shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पाकिस्तान क्रिकेटमधील उलथापालथ व भारताविषयीची द्वेषभावना..



              भारत हा एक सहिष्णू देश आहे. कोणत्याही प्राणी अथवा व्यक्तींना आदर व प्रेम देण्यात कुठलीही काटकसर न करणे हि भारतीय संस्कृतीच आहे. वेळप्रसंगी आपले नुकसान झाले तरी कोणताही भारतीय समोरच्याला त्रास होऊ देणार नाही. मग परस्त्री बाबत भारताचा प्रत्येक नागरिक मानाची व सन्मानाची भावना ठेवूनच वागतो. आपल्या बोलण्यातून स्त्रीयांबद्दल गैरसमज अथवा अनादर होणार नाही हा प्रत्येक भारतीयाचा धर्मच आहे. तर दुसऱ्यांच्या चांगुलपणाचे कौतुक करणे हे प्रत्येक भारतीय आपले कर्तव्यच समजतो. आपल्याकडून चांगले कर्म करणाऱ्याला भारतीय माणूस आदरयुक्त वागणूक देतोच शिवाय त्या व्यक्ती पासून जितकं शक्य होईल तितके चांगलं शिकण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्या चुका देखील दुरुस्त करून परिपूर्ण होण्याचा प्रयत्न भारतीय व्यक्ती सातत्याने करत असतो मग ते कोणाकडूनही शिकता आले तरी. या सद्गुणांमुळेच भारतीय संस्कृतीला जगभर मानाचे स्थान आहे.


