वडजाई शिवारात तातडीने पिंजरा लावा अन्यथा अंदोलन - सुदाम पटारे
भोकर प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे पुन्हा बिबट्याचा धुमाकुळ सुरू झाला असून या बिबट्याने भोकर शिवारातील वडजाई परिसरातील राजेंद्र पटारे यांच्या घरासमोर बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला चढवत एक शेळी फस्त केली व एक शेळी जखमी केली तर दुसर्या शेतकर्यांच्या वस्तीवर देखील चांगलाच धुमाकुळ घातल्याने अनेक शेतकर्यांना रात्र जागवावी लागल्याने शेतकरी धास्तावले आहेत. या परिसरात तातडीने पिंजरा लावून त्या बिबट्याचा बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र अंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष सुदाम पटारे यांनी दिला आहे.
भोकर गावातील वडजाई परीसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. यात येथील जिल्हा परिषदेच्या वस्ती शाळेपासून काही अंतरावर राहत असलेले नामदेव वाकडे यांच्या कंपाऊंड मध्ये बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला चढविला परंतू सुदैवाने वाकडे यांना जाग आल्याने त्यांनी त्यास हाकलले. मात्र बिबट्याच्या या प्रयत्नामुळे परिसरातील वाकडे, काळे व शेजूळ या जवळच्या वस्त्यावरील शेतकर्यांना बिबट्याच्या धास्तीने रात्र जागवावी लागली.
तर येथून जवळच गट नं.१६२ मध्ये वस्ती करून राहत असलेले गोरक्षनाथ उर्फ राजेंद्र नानासाहेब पटारे यांच्या घरासमोर बांधलेल्या शेळ्यांवर पहाटे सव्वा तीन वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला चढवत एक शेळी जखमी करून दुसरीवर झडप घालून ती शेळी वस्तीपासून सुमारे एक हजार फुटावर नेवून फस्त केली. यावेळी ही राजेंद्र पटारे यांना जाग आल्याने उर्वरीत शेळ्या बचावल्या. त्यानंतर या बिबट्याने येथून जवळ असलेले अशोक पटारे यांच्यावस्तीवर चाल केली परंतू ते ही वेळीच जागे झाल्याने पुढील अनर्थ टळला.
एकंदरीत या परिसरात बिबट्याच्या धास्तीने वडजाई परिसरातील शेतकरी धास्तावलेले आहेत. त्यात रात्रीच्या वीज पुरवठ्यात या बिबट्याच्या भितीने वीज पुरवठा सुरू असताना देखील शेतकर्यांना आपल्या शेतात पाणी भरायला जाणे मोठे जिकरीचे आणि दुरापास्त झालेले असल्याने वनविभागाने या परिसरात त्वरीत पिंजरा लावून त्या बिबट्याला जेरबंद करावे अन्यथा तीव्र अंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष सुदाम पटारे,मयुर काळे, गोरख शिंदे, राजेंद्र पटारे, नामदेव वाकडे, दत्तात्रय काळे, सोपान शेजूळ, सोमनाथ शेजूळ, राजेंद्र शेजूळ, बजरंग पटारे, आनंदा लोहकणे, योगेश पटारे, विष्णु कोते आदिंसह परिसरातील शेतकर्यांनी इशारा दिला आहे.
दरम्यान घटनास्थळी वनविभागाचे गोरक्षनाथ सुरासे व टाकळीभान येथील पशुवैद्यकीय अधिकारी दिलीप कोकणे यांनी भेट देत पटारे कुटूंबाचे सांत्वन करत घटनेचा पंचनामा करून नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
*फोटो ओळी*
भोकर शिवारात राजेंद्र पटारे यांची शेळी बिबट्याने हल्ला चढवत फस्त केल्याचे छायाचित्रात दिसत आहे. समवेत वनविभागाचे गोरक्षनाथ सुरासे, गोरख शिंदे, राजेंद्र पटारे, योगेश पटारे व विष्णु कोते आदि दिसत आहेत.
*पत्रकार चंद्रकांत झुरंगे -भोकर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

