संघाच्या ताफ्यात कितीही विद्वान मेंटॉर, तज्ञ प्रशिक्षक तसेच एक्सपर्ट सहाय्यक असू द्या. पण प्रत्यक्षात खेळाडूंनाच मैदानात दोन हात करायचे असतात. नेमके हेच दोन हात व डोके सर्व खुराक मिळूनही चालेनासे झाले तर अनपेक्षित व धक्कादायक पराभव पदरी पडतो. याचं ज्वलंत उदाहरण कोटयावधी क्रिकेट शौकिनांनी टेलिव्हिजन व जवळ जवळ पन्नास हजार प्रेक्षकांनी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर याची देही याचे डोळा प्रत्यक्ष बघितले. प्रसंग होता विश्वचषक २०२३ मधील ऑस्ट्रेलिया व अफगाणिस्तान यांच्यातील एक महत्वपूर्ण लढतीचा.
उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी हा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा होता. मुंबईची खेळपट्टी फलंदाजांना पोषक असली तर गोलंदाजांनाही तितकाच न्याय देणारी होती. फिरकी गोलंदाज येथे आपली करामत दाखवू शकतील या आशेने अफगाणिस्तानने संघात चार अव्वल फिरकी गोलंदाज खेळविण्याचा निर्णच घेतला. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नाणेफेकीचा कौलही त्यांच्या बाजूने लागल्याने अफगाणिस्तानची बाजू मजबूत दिसू लागली. त्यांच्या फलंदाजांनीही आत्मविश्वासाने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा पहिल्यांदा सामना केला व नंतर समाचार घेतला. इब्राहिम जादरानने संघाचा डोलारा व्यवस्थित सांभाळत शेवटपर्यंत नाबाद राहात विश्वचषक स्पर्धेत शतकवीर बनणारा पहिला अफगाण फलंदाज बनला. जादरानची नाबाद १२९ धावांची खेळी व डावाच्या अंतिम टप्प्यात राशिदखानने केलेल्या टोलेबाजीने अफगाणिस्तानने २९१ धावांचा डोलारा उभा केला.
पाच वेळचा विश्वविक्रमी विश्वविजेता असलेल्या ऑस्ट्रेलियाने आजवर २८७ पेक्षा जास्त धावा पाठलाग करताना केल्या नव्हत्या त्यामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाज कशी कामगिरी करतात याकडे क्रिकेट जगत उत्सुकतेने बघत होते. त्याचे कारणही तितकेच महत्त्वाचे होते, खेळपट्टी फिरकीला अनुकुल तर होतीच परंतु मैदानात पडणाऱ्या दवबिंदूंमुळे अफगाणी चार फिरकीपटू कसा मारा करतात ? प्रत्यक्षात सामन्याला सुरूवात झाल्यावर नवीन उल हक व हशमत उमरजई या वेगवान गोलंदाजांनीच ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कापून टाकली. राशिदखाननेही दोन बळी घेऊन क्रिकेटरसिकांना आनंदाचे क्षण दिले. शिवाय त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी स्टोईनसला धावबाद करून सर्वांगसुंदर खेळ केला. तेंव्हा एकोणावीसाव्या षटकात कांगारूंची अवस्था ७ बाद ९१ अशी सोचनिय झाली होती. त्यावेळी अफगाणिस्तानमोठा विजय मिळवून धावगती सुधारेल व उपांत्य फेरीच्या आणखी जवळ पोहोचेल असं सर्वांनीच गृहीत धरलं होतं.
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, शेवटचा चेंडू पडेपर्यंत काहीही होऊ शकतं. हे आपण कायम व अनेकदा ऐकत आलो आहोत. मात्र या गोष्टीचा शब्दशः अनुभव या सामन्यात आला. ऑस्ट्रेलियाचे सर्वच प्रमुख फलंदाज साभार माघारी परतल्याने सामन्याची केवळ औपचारिकताच बाकी आहे अश्या पद्धतीने सर्वच जण सामना बघत होते. ऑस्ट्रेलियन खेळाडूंचेही खांदे पडले होते तर दुसरीकडे अफगाण खेळाडू मैदान मारल्याच्या विर्भावात वावरत होते. तसं त्यांचं वागणं काही गैर नव्हतं. मात्र त्यावेळी नियतीच्या मनात वेगळंच शिजत होतं. आठवी जोडी म्हणून कर्णधार पॅट कमिन्स व दुखापतीनंतर संघात परतलेला प्रमुख फलंदाज ग्लेन मॅक्सवेल खेळत होते. केवळ तीन गडी हाताशी, त्यातच मॅक्सवेल पूर्ण फिट नव्हता त्यामुळे ऑस्ट्रेलिया विजयापर्यंत पोहोचेल असे कोणालाच वाटत नव्हते. परंतु मॅक्सवेलने एक वादळी खेळी खेळताना निव्वळ विश्वचषकच नव्हे तर वन डे क्रिकेटच्या इतिहासातील न भूतो न भविष्यती चमत्कार घडवताना नाबाद द्विशतकी खेळी केली. कमिन्ससह केलेल्या २०२ धावांच्या नाबाद भागीदारीत कमिन्सचा वाटा केवळ बारा धावांचा होता.
