भारताच्या नवोदित खेळाडूंच्या टि२० संघाने ऑस्ट्रेलियाचा ४-१ असा पाच सामन्यांच्या मालिकेत फडशा पाडून पंधरा दिवसांपूर्वी आपल्याच धर्तीवर याच ऑस्ट्रेलिया संघाने केलेल्या विश्वपराभवावर छोटीसी फुंकर घालून देशवासीयांना आनंदाचा क्षण भोगायला दिला. प्रत्यक्षात दोन्ही संघांत नवोदितांचा भरणा असला तरी त्यांच्यात आपापल्या देशाच्या निष्ठा व प्रेम ठासून भरलेले असल्याने पाच पैकी कुठल्याही सामन्यात ढिलाई दिसली नाही. कागदावर जरी ऑस्ट्रेलियाचा ४-१ असा मोठा पराभव दिसत असला तरी कोणताही सामना एकतर्फी झाला नाही. प्रत्येक सामना जवळ जवळ शेवटच्या षटकापर्यंत गेला. त्यामुळे प्रेक्षकांनाही खेळाचा मनमुराद आनंद लुटायला मिळाला.
या मालिकेत मॅथ्यू वेड हा यष्टीरक्षक व तडाखेबाज फलंदाज ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करत होता. नाणेफेकीच्या बाबत तो फार नशिबान ठरला. शेवटच्या चार सामन्यात नाणेफेकीने त्यालाच कौल दिला मात्र विजयाने त्यातील तीनदा हुलकावणी दिली. उलट भारताचा कर्णधार सुर्यकुमार यादव कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे प्रथमच नेतृत्व करत होता. त्या तुलनेने निकालाच्या दृष्टीने हि मालिका त्याच्यासाठी आल्हाददायक ठरली. त्याचा हसतमुख चेहरा व मैदानातील वावरावरून तो कर्णधारपद एंजॉय करतोय हे पदोपदी जाणवत होतं. मात्र त्याच्या बाबत एक गोष्ट नमूद करणे गरजेचे वाटते. तो जरी कर्णधार म्हणून मालिका जिंकलाही असला तरी तो भविष्यात दिर्घ काळ भारताचं नेतृत्व करेल असे दिसत नाही. पण तो ज्या विश्वसनीय घणाघाती फलंदाजीसाठी प्रसिध्द आहे ती आक्रमक फलंदाजी पहिला सामना वगळता चुकल्यासारखी दिसली. त्यामुळे सुर्यकुमार विषयी चिंता वाटते. याचं कारण म्हणजे भारताकडे सध्या एकाचढ एक धडाकेबाज फलंदाजांची फळी तयार असून संधी मिळताच ते आपला जलवा दाखवत आहेत. तेंव्हा सुर्याने नेतृत्वाच्या फारशा आहारी न जाता फलंदाजीवर लक्ष केंद्रीत केलं तर त्याच्या फायदा वैयक्तीक त्याला तर होईलच पण टिम इंडियाही मजबूत बनेल. सुर्याच्या बाबत बघायचं ठरलं तर वनडे व कसोटीत संधी मिळूनही तेथे तो छाप पाडू न शकल्याने तेथील त्याची सद्दी संपल्यात जमा आहे. त्यामुळे किमान टि२० मध्ये त्याने केवळ त्याने फलंदाजीवरच लक्ष केंद्रीत केलं तर त्याला स्वतःचं करीयर लांबवता येऊ शकते. अन्यथा शिखर धवन प्रमाणे त्याची गत होऊ शकते.
