shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रोहित शर्मा प्रकरणाने महिला संघाचा ऐतिहासिक विजय झाकोळला...!


             भारतात क्रिकेट मग ते महिलांचं असो किंवा पुरुषांचं नेहमीच चर्चेचा विषय असतो. त्यामध्ये कुणी जिंकले तर महाचर्चा होते तर वादविवाद झाल्यास चर्चांचा ओघ थांबतच नाही.  मग ते व्यासपिठ एखादा पारावरचा कट्टा असो की टिव्ही चॅनेल्स. आता तर सोशल मिडीया नावाच्या वादळी प्रसार माध्यमाने सर्वांनाच मागे टाकून वादाचे मुळ शोधून खऱ्या दुखऱ्या नसेचं पोर्टमार्टेम करून असलीयत जगासमोर आणली देखील व चुकीच्या लोकांचा पर्दाफाशही केला व अन्याय झालेल्या व्यक्तीला सहानुभूतीचं पांघरून ओढून मायेची उब देण्याचा प्रयत्नही केला. तसेच खलनायक ठरलेल्यांचे मुखवटे चव्हाट्यावरही आणले.


            सर्वप्रथम चर्चा करुया भारतीय महिला क्रिकेट संघाची. भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंडकडून टि२० मालिका २-१ अशी गमावल्यानंतर एकमात्र कसोटी सामन्यात नवी मुंबईच्या डि वाय पाटील स्टेडीयमवर अवघ्या सव्वादोन दिवसात इंग्लंडवर ३४७ धावांचा विश्वविक्रमी विजय मिळविला. महिला कसोटी क्रिकेटमध्ये इतक्या मोठया धावांनी विजय मिळविण्याचा विश्वविक्रम आता भारतीय संघाच्या नावावर झळकणार आहे. मिथाली राजची पंचवीस वर्षांची महान कारकिर्द थांबल्यानंतर प्रथमच महिला टिम कसोटी सामना खेळत होती. आपल्या पहिल्याच कर्णधारपदाच्या कसोटीत हरमनप्रित कौर फलंदाजी व नेतृत्व या दोन्ही क्षेत्रात कमालीची यशस्वी ठरली ४९ व नाबाद ४४ धावांबरोबर प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांच्या पेपर प्लॅनचे तंतोतंत पालन करून आपल्यापेक्षा मजबूत इंग्लिश महिला संघाला शाळकरी पोरींसारखे हरविले.
            पहिल्या दिवशीच भारताने ७ बाद ४१० धावा कुटून विजयाची मजबूत पायाभरणी केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ४२८ धावांवर डाव संपताच इंग्लंडलाही १३६ धावांत गुंडाळले.  मात्र फॉलोऑन न देता स्वत: फलंदाजी करून ८ बाद १८६ धावांवर डाव घोषित करून इंग्लंडला ४७९ धावांचे महाकाय लक्ष दिले. मात्र सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पहिले सत्र संपण्यापूर्वीच भारतीय गोलंदाजांनी १३१ धावांतच इंग्लिश संघाचा फडशा पाडून भव्य विजय मिळविला. भारताचा मायदेशात इंग्लंडवरील पहिलाच विजय ऐतिहासिक ठरला. सामन्यात अर्धशतक व ९ बळी घेणारी दिप्ती शर्मा सर्वोत्तम खेळाडू ठरली असली तर प्रत्येक खेळाडूने प्रभावी कामगिरी करून आपला ठसा उमटविला.
          दिप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग, स्नेहराणा यांनी गोलंदाजीत आपले योगदान दिले.  शेफाली वर्मा, दिप्ती शर्मा, स्मृती मंधाना, हरमनप्रित कौर यांनी दुसऱ्या डावात तर पदार्पण करणारी शुभा सतीश, जेमिमा रॉड्रीग्ज, दिप्ती शर्मा, हरमनप्रित, स्नेह राणा यांनी पहिल्या डावात दमदार फलंदाजी केल्याने भारताला मजबूती मिळाली व एक चमकदार विजय मिळाला.
