टिम इंडियाची भरगच्च अशा दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात टि२० मालिकेच्या तीन सामन्यांनी झाली. मात्र पहिल्या सामन्यात पावसाने व दुसऱ्या सामन्यात आफ्रिकन खेळाडूंनी झोडपले. त्यामुळे आयसीसी मानांकनातील अव्वल क्रमांकाच्या टिम इंडियाची इज्जत पणाला लागली होती. शिवाय सन २०१५-१६ नंतर दक्षिण आफ्रिकेत मालिका न गमावण्याचे प्रतिष्ठेचे भूतही मानगुटीवर बसले होते. म्हणून तिसरा सामना टिम इंडियाच्या इभ्रतीचा प्रश्न घेऊन उभा ठाकला होता. द.आफ्रिकन कर्णधार एडन मार्करमने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्याने सकाळच्या तजेलदार वातावरणाचा लाभ त्याच्या जलदगती गोलंदाजांना होणार हि काळ्या दगडावरची रेष होती आणि झालेही तसेच. सलामीवीर शुभमन गिल व तिसऱ्या क्रमाकांवरील तिलक वर्मा पाठोपाठच्या चेंडूवर तिसऱ्याच षटकात बाद झाल्याने भारतीय संघ बॅकफुटवर जाईल अशी भिती वाटत होती. मात्र कर्णधार सुर्यकुमार यादव व दुसरा सलामीवीर यशस्वी जयस्वाल या मुंबईकर जोडीने सामन्याची सुत्रे स्वतःच्या हाती घेत आफ्रिकन गोलंदाजांना दे माय धरणी ठाय करून सोडले. सुरुवातील सुर्यापेक्षा यशस्वी आक्रमक वाटत होता मात्र नंतर सुर्याने जे गियर बदलले ते विक्रमाच्या पंगतीत जाऊन बसल्यानंतरच थांबले. यशस्वी साठ धावांची जलद खेळी करून परतला तर सुर्याने पुन्हा एकदा व्हिडीओ गेम खेळून ५५ चेंडूत शतक करून सर्वात कमी सामन्यात चौथे टि२० आंतरराष्ट्रीय शतक ठोकून विक्रमी चार शतके ठोकणाऱ्या रोहित शर्मा व ग्लेन मॅक्सवेलच्या पंगतीत जाऊन बसला पण जरा काकणभर पुढेही गेला.
रिंकू सिंग, रविंद्र जडेजा विशेष योगदान देऊ शकले नाहीत. तर नवोदित यष्टिरक्षक जितेश शर्माची परवड सुरूच आहे. यष्टीरक्षक करताना त्याची धांदल उडतेच हे आपण आधीच्या त्याने खेळलेल्या तीन टि२० सामन्यात सर्वांनी बघितलेच आहेच, पण आंतरराष्ट्रीय सामन्यात आपण फलंदाजी करतोय याचे भान ठेवणेही गरजेचे असताना जितेश शर्माचे फुटवर्क त्याला बॅकफूटवर ढकलते आणि स्वतःच्याच पायाने यष्ट्यांची घडी विस्कळते. त्याच्या डावाच्या सुरुवातीला याच गडबडीत त्याला एक नशिबवान चौकार मिळाला खरा, पण नंतर तसाच फटका तो पुन्हा खेळला, चेंडू सिमापारही झाला मात्र त्याच्याच पायाने यष्टीवरील विट्याया उडविल्या. दुर्मिळपणे बाद होणाऱ्या हिटविकेट ( स्वयंचित ) पध्दतीने बाद होऊन संघाला धावांची गरज असताना अडचणीत टाकून परतला. तरीही संघाच्या धावा दोनशे एक झाल्या. जितेश शर्माला अनुभवी ईशान किशनला बाहेर बसवून संधी दिली जात आहे आणि ती तो मातीमोल करत आहे. असंच जर होत राहिलं तर ती बाब जितेशच्या दृष्टीने नुकसानदायक ठरू शकते.
