आपोआप होत आहे. या स्पर्धेत सर्वात षटकार मारणारा फलंदाज रोहित ठरलाच शिवाय विश्वचषकांच्या इतिहासातही सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज म्हणून त्याचेच नाव रेकॉर्ड बुकात नोंद झाले.
एकंदर या स्पर्धेत सर्वांगसुंदर खेळ करत टिम इंडियाने टिकाकारांसह सर्वांनाच ठोस उत्तर देऊन अंतिम फेरी गाठली आहे. अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी कोणीही असो त्याला लोळविण्याची क्षमता या संघात नक्कीच आहे. मात्र निर्णायक क्षणी एकमेकांची जिरवण्याची वाईट प्रवृत्ती जागृत होऊ नये इतकंच. कारण भारताला इतर प्रतिस्पर्धी नाही तर अंतर्गत राजकारणच हरवू शकते. या स्पर्धेत आता पर्यंत असं काही झालं नाही व तसे होऊ नये. परंतु यापूर्वी असे झाले असल्याने मनात भितीची पाल चुकचुकतेय.
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल नंबर - ९०९६३७२०८२.

