अकोले प्रतिनिधी:
भारत हा खेड्यांचा देश आहे. खेडी सुधारली तरच देश समृद्ध होईल.म.गांधी यांनी 'खेड्याकडे चला' म्हटले, तेच योग्य होते.आज शहरे ही रोगट आणि विषमय होत आहेत.त्यासाठीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 'ग्रामगीता 'प्रत्येक गावाने वाचन करून उक्ती, कृतीने अंमलात आणावी अशी अपेक्षा वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केली.
श्रीरामपूर येथील साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांचे अकोले तालुक्यातील राजूर येथील ॲड. मनोहरराव नानासाहेब देशमुख महाविद्यालयात बहिःशाल शिक्षण मंडळ अंतर्गत स्व. यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी डॉ. उपाध्ये हे 'राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 'ग्रामगीता''या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख होते. प्रारंभी बहिःशाल मंडळ केंद्र कार्यवाह प्रा. एस.बी. शिंदे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. दत्तात्रय गन्धारे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी कुंभार समाजातील कार्यकर्ते बाळासाहेब जगदाळे, वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष गणेशानंद उपाध्ये व्यासपीठावर उपस्थित होते.प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी 'ग्रामगीता 'विषयी बोलताना बहिःशाल शिक्षण मंडळ कार्य, स्व.यशवंतराव चव्हाण यांचे साहित्यिक योगदान आणि वाचन संस्कृतीचे महत्व विशद करून विद्यार्थी समूहाला सांगितले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म ३० एप्रिल १९०९ मध्ये अमरावतीजवळील यावली गावात झाला.तर त्यांचे निधन ११ऑक्टोबर १९६८ रोजी झाले. म. गांधी यांचा सहवास आणि विचारातून ते स्वातंत्र्य लढ्यात उतरले.१९५५ मध्ये त्यांनी 'ग्रामगीता 'हा ४६८० ओवीसंख्या असलेला ग्राम उद्धाराचा ग्रन्थ लिहिला. खेडे हे भारतीय संस्कृतीचे बलस्थान आहे. ते निरोगी,विकसित,समाधानी झाले तरच देश समृद्ध होईल, असे सांगून त्यांनी विविध ओव्या सादर केल्या.मुलामुलींना योग्य शिक्षण द्यावे, योग्य वयात लग्न व्हावे, गाईगुरे, प्राणी, निसर्ग यांचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे. ज्ञानाची वाट धरून अंधश्रद्धा, व्यसनमुक्त गाव व्हावे, शाखाहारी जीवन जगून भक्ती आणि देशसंस्कृती जपावी असे संदर्भ स्पष्ट केले.
प्राचार्य डॉ.भाऊसाहेब देशमुख अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, विद्यार्थ्यांनी ग्रामगीता वाचावी, समजून घ्यावी तसे वर्तन करावे, वाचनालयातील पुस्तके वाचून जीवनसंस्कृती जपावी. आज जणू व्हाट्सप विद्यापीठ महत्वाचे झाले आहे, विद्यार्थी पुस्तकांपासून दूर न जाता जवळ आला तरच तो ज्ञानी आणि आरोग्यशील होईल असे सांगून डॉ. उपाध्ये यांनी खूप कष्ट करीत पोरक्या स्थितीत कसे शिक्षण घेतले. राजूरच्या सर्वोदय स्कुलमध्ये शिक्षण घेतल्याच्या आठवणी सांगून आजच्या युवकांनी आपले जीवन समृद्ध करावे असे आवाहन केले.प्रा. एस. बी. शिंदे यांनी सूत्रसंचालन करीत आभार मानले.
*पत्रकार लियाकतखान पठाण
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