आक्रमक फलंदाजांची भरगच्च फौज असलेल्या आफ्रिकन संघाला घरच्या प्रेक्षकांसमोर हे आव्हान फारसे कठीण नव्हते. मात्र भारतीय गोलंदाज या सामन्यात वेगळ्याच आवेशात मैदानात उतरले. हे मोहम्मद सिराजने टाकलेल्या पहिल्याच निर्धाव षटकाने सिध्द केले. त्यानंतर मुकेशकुमार, अर्शदिप सिंग, रविंद्र जडेजाने आपल्या कृतीतून दाखवून दिले. विशेष म्हणजे कर्णधार सुर्यकुमार यादवला संघात तिलक वर्मासारखा चांगला गोलंदाज आहे याची आठवण आली व त्याचाही उपयोग केला. या धामधुमीत दक्षिण आफ्रिकेने १० षटकात ४ बाद ६८ धावा केल्या होत्या. प्रमुख चार फलंदाज बाद झाले असले तरी डेव्हिड मिलर सारखा गोलंदाजांचा कर्दनकाळ मैदानात असल्यामुळे आफ्रिकेच्या आशा शाबूत होत्या.
परंतु नेमकं त्याच वेळेस आपला वाढदिवस साजरा करणारा चायनामन फिरकी गोलंदाज कुलदिप यादव गोलंदाजीस आला आणि सामन्याचा नूरच पलटला. कुलदिपने २.५ षटकांचीच गोलंदाजी केली. या सतरा चेंडूंच्या गोलंदाजीत तितक्याच धावा त्याच्या गोलंदाजीवर निघाल्या मात्र पाच आफ्रिकन फलंदाज तेथे धारातिर्थी कोसळले. याचा परिणाम असा झाला की, आफ्रिकन डाव १३.५ षटकात केवळ ९५ धावात उखडला व भारताला १०६ धावांचा द.आफ्रिकेविरुद्धचा सर्वात मोठा टि २० विजयही मिळाला. द. आफ्रिका मागील तीन पैकी दोन सामन्यात शंभरीच्या आत भारताविरूध्द सर्वबाद होण्याची हि दुसरी वेळ आहे. आपणास ठाऊक आहेच की, मागच्या महिन्यात भारतात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय गोलंदाजांनी केवळ ८३ धावांनी खुर्दा उडवून २५५ धावांचा मोठा विजय साकारला होता.
कुलदिप वाढदिवसाच्या दिवशी नेत्रदिपक कामगिरी करणाऱ्या मोजक्या खेळाडूंच्या पंगतीत तर जाऊन बसलाच शिवाय टि२० मध्ये एका सामन्यात दोनदा पाच किंवा अधिक बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. क्रिकेटच्या तिनही प्रारूपात कुलदिपची होत असलेली अप्रतिम गोलंदाजी टिम इंडियाच्या यशात मोठा वाटा उचलत आहे. रविंद्र जडेजाने दोन व मुकेश कुमारने एक बळी घेऊन भारताला विजयीपथावर आणले. क्षेत्ररक्षकांनी चांगली कामगिरी केल्याने गोलंदाजांच्या कामगिरीला विजयी किनार मिळाली. परंतु या सर्व गदारोळात कुलदिप यादवने मिळविलेल्या पाचही बळींमध्ये क्षेत्ररक्षकांची कुठलीही मदत नाही. पायचित व त्रिफळाचित करूनच कुलदिपने स्वयंसिध्द होत अतिशी कारनामा केला.
कर्णधार म्हणून सुर्यकुमार यादवने स्वतःची मालिका न गमावण्याची परंपरा कायम राखताना या सामन्यात आपली चांगलीच छाप सोडली. प्रथम फलंदाजी करताना अविस्मरणीय शतक फटकावले. नंतर गोलंदाजांना गरजेनुसार वापरले. त्यामुळे आफ्रिकन फलंदाजांना स्थिरावण्याची संधीच मिळाली नाही. दुर्देवाची बाब म्हणजे सुर्या क्षेत्ररक्षण करताना पाय मुरगळल्याने दुखापतग्रस्त झाला. द.आफ्रिकेत होणाऱ्या वनडे व कसोटी संघात त्याला स्थान नसल्याने या दुखापतीचा संघाच्या कामगिरीवर परिणाम होणार नसला तरी सुर्या आफगाणिस्तान विरूद्धच्या मालिकेपूर्वी तंदुरूस्त होणे संघासाठी गरजेचे आहे.
एकूण सगळा खेळ बघता पाऊस व पराभव यांचा ससेमिरा बाजूला सारून टिम इंडियाने द.आफ्रिकेतील या मालिकेतला पहिला विजय मिळवून मालिका बरोबरीत सोडवली. याचा मनोवैज्ञानिक लाभ उर्वरीत वनडे व कसोटी मालिकेत टिम इंडियाला नक्कीच होईल व प्रथमच द. आफ्रिकेत कसोटी मालिकेत विजय साजरा करण्यास बळ मिळेल.
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल नंबर - ९०९६३७२०८२.

