*भरतवाडी फेस्टिवल मोठ्या उत्साहात संपन्न*
इंदापूर प्रतिनिधि: काटी गावांमधील भरतवाडी या ठिकाणी १३ व १४ नोव्हेबर या दिवशी भरतवाडी फाऊंडेशनच्या वतीने फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते.भरतवाडी फाउंडेशनचे अध्यक्ष सेवानिवृत्त सह्ययक पोलीस अधिक्षक दिनकर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली या फेस्टिवल मध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले त्यामध्ये पहिल्या दिवशी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.बिजवडी व काटी आरोग्य केंदाचे वैद्यकीय अधिकारी व सहाय्यक आरोग्य सेविका यांच्या वतीने जवळपास २५० लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.यामध्ये ब्लडप्रेशर, शुगर ,थायरॉईड, तसेच रक्ताच्या विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या.नेत्र तपासणी शिबिर कृष्णदृष्टी हॉस्पिटल इंदापूर यांच्या माध्यमातून घेण्यात आले. यामध्ये जवळपास १३० लोकांची नेत्र तपासणी करण्यात आली. मुक्ताई ब्लड बँक इंदापूरच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले.याप्रसंगी शिबिराचे उद्घाटक म्हणून इंदापूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ कल्पना खाडे यांनी फाउंडेशन राबवत असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच ग्रामीण भागातील लोकांनी आरोग्य बाबतीत दक्ष राहून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन केले. तसेच आय.एम.ए.च्या माध्यमातून गावास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ मिलिंद खाडे, डॉ गीता मगर व शासकीय डॉक्टर आणि आरोग्य सेविका उपस्थित होते.
रांगोळी स्पर्धा,मैदानी खेळ,स्लो सायकल स्पर्धा,धावणे अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. महिलांसाठी होम मिनिस्टर व दांडियाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये महिलांचा प्रतिसाद उत्स्फूर्त होता. फेस्टिवलच्या दुसऱ्या दिवशी वृक्षारोपण निबंध स्पर्धा व स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले. मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, मोठ्यांना ताणतणावातून दोन दिवस विरंगुळा मिळण्यासाठी व दिवाळीच्या सुट्टीत गावाकडे आलेल्या सर्वांनी एकत्र यावे यासाठी हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो.यामध्ये लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी मनमुराद आनंद घेतला. हे दोन दिवसीय फेस्टिवल यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी खूप मेहनत घेतली. फेस्टिवलचे आयोजन उत्कृष्ट पद्धतीने झाल्यामुळे पुढच्या वर्षी अशाच पद्धतीने फेस्टिवल आयोजित करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली.