                  मात्र याच्या उलट वागणं काही वर्षांपूर्वी भारताचाच एक भाग असलेला व नंतर इंग्रजांच्या कुटील कारस्थांनामुळे भारतापासून दूर झालेल्या पाकिस्तानमधून सातत्याने होत आहे. आपली लायकी व क्षमता नसतानाही प्रत्येक गोष्टीत भारताशी प्रतिस्पर्धा व बरोबरी नव्हे वरचढ ठरण्याचा प्रयत्न पाकिस्तानमधून नेहमीच होत आला आहे. खरं बघाल तर भौगोलिक, आर्थिक, सामाजिक, राजकिय, क्रिडा, शैक्षणिक व इतरही अनेक बाबीत भारत पाकिस्तानच्या कित्येक पट पुढे आहे परंतु गोष्टीतल्या बेडकाप्रमाणे त्यांची गत झाली आहे. बैलासारखं फुगण्याच्या नादात स्वतः फुटून गेले तरी त्यांची गुर्मी कमी होत नाही.
              मागील दिड महिन्यापासून भारतात विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेत जगभरातील दहा नामांकित संघांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी प्रत्येक संघ आयसीसी व बीसीसीआयच्या संयुक्त आयोजनात स्पर्धेच्या नियोजन व नियमाप्रमाणे खेळला. खेळात हार जीत असतेच. याच भावनेतून सर्व देश खेळले व आपला स्पर्धेतला प्रवास संपल्यानंतर स्वतःच्या मायदेशी परतलेही. स्पर्धेदरम्यान बीसीसीआयकडून सर्वांनाचा सुखकर वाटतील अशा सुविधा दिल्या. पाकिस्तानच्या खेळाडूंसह प्रत्येकाने त्याचे स्वागतही केले. प्रत्यक्ष सामन्यावेळी भारतीय प्रेक्षकांनी मैदानात हजेरी लावून संबंधीत संघांना प्रोत्साहीतही केले. खेळपट्टयाही सर्वांना समान न्याय देणाऱ्याच होत्या. कोणत्याही संघाला सापत्न वागणूक बीसीसीआयकडून मिळाली नाही.
               मात्र पाकिस्तानातील काही भारत द्वेष असणाऱ्या व्यक्तींनी प्रत्येक गोष्टीत भारताच्या चुका शोधण्याच्या व भारत कसा पक्षपाती आहे दाखविण्याचा प्रयत्न केला. भारतात होत असलेली विश्वचषक स्पर्धा हि केवळ भारत जिंकण्यासाठीच आयोजित केली असून आयसीसी बीसीसीआयच्या हातातील बाहुले आहे. आयसीसीच्या नावावर भारतच आयसीसीचा कारभार चालवतो हा जावईशोध पाकिस्तानी टिव्ही व युट्युब चॅनेल्सवर बसून भारत द्वेष्टया काही पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी केले. भारतीय संघाला पूरक अशा खेळपट्टया जाणीवपूर्वक बनवल्या जातात. नाणेफेकी दरम्यान विरोधी कर्णधाराला फसवले जाते, भारतीय गोलंदाज प्रभावी स्विंग व सिम गोलंदाजी करत असल्याने आयसीसी भारतीय गोलंदाजांना विशिष्ट प्रकारचे चेंडू पुरवते तसे इतर संघाना दिले जात नाही. असाही गंभीर आरोप स्वतःच्या आयुष्यात कोणतीही मोठी कर्तबगारी न केलेल्या पाकिस्तानच्या या माजी मुर्ख क्रिकेटपटूंनी करून स्वतःच्याच अकलेचे दिवाळे काढले. भारत जिंकण्यासाठी जादूटोणा करून विरोधी संघांना मोहित करतो असे हिन दर्जाचे आरोप करण्यापर्यंत तेथील काही माजी क्रिकेटपटू पोहोचले आहेत. 
                भारताची या स्पर्धेतील कामगिरी अतिशय उच्च दर्जाची होत असताना भारताचा प्रत्येक खेळाडू जिवाचे रान करून भारतासाठी सर्वोत्तम कामगिरी करत होता. या बाबींचं कौतुक सोडाच तर भारतीय खेळाडूंच्या चुका शोधण्याचीच शहाजूकी हे काही विद्वान माजी क्रिकेटपटू करत होते. उलट आपला शेजारी देश इतकी चांगली प्रगती करत आहे, आपल्या पाक संघाची स्पर्धेत पुरती वाताहत झाली, उपांत्य फेरीदेखील त्यांना गाठता आली नाही. त्यांनी जे चार विजय मिळवले त्यातील तीन तळाच्या व कमजोर संघांवर तर न्यूझिलंड विरूद्ध पावसाच्या कृपेने. कुदरत का निजामचा सतत धावा करताना बघून पाकिस्तानी लोकांची किव येत होती. कष्ट न करता दुसऱ्यांची बुराई करत बसल्यावर काय होतं याचं हे कदाचित सर्वोत्तम उदाहरण असावं.
               विश्वचषकात सपाटून मार खाल्ल्यानंतर संपूर्ण पाकिस्तानच ढवळून निघाले. तेथील क्रिकेट बोर्ड पीसीबीही खडबडून जागा झाले. कर्णधारपदावरून बाबर आझमची सळरसरळ उचलबांगडी केली व त्याला राजिनाम्याचं गोंडस नाव देऊन बाबरची बोळवण केली. शाहिन आफ्रिदी टिट्वेंटीचा तर कसोटी संघातून बाहेर फेकलेल्या शान मसूदला उपरा कर्णधार म्हणून प्रस्थापित खेळाडूंच्या माथी मारले. शिवाय मोहम्मद हाफिजला प्रशिक्षणाचा  कुठलाही अनुभव व शिक्षण नसताना थेट पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघाचा प्रशिक्षक बनविले. यामध्ये कोणती दूरदृष्टी व प्रगल्भता आहे का हे अल्लाहच जाणो. एकंदर बघता स्वतःची प्रगती होण्याचा कुठलाही फॉर्म्यूला व ऐपत नसलेल्या पाकिस्तानची लायकी लक्षात येतेच. पण केवळ भारताला कमी लेखून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला उघडं पाडण्याची चाल दरवेळेस त्यांच्यावरच बुमरँग होत असली तर कुत्र्याच्या शेपटी सारखी त्यांची खोड कायम आहे तशीच आहे.
                भारताला क्रिकेटच्या माध्यमातून बदनाम करणं शक्य होत नाही म्हणून मानसिक संतुलन गमावलेले अनेक क्रिकेटपटू पाकिस्ताननात आहेत. स्वतःची पब्लीसिटी करून टिआरपी वाढविण्यासाठी ते भारतावर ह्या ना त्या कारणाने टिका करत असतात. त्यामुळे या लेखात त्यांचे नावं मी मुद्दाम लिहून त्यांना प्रसिद्धी देणार नाही. मात्र येथे एक स्त्री द्वेषी क्रिकेटपटूचा आवर्जून उल्लेख करणार आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून बऱ्यापैकी कामगिरी केलेला अब्दुल रझ्झाक याच्या जीभेला लगामच लागत नाही. महिलांविषयी सातत्याने अनादर होईल असे वक्तव्य तो कायम करत असतो. मागे एकदा पाकिस्तानी महिला क्रिकेटपटू निदा डर तर महिलांसारखी दिसतच नाही असे बोलला तर नुकतेच भारतीय फिल्म स्टार व माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन यांच्या बाबत अतिशय आश्लिल वक्तव्य करून संपूर्ण जगाच्या रडारवर आला होता. पुढे जात त्याने माफी मागीतली. परंतु आधी तोंड घाणीत घालायचं आणि नंतर डेटॉलने धुवायचे हि रझ्झाकची पद्धत त्याला माफी देणारी नक्कीच योग्य नाही. चुक करून माफी मागण्यापेक्षा चुक होणारच नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. रझ्झाक अशा चुका कायम करत आला आहे. त्यामुळे अशा विकृत प्रवृत्तींचा नाश होणे गरजेचं आहे.
                 पाकिस्तानमध्ये भारत द्वेष मोठ्या प्रमाणात असला तरी भारतीय खेळाडूंचे प्रशंसकही मोठया प्रमाणात आहे. टिम इंडियांचे कौतुक करणारेही बरेचसे पाकिस्तानी आहेत. मात्र द्वेषापुढे प्रेमाची जित होत असते. हे मात्र पाकिस्तानमध्ये होताना दिसत नाही.

लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
मोबाईल नंबर - ९०९६३७२०८२.
close