मालिकेतला पाचवा व शेवटचा सामना बंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झाला. सामन्यावर पावसाचे सावट होते. परंतु सामना संपेपर्यत पावसाने कळ काढली व सामना संपताच बरसायला सुरुवात केली. बंगलोरची खेळपट्टी फलंदाजांसाठी धार्जिण असल्याचा इतिहास आहे. त्यामुळे या सामन्यातही धावांचा महापूर येईल असे वाटत होते. भारतीय संघाने पाहिल्या तीन सामन्यात दोनशेच्यावर धावा केल्याने यावेळीही तसेच घडेल असे प्रत्येकाला वाटत होते. मात्र सामना सुरु होऊन प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय फलंदाजांना आपली लयच मिळत नव्हती. धडाकेबाज सलामीवीर यशस्वी जयस्वाल, ऋतूराज गायकवाड, कर्णधार सुर्यकुमार यादव स्वस्तात परतले. तर मागील काही सामन्यातून फिनिशरची भूमिका यशस्वीपणे बजावणारा रिंकू सिंग पावर प्ले मध्येच मैदानात उतरला पण त्याचा नेहमीचा पावर यावेळी दिसला नाही. त्यामुळे टिम इंडिया संकटात सापडली. मात्र नवा उपकर्णधार श्रेयस अय्यर एका बाजूने उभा ठाकला त्याने प्रथम जितेश शर्मा नंतर अक्षर पटेलसह छोटयाखानी पण महत्वपूर्ण भागिदाऱ्या केल्याने भारताला १६० धावांपर्यंत पोहोचता आले. श्रेयस अर्धशतक ठोकून परतला तर अक्षरने बहुमुल्य ३१ धावा ठोकून संघासाठी महत्वाची कामगिरी केली.
प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा डाव १५४ धावांवरच आटोपल्याने त्यांना सहा धावांचा निसटता पराभव पत्करावा लागला. बेन मॅक्डरमॉटच्या ५४, ट्रेव्हिस हेड २८, मॅथ्यू वेड २२, टिम डेव्हीड १७, व मॅथ्यू शॉर्ट १६ धावा यांचे प्रयत्न शॉर्ट पडल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. भारताकडून हातावरची मेहंदीही न वाळलेल्या मुकेशकुमारने तीन, अर्शदिपसिंग व रवि बिश्नोईने प्रत्येकी दोन तर अक्षर पटेलने एक बळी मिळवून भारतासाठी भरीव कामगिरी केली. या सर्व गोलंदाजांमध्ये अक्षर पटेलला सर्वात कमी एक बळी मिळाल्याचे कागदावर दिसत असले तरी त्याने आपल्या चार षटकात अतिशय किफायतशीर मारा करताना अवघ्या चौदा धावा देऊन ऑस्ट्रेलियन फलंदाजांना ऐन हाणामारीच्या वेळी लगाम घालून विजयाची वेसण सुर्यकुमार यादवच्या हाती दिली व भारताला विजय साकारता आला. त्याचा लाभ अक्षरला सलग दुसऱ्या सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळण्यात झाला.
अर्शदीप सिंगने अप्रतिम गोलंदाजी करत शेवटच्या षटकात १० धावांचा यशस्वी बचाव केला. त्याने टीम इंडियाला सहा धावांनी विजय मिळवून दिला. अर्शदीपने २० व्या षटकात आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिध्द असलेल्या ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडला सुरुवातीला जकडून ठेवले, नंतर चकवले व शेवटी बाद करून भारताचा विजय निश्चित केला होता. त्याने पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर वेडला धावा काढू दिल्या नाहीत. तिसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. जेसन बेहरेनडॉर्फ चौथ्या चेंडूवर केवळ एक धाव काढू शकला. आता ऑस्ट्रेलियाला दोन चेंडूंत नऊ धावा करायच्या होत्या. पाचव्या चेंडूवर नॅथन एलिसने धाव घेतली. त्याच्यापाठोपाठ बेहरेनडॉर्फनेही शेवटच्या चेंडूवर एकच धाव घेतली. अशा प्रकारे टीम इंडियाने सहा धावांनी सामना जिंकला.
एकंदर या सामन्यातच नाही तर संपूर्ण मालिकेत संघातील प्रत्येक सदस्याने आपापल्या परीने योगदान देताना सांघिक कामगिरीचे माप भारताच्या झोळीत टाकले. त्यामुळे ऑस्ट्रेलिया सारख्या पक्क्या व्यावसायिक संघाला ४-१ असे हरविले. तिसऱ्या सामन्यात निर्णायक क्षणी मॅक्सवेलने बाजी मारली तेंव्हा भारत शेवटच्या चेंडूवर चकीत झाला अन्यथा मालिका व्हाईटवॉश झाली असती. टिम इंडियाच्या यंग ब्रिगेडला या विजयाबद्दल व पुढील मालिकांसाठी खूप खूप शुभेच्छा !
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल नंबर - ९०९६३७२०८२.

