shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

धावांच्या वर्षात मॅक्सवेलने टिम इंडियाला नमविले..

टि२० सामना मुळातच धावांचा खजिना असलेल्या खेळपट्टयांवर खेळविला जातो. त्यामध्ये फलंदाज मग त्याचा दर्जा कसाही असो तो हात धुवून घेतल्याशिवाय राहात नाही. सध्या भारतात टिम इंडिया ऑस्ट्रेलिया बरोबर पाच सामन्यांची टि२० मालिका खेळत आहे. त्यातील पहिल्या दोन सामन्यात सर्वच प्रमुख फलंदाजांनी आपले रंग उधळल्याचे आपण बघितले आहेच. मात्र तिसऱ्या गुवाहाटीला झालेल्या सामन्यात दोन्ही संघातले प्रमुख फलंदाज स्वस्तात बाद होत असताना प्रत्येकी एकेका फलंदाजाने वादळी शतकं ठोकली आणि सामन्याचा नूरच पालटला व रसिकांना शेवटच्या चेंडूपर्यंत खिळवून ठेवणारा एक चित्तथरारक सामना अनुभवायला मिळाला. फलंदाज या सामन्याचे हिरो ठरले असले तरी गोलंदाज एखाद्या महानाट्याचे खलनायक आहेत असेच चित्र शेवटी दिसत होते. ते टि२० क्रिकेटसाठी आनंददायक जरी दिसत असले तरी गोलंदाज म्हणून करीअर बनवू पाहणाऱ्यांसाठी ते नको असलेला भितिदायक हॉरर चित्रपटच ठरत आहे.