या खेळीदरम्यान मॅक्सवेलला त्याचे शरीर बिलकुल साथ देत नव्हते, पायात क्रॅम्प येत होते, हॅमस्ट्रिंगही उद्भवले होते. पळणे सोडा दोन पायावर उभे राहाणेही शक्य होत नसलेल्या मॅक्सवेलने केवळ ईच्छाशक्ती व संघाला उपांत्य फेरीत पोहोचवण्याच्या महत्वकांक्षेपायी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जिगरबाज खेळ केला. म्हणतात यश नेहमी साहस करणाऱ्याच्या बाजूने असते. येथेही तेच झाले. मॅक्सवेलची विपरीत परिस्थितीत केलेली खेळी क्रिकेटच्या इतिहासातील निव्वळ धावांचा पाठलाग करतानाचीच नाही तर सर्वांगीन अविस्मरणीय होती. हा सामना ऑस्ट्रेलिया विरुध्द अफगाणिस्तान असा नाही तर मॅक्सवेल विरूध्द अफगाणिस्तान असा वाटत होता. शेवटी मॅक्सवेलच्या धाडसी खेळाचं फळ त्याला व संघाला उंपात्य फेरीतील प्रवेश निश्चितीच्या रूपात मिळालं.
सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाची भंबेरी उडविणारे अफगाण गोलंदाज मॅक्सवेलच्या वादळात कुठे उडाले कोणालाच कळले नाही. अफगाण कर्णधार, डग आऊटमधील थिंक टँकचे म्होरके अजय जडेजा, जोनाथन ट्रॉट व त्यांचे सर्व सहाय्यक हतबल झाल्याचे दिसत होते. तर गोलंदाजांना एका जखमी फलंदाजाला त्याच्या पायांच्या बिलकुल हालचाली होत नसताना त्याच्यापासून दूर चेंडूचे टप्पे द्यावे हे सुध्दा कळण्या पलिकडचे झाले होते. अफगाण गोलंदाज एखाद्या बिघडलेल्या कॉम्पूटरप्रमाणे नको तिथे मारा करत होते तर मॅक्सवेल शरीर साथ देत नसतात केवळ उभ्या उभ्या एका अद्भूत शक्तीच्या जोरावर फटकेबाजी करत होता. तत्पूर्वी मुजीब उर रेहमानने मॅक्सवेलचा ३३ धावांवर हातातला झेल सोडून सामना मॅक्सवेलच्या हाती दिला. त्यानंतर मात्र मॅक्सवेलने पुन्हा कोणतीही चुक केली नाही व अफगाण संघ व समर्थकांना निराश होण्यास भाग पाडले.
या सामन्यावर अफगाणिस्तानचंच मोठं वर्चस्व होतं परंतु परिस्थिती बिकट बनल्यावर तिच्यावर मात करण्यासाठी लागणारा प्रत्यक्ष मैदानावरचा अनुभव त्यांना कमी पडला. हिच त्यांची या सामन्यातील खरी कमजोरी ठरली. उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या त्यांच्या आशा अद्यापही जीवंत असून त्यांना आव्हान देणाऱ्या पाकिस्तान व न्युझिलंडच्या तुलनेत उपांत्य फेरीत पोहोचण्याचे असली दावेदार अफगाणिस्तानच आहे. कारण त्यांनी या स्पर्धेत सर्वच क्षेत्रात चमकदार खेळ करताना तीन माजी विश्वविजेत्यांना हरविले आहे. तर पाकिस्तान व न्युझिलंडचे विजय कमजोर संघाविरुद्धचे आहेत. चला तर बघूया स्पर्धेच्या निर्णायक टप्प्यात नियती आणखी कोणता डाव खेळते व उपांत्य फेरीच्या एका जागेवर कोणाला संधी मिळते ?
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

