shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अखेर कोणा दृष्टाची नजर लागली अनटिम इंडियांची विजेतेपदाची संधी हुकली..



              समस्त भारतीय क्रिकेट शौकीनांच्या काळजाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या करणाऱ्या निकालाने भारतीय क्रिकेट अचानक स्तब्ध झाले. गेली दिड महिना विश्वचषक स्पर्धेवर एकतर्फी वर्चस्व गाजविणाऱ्या भारतीय संघाचा अंतिम सामन्यात अनपेक्षितरित्या पराभव झाला. हिच बाब प्रत्येक भारतीयाच्या जिव्हारी लागली आहे. हे अचानक कसं व काय झालं हे समजण्यापलिकडचं होऊन बसलं. विश्वचषकाचा अंतिम सामना कोण जिंकेल ? असा प्रश्न जरी कोणालाही विचारला तर त्याचं ' भारत ' असंच मिळायचं. दिड लाखाच्या आसपास निळ्या पोशाखातील प्रेक्षकांनी टिम इंडियाला प्रोत्साहित करण्यासाठी जिवाचं रान केलं मात्र त्याचा किंचितही उपयोग झाला नाही आणि शेवटी निराश मनाने प्रत्येक प्रेक्षक घरी परतला. घरातूनच टिव्हीवर सामन्याचा आस्वाद घेणारे कोट्यावधी चेहरे हिरमुसले. तर अनेक जण टिम इंडियांच्या धक्कादायक पराभवाने जेवलेही नाही तर अनेकांना रात्र असूनही झोप लागली नाही. इतका तीव्र त्रास या पराभवाने सर्वांनाच झाला.

           अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात नाणेफेकी पासून काहीही चांगले टिम इंडियाच्या बाजूने घडले नाही. कर्णधार रोहित शर्माने त्याच्या नेहमीच्या तंत्राने फलंदाजी केली मात्र समोरून शुभमन गिल बाद झाल्यावर त्याने स्वतःवर थोडे नियंत्रण ठेवायला हवे होते. मात्र फटकेबाजीचा मोह त्याला आवरता आला नाही आणि येथेच भारताच्या विजयी रथाचे चाक जमीनीत घुसले. त्यानंतर ते शेवटपर्यंत बाहेर आलेच नाही. तसे बघाल
तर रोहितचा ट्रेव्हीस हेडने घेतलेला झेल १९८३ च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत कपिलदेवने घेतलेल्या विव्ह रिचर्डसच्या झेलाची आठवण देऊन गेला. क्रिकेटचे प्रत्येक तंत्र अवगत असलेल्या रोहितने नांगर टाकून शेवटपर्यंत खेळपट्टीवर उभे राहायला हवे होते पण तसे झाले नाही. नेहमी प्रमाणे नंतरच्या फलंदाजांनी रोहितच्या अपेक्षेप्रमाणे खेळ केला नाही. इतक्या महत्वाच्या अंतिम सामन्यात रोहितने इतरांवर विश्वास न ठेवता स्वतः मोठी खेळी करायलाच हवी होती. कारण भारतीय संघात यापूर्वी अंतर्गत गटबाजी चालायची, मात्र या स्पर्धेत आधीच्या दहा सामन्यात तसे काही दिसले नाही. त्यामुळे सर्व अलबेल असल्याचे वाटत होते. मात्र अंतिम सामन्यात एकमेकांना विश्वजेतेपदाचं कर्णधार म्हणून श्रेय मिळू द्यायचे नाही ही असुरी शक्ती जागृत झाली आणि पुढील महाभारत घडलं असं अनेक क्रिकेटरसिक पोटतिडकीने बोलत आहे.
            विराट कोहली, केएल राहुल यांनी अर्धशतके केली आणि बाद झाले. त्यावेळी भारतीय डावाची बरेचसे चेंडू बाकी होते. एरव्ही शतक होण्यासाठी जीवाचं रान करून प्रसंगी संघाला संकटात टाकणारे हे दोघे भरपूर वेळ व चेंडू शिल्लक असताना बाद झाले व खेळले तेही अगदी कूर्मगतीने ११ते ४० या  षटकात या दोघांच्या उपस्थितीत फक्त दोन चौकार मारले गेले, षटकार तर एकही नव्हता. तसे बघाल तर आक्रमक फलंदाजीसाठी हे दोघेही प्रसिद्ध आहे. मागच्याच सामन्यात राहुलने ६२ चेंडूत विक्रमी वेगवान शतक ठोकून हे सिद्धही केलं होतं. मग येथे सरळ चक्काजाम आंदोलन का केलं ? हो, आपण समजू शकतो ऑस्ट्रेलियाच्या सर्वच गोलंदाजांनी धारदार व टप्प्यावर गोलंदाजी केली, क्षेत्ररक्षणही अव्वल दर्जाचं होतं. तरीही कोहली -राहुल नेहमीप्रमाणे शतकांसाठी खेळले असते तर भारताची धावसंख्या नक्कीच साडेतिनशेच्या घरात गेली असती व नंतर भारतीय गोलंदाजांना आपले कार्य पार पाडायला मोठी संधी मिळाली असती. एक मात्र नक्कीच येथे काहीतरी दुर्गंधी येत होती. श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा यांनीही लौकिकाला साजेशी फलंदाजी न केल्याने भारताच्या अडचणी वाढल्या. तर सुर्यकुमार यादवच्या पायात बेड्या घातल्याचे चित्रच दिसत होते. एकंदर भारतीय फलंदाजांच्या झालेल्या लाजिरवाण्या कामगिरी .मुळेच भारताच्या पराभवाची मुहुर्तमेढ रोवली.
               इंग्लंडविरूध्द साखळी सामन्यात २२९ धावांचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांनी शंभर धावांनी विजय मिळवून दिला होता. शिवाय आता २४० धावा त्यापेक्षा मोठया होत्या, शिवाय सर्वच गोलंदाज फॉर्मात असल्याने भारत यावरही मात करेल असे वाटत होते. शमी -बुमराहाने तीन बळी झटपट घेतल्याने आशा वाढल्या होत्या. मात्र दुसरा सलामीवीर ट्रेव्हीस हेड व मार्नस लाबुशेनने भारताच्या गोलंदाजांना पुरती माती चारली. हेडने तर शानदार शतक ठोकून कांगारूंना विश्वविजयाचा षटकार मारण्याच्या नजीक आणलं मात्र विजयी फटका त्याच्या नशिबी नव्हतं. शेवटी ग्लेन मॅक्सवेलने ते पवित्र कार्य करून ऑस्ट्रेलियाला पुन्हा एकदा विश्वविजेते बनविलं.
              सन २०२१ युएईत टि२०, सन २०२२ वर्ल्ड टेस्ट चॅंपियनशिप व आता २०२३ वनडे विश्वचषक असे दोन वर्षात तीनही प्रारूपातील आयसीसीचे विश्वविजेतेपद मिळवून ऑस्ट्रेलियाने तेच खरे जागतिक क्रिकेटचे मैदावरील विश्वविजेते आहेत. हे आख्ख्या जगाला दाखवून दिले. भारत मात्र आयसीसीच्या मानांकनातच अव्वल राहिले.
                तसे बघाल तर भारताने या स्पर्धेत खरोखर नेत्रदिपक खेळ केला. मात्र अंतिम सामन्यात संघात एकजूटता दिसली नाही. एकीकडे ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षक जीवाची बाजी लावून क्षेत्ररक्षण करत होते. त्यांनी कमीत कमी ५० धावा आपल्या अप्रतिम क्षेत्ररक्षनाने वाचविल्या. तर त्या उलट भारतीय क्षेत्ररक्षकांची कामगिरी होती. केएल राहुल तर अगदी नवशिखा भासत होत्या त्याच्या हातातून, दोन्ही पायातून चेंडू सर्रास निघून जात होते. तर जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून गणले गेलेले शमी, बुमराहा, सिराज, जडेजा, कुलदिप तर शाळकरी गोलंदाज वाटत होते. कर्णधार रोहितच्या नेतृत्वातही नेहमीची चमक न दिसल्याने चमचमता विश्वकरंडक चमकदार नेतृत्व व गोलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सच्या हातात चमकून दिसत होता.
              टिम इंडियाचा मागील दहा वर्षांपासून सुरू असलेला आयसीसी चषकांचा दुष्काळ कधी संपणार ? या प्रतिक्षेत भारतीय क्रिकेट रसिक दिवस ढकलतीलच.  पण एक मात्र नक्की कोणा दृष्टाची काळी नजर टिम इंडियाला लागलीच.

लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
मोबाईल नंबर - ९०९६३७२०८२.
close