shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दिवाळी पाडव्या निमित्त श्रीरामपुरात राजकीय गटांचे शक्तिप्रदर्शन


*सचिन गुजर यांची ससाणे ऐवजी मुरकुटेंसोबत पदयात्रा

श्रीरामपूर प्रतिनिधी:
 सालाबाद प्रमाणे दिवाळी पाडव्यानिमित्त शहरांमध्ये विविध राजकीय पक्षांच्या नेते मंडळींनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत बाजारपेठेतील व्यापारी मंडळींची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. या निमित्ताने काढण्यात आलेल्या पद यात्रेमध्ये सर्वच राजकीय गटांचे कार्यकर्ते दिसून आले. व्यापाऱ्यांनी देखील प्रत्येकाचे आनंदाने स्वागत केले.

दरवर्षी दिवाळी पाडव्यानिमित्त शहरातील राजकीय पुढारी व्यापारी वर्गाची भेट घेतात.त्या निमित्ताने मेन रोड आणि शिवाजी रोडवर पदयात्रा काढली जाते.यावर्षी देखील ही पदयात्रा निघाली. मात्र विविध राजकीय गटांच्या वेगवेगळ्या पदयात्रा निघाल्या.
ज्येष्ठ नेते भानुदास मुरकुटे यांनी सालाबादप्रमाणे पदयात्रा काढली. यावेळी त्यांनी बी आर एस पक्षाच्या वतीने पदयात्रा काढून शहरातील व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी मुरकुटे यांच्याबरोबर त्यांच्या पक्षाचे विविध कार्यकर्ते सामील झाले होते. विशेषतः जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन गुजर हे काँग्रेसचे नेते करण ससाणे यांचे सोबत जाण्याऐवजी मुरकुटे यांच्या पदयात्रेत दिसून आले.त्यामुळे तो  शहरात चर्चेचा विषय होता.गेले काही दिवस सचिन गुजर हे पक्षामध्ये नाराज आहेत.त्यांना कोणत्याही निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतले जात नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.त्या पार्श्वभूमीवर गुजर यांचे मुरकुटे यांच्याबरोबर पदयात्रेत सामील होणे हे भविष्यामध्ये सचिन गुजर पक्षांतर करणार का ? अशी चर्चा शहरात होत आहे.
माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसमवेत दिवाळी पाडव्यानिमित्त शहरातील व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते दिसून आले.तरी सुद्धा अनेक माजी नगरसेवक व प्रमुख कार्यकर्ते यांची अनुपस्थिती जाणवली.
            भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष दिपक पटारे व भाजप नेते प्रकाश चित्ते यांच्या दोन गटांनी दोन वेगवेगळ्या पदयात्रेद्वारे व्यापाऱ्यांच्या भेटी घेतल्या.श्रीरामपूर भाजपमध्ये दोन गटातील वाद हा सर्वश्रुत आहे. दिवाळीच्या दिवशी देखील हे गट वेगवेगळे शहरात फिरल्याने तो ही एक चर्चेचा विषय झाला आहे.
माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांची पदयात्रा लक्षवेधी ठरली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना सोबत घेत त्यांनी शहरातील व्यापाऱ्यांसह हातगाडी वाले, रस्त्यावरचे विक्री करणारे छोटे छोटे विक्रेते यांची सुद्धा भेट घेतली. त्यांच्या पदयात्रेला शहरातील व्यापारी वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.अनेक ठिकाणी अनुराधा आदिक यांचे भेटवस्तू तसेच शाल हार देऊन सत्कार झाले.शहरातील नागरिकांमध्ये असलेली त्यांची लोकप्रियता यावेळी दिसून आली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे देखील शहरांमध्ये व्यापारी वर्गाची भेट घेऊन शुभेच्छा देण्यात आल्या. माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, शिवसेना नेते अशोक मामा थोरे व नुकतेच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले संजय छल्लारे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पदयात्रा काढून व्यापारी वर्गाच्या भेटी घेतल्या. या पदयात्रेत काही अति उत्साही कार्यकर्त्यांनी जय शिवाजी जय भवानी व उद्धव ठाकरे जिंदाबाद च्या घोषणाही दिल्या. छल्लारे यांना देखील शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. 
पूर्वी श्रीरामपूर शहरांमध्ये मुरकुटे यांची एक पदयात्रा व ससाणे - कांबळे यांची एक पदयात्रा निघत होती. परंतु आता पुढारी जास्त झाल्याने वेगवेगळे गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे आदिक,ससाणे, मुरकुटे,छल्लारे,कांबळे, चित्ते,पटारे अशा नेत्यांच्या गटांनी पदयात्रा काढून व्यापाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.आगामी काळामध्ये होणाऱ्या विविध निवडणुका व अस्थिर राजकीय परिस्थितीमध्ये कोणती निवडणूक कधी लागेल याचा नेम नाही.त्यामुळे जनसंपर्काचे उत्तम साधन म्हणून दिवाळी पाडव्याचा खुबीने वापर करण्यात आला.
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
close