अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा:
जागतिक कौशल्य स्पर्धा सन २०२४ मध्ये फ्रांस (ल्योन) येथे होणार आहे. यासाठी जिल्हा, विभाग, राज्य आणि देशस्तरावर स्पर्धा घेऊन याद्वारे गुणवान कौशल्यधारक पात्र स्पर्धक निवडले जाणार आहेत.
ही स्पर्धा जगातील सर्वांत मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील २३ वर्षाखालील तरूणांकरिता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची सुवर्णसंधी आहे. यामध्ये सहभाग घेण्यास इच्छुक असलेल्या पात्र उमेदवारांनी २० नोव्हेंबर २०२३ अखेर https://kaushalya.mahaswayam.gov.in/ अथवा https://forms.gle/Svbrdnw8gsh2bgWH7 या लिंकवर नाव नोंदणी करुन आपला सहभाग निश्चित करावा, असे आवाहन सहायक आयुक्त,नि.ना.सूर्यवंशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ करीता वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आलेला असून या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म दि. १ जानेवारी २००२ किंवा तदनंतरचा असावा. तसेच, ऑडेटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, क्लाऊड कंप्युटींग, सायबर सिक्युरिटी, डिजिटल कन्स्ट्रक्शन, इंडस्ट्रियल डिझाईन टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री ४.०, इन्फॉरमेशन नेटवर्क केबलिंग, मेक्ट्रॉनिक्स आणि रोबोट सिस्टीम इंटिग्रेशन व वॉटर टेक्नॉलॉजी या क्षेत्राकरीता उमेदवाराचा जन्म दि. १ जानेवारी, १९९९ किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे. फ्रान्स (ल्योन) येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ साठी जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवरून प्रतिभासंपन्न, कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने आयोजित स्पर्धेकरीता सर्व शासकिय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन महाविद्यालये, एमएसएमई टूल रूम्स, सिपेट, आयआयटी, अभियांत्रिकी महाविद्यालये, आयएचएम/ हॉस्पिटेलिटी इंस्टिट्यूट, कॉर्पोरेट टेक्निकल इंस्टीट्यूट, स्किल ट्रेनिंग इंस्टीट्यूट, कला, वाणिज्य व विज्ञान शाखेची कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, एमएसबीव्हीटी, खाजगी कौशल्य विद्यापीठ, इंस्टीट्यूट ऑफ ज्वेलरी मेकिंग, इतर सर्व प्रशिक्षण संस्था, तसेच, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीकडे अधिनस्त सर्व व्यवसायिक कौशल्य प्रशिक्षण संस्था, विविध व्यावसायिक आस्थापना आणि कारखाने यांचेकडील विहीत वयोमर्यादेतील इच्छूक प्रतिभासंपन्न व कुशल उमेदवारांचे नामांकन या स्पर्धेसाठी करता येईल. तसेच, या स्पर्धेत निवड झालेल्या उमेदवारांना वेळोवेळी लागणारे मार्गदर्शन व सहकार्य महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई यांचेकडून करण्यात येईल. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर मो.९५९५७२२४२४ ,९४०९५५५४६५ या नंबर वर संपर्क करावा, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी: स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