               मंगळवारी गुवाहाटी येथे विद्यमान मालिकेला तिसरा सामना खेळला गेला. सुरूवातीला पाण्याच्या पावसाची भिती वाटत होती पण प्रत्यक्षात पाणी न बरसता २४० चेंडूत ४४७ धावांचा वर्षाव दोन्ही संघातल्या फलंदाजांनी बाराबती स्टेडियमवर करून उपस्थित प्रेक्षकांचे नयनचक्षू सुखावले मात्र सामन्याचा निकाल यजमानांच्या विरोधात गेल्याने त्याच प्रेक्षकांचे डोळे पाणवलेलेही पहायला मिळाले. ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेड सलग दुसऱ्यांदा नाणेफेक जिंकण्यात सफल ठरला. मागच्या सामन्यात त्याच्या पदरी निराशा आली मात्र यावेही नेलबीटर लढतीत नशिबाचे फासे त्याच्या बाजूने पडले. वेडचा भारताला प्रथम फलंदाजीला पाठविण्याचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी बिलकुल सार्थही ठरविला होता. मात्र सलामीवीर व उपकर्णधार ऋतूराज गायकवाडने भारतीय डावाच्या शेवटी पार उधळवून लावला. 
            मागच्या दोन सामन्यांप्रमाणे या सामन्यातही भारताच्या नावे दोनशे पार धावा लागल्या. मात्र भारताचे यशस्वी जयस्वाल, ईशान किशन, सुर्यकुमार यादव, तिलक वर्मा आपल्या लौकिका नुसार खेळले नाहीत शिवाय सामन्यात ५७ चेंडूत १२३ धावांची नाबाद खेळी करणाऱ्या ऋतूराज गायकवाडने सुरुवातीचे बावीस चेंडू बावीस धावा अशी थंड खेळी केली होती,  मात्र शेवटच्या क्षणी त्याने धारण केलेला रूद्रावतार सर्वांनाच अनपेक्षित होता. त्याचे शतक खऱ्या अर्थाने शेवटच्या ३५ चेंडूतच झळकल्याने भारताचा डाव २२२ पर्यंत पोहोचला. ऋतूराज गायकवाडचे पहिले टि२० आंतरराष्ट्रीय शतक भारताच्या विजयाच्या कामी आले नसले तरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध टि२० शतक ठोकणारा तो पहिला भारतीय ठरला. याबरोबरच त्याने तो प्रसंगी किती आक्रमक होऊ शकतो हे त्याच्या टिकाकारांना दाखवून दिलेच.
                ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचीही या सामन्यात जोरदार पिटाई झाली. शेवटच्या दोन षटकात ५५ धावा तर अक्षरशः ते उधळताना दिसले. गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ग्लेन मॅक्सवेलने डावातील शेवटचे षटक टाकले त्यामध्ये त्याने ३० धावांचा कुट खाल्ला. एका षटकात टि२० च्या इतिहासात एवढया जास्त धावा देण्याचा नकोसा ऑस्ट्रेलियन विक्रम ग्लेनच्या नावे लागला. मात्र हातात बॅट आल्यावर त्याने पुन्हा एकदा आपल्या खेळाचा आक्रमक नमुना दाखविताना भारतीय गोलंदाजांना पळता भुई थोडी केली. एरव्ही अचूक गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या प्रसिद्ध कृष्णाचे सुदर्शन चक्र त्याच्यावरच उलटले. चार षटकात ६८ धावा असे खराब पृथःकरण व अंतिम षटकात २१ धावा वाचविता न येणे इतकी खराब गोलंदाजी करून प्रसिद्ध कृष्णा कुप्रसिद्ध झाला. मॅक्सवेलने शेवटच्या चेंडूवर विजयी चौकार ठोकून मालिकेत भारताची आघाडी २-१ अशी कमी करताना पुन्हा एकदा झंझावाती शतक ठोकले. खरे बहाल तर ऑस्ट्रेलियाचे प्रमुख पाच फलंदाज स्वस्तात बाद झाले असताना मॅक्सवेलने एकहाती हल्ला चढवून भारताच्या तोंडातला विजयाचा घास ओरबडला. मॅथ्यू वेडने त्याला शेवटी साथ दिली असली तरी त्यात त्याचा रोल केवळ सहायकाचाच होता.
                मागच्या दोन सामन्यात अचूक मारा करून कांगारूंना लगाम घालणारा मुकेशकुमार स्वतःच्या विवाहासाठी गेल्यामुळे या सामन्यात आवेश खानला संधी मिळाली. त्यानेही चांगली गोलंदाजी केली. मात्र त्याला हाताळण्याची योग्य कला कर्णधार सुर्यकुमार यादवला जमली नाही. गोलंदाजांचा योग्य उपयोग करणे, मुख्य गोलंदाज मार खात असताना पार्ट टाईम गोलंदाज वापरणे, क्षेत्ररक्षण योग्य न लावणे तसेच ऐनवेळी स्वतःही झेल सोडणे या सारख्या गंभीर चुका सुर्याकडून झाल्याने भारताच्या आवाक्यातला विजय पराभवात परावर्तीत झाला. मागच्या दोन सामन्यात अर्धशतके ठोकणारा ईशान किशन यावेळी शुन्याचा धनी बनला. त्याच्या यष्टीरक्षणातही गलथानपणा दिसला. महत्वाच्या क्षणी स्टम्पींग सोडून त्याने आज स्वतःचा व भारताचा दिवस खराब करून घेतला.
                या सामन्याचे खास आकर्षण ठरलेले दोन्ही शतकवीर ग्लेन मॅक्सवेल व ऋतूराज गायकवाड पुढच्या दोन्ही सामन्यात आपणास खेळताना दिसणार नाही. दोन्ही संघांनी उर्वरीत दोन्ही सामन्यांसाठी निवडलेल्या पूर्वनियोजित संघात त्यांचे नावे नाही. ऋतूराजच्या ऐवजी श्रेय्यस अय्यर संघात येईल. तर मॅक्सवेल मायदेशी रवाना होईल.
               ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकून मालिकेत स्वतःचे अस्तित्व टिकविले असल्याने पुढील दोन सामने चुरशीचे होतीलच यात तिळमात्र शंका नाही. परंतु सुर्यकुमार यादवला या सामन्याने नक्कीच शिकविले असेल की चौफेर फलंदाजी करण्याइतके नेतृत्व करणे सोपे नाही.
                 
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
मोबाईल नंबर - ९०९६३७२०८२.
close