           महिला क्रिकेट संघाचा विजय भव्य दिव्य असला तरी भारतीय क्रिकेटवर छाप असलेल्या आयपीएल मधील मुंबई इंडियन्स संघातील अंतर्गत घडामोडींमुळे समस्त क्रिकेटच ढवळून निघाले. मुंबई इंडियन्सने आपलाच नव्हे सर्वात जागतिक क्रिकेटमध्ये शंभरावर सामन्यात नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांमध्ये सर्वोत्तम यशाची सरासरी असलेला रोहित शर्मासारखा यशस्वी कर्णधार चुटकी वाजविल्यासारखा पदावरून हटविला व तोही हार्दिक पांड्या सारख्या कायम अनफिट राहाणाऱ्या लंगड्या घोडयाकरीता. हि बाब मुंबई इंडियन्सच्या जगभरातील समर्थकांना आवडली तर नाहीच, परंतु त्यातील अनेकांनी मुंबई इंडियन्सला असलेले त्यांचे समर्थन काढून घेतलेच. शिवाय मुंबई इंडियन्सला मागील दहा वर्षात आपल्या कुशल नेतृत्वाने जगभर प्रसिद्ध करणाऱ्या रोहित शर्माच्या फॅन फॉलोअर्समध्ये कमालीची वाढ झाली. रोहित शर्माला प्रत्यक्ष मुंबई संघातही मोठा पांठिबा आहे. त्यापैकी सुर्यकुमार यादव व जसप्रित बुमराहानेही आपल्या सोशल मिडीया साईटवरुन नाराजी व्यक्त केली. रोहित शर्मा जवळ नव्या - जुन्या खेळाडूंना हाताळण्याची जी आगळी वेगळी कला आहे ती त्याला इतरांपेक्षा वेगळं बनवते. शिवाय रोहित शर्मा हा एक निस्वार्था खेळाडूच नव्हे तर माणूसही आहे. हे त्याने त्याच्या खेळातून व वागण्यातून अनेकदा दाखवूनही दिले आहे.
               रोहितचे वय ३५ असले तरी त्याच्यात अजून बरेच क्रिकेट बाकी आहे. त्यामुळे आयपीएलमधील कोणतीही क्रिकेट फ्रँचाईसी त्याला म्हणाल त्या किंमतीला डोळे झाकून आपल्याकडे ओढू शकते. परंतु मुंबई इंडियन्सने केवळ हार्दिक पांड्यासाठी रोहित सारख्या निस्वार्थी खेळाडूला दुखावले नसते. हार्दिक पांड्या हा एक तथाकथीत अष्टपैलू खेळाडू असला तरी त्याची जागतिक क्रिकेटमधील आकडेवारी डोळे फाडणारी नाही व त्याने भारताला फार काही अविस्मरणीय विजय वगैरे मिळवून दिलेले नाहीत. त्यामुळे तो आला म्हणजे मुंबईला मोठया शिखरावर नेईल असे काही नाही. वास्तविक सन २०२१ च्या मेगा ऑक्शनमध्ये संघ प्रबंधनाने खेळाडू निवडताना गांभीर्य न दाखविल्याने त्यांना मजबूत संघ उभा करता न आल्याने मागील दोन वर्ष त्यांची कामगिरी लौकिकाप्रमाणे झाली नाही. यात रोहितचा काही एक दोष नाही. आता पांड्या आल्यावर लगेच जादूची कांडी फिरेल असंही काही होणार नाही.
             काही जण हार्दिकने मागील दोन वर्ष नेतृत्व केलेल्या गुजरात जायंटसच्या कामगिरीवर बोट ठेवतील. पण तेथे त्याच्या एकट्याच्या जीवावर नाही तर संघात असलेल्या एकाचढ एक वरचढ खेळाडूंमुळे व आशिष नेहरा सारख्या मेगा ब्रेन माईंडमुळे तो यशस्वी ठरला आहे हे विसरून चालणार नाही. रोहितची व पांड्याची कर्णधार म्हणून तुलना केली तर रोहित शांत, संयमी व सहकाऱ्यांना समजून घेणारा कर्णधार आहे. तर त्या उलट पांड्या भडक, संतापी व भर मैदानात आपल्याच खेळाडूंना शिव्या घालणारा कर्णधार आहे. सन २०२१ च्या आयपीएलमध्ये एका सामन्यात मोहम्मद शमी सारख्या वरिष्ठ खेळाडूकडून झेल सुटल्यानंतर त्याला शिव्या घालणारा पांड्या सर्वानी टिव्हीवर बघितलाच असेल. रोहितने निस्वार्थी पणाचा दाखलाच जगासमोर उभा केला असताना स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी कोणाचाही मुलाहिजा न बाळगण्याचा महाआदर्श पांड्याने याच प्रकरणात जगासमोर ठेवला आहे. मागे एका सामन्यात पांड्या कर्णधार असताना भारताला विजयी फटका मारून जिंकून दिले. त्यावेळी सामन्याचे बरेचसे चेंडू बाकी होते व भारत कुठल्याही कारणाने हरू शकणार नव्हता. त्या वेळेस नवोदित फलंदाज तिलक वर्मा ४९ धावांवर नाबाद होता. त्याला अर्धशतक करू देण्याची संधी होती. त्यामुळे तिलकचा आत्मविश्वास वाढला असता मात्र स्वतः हिरो ठरण्याची मोहमाया पांड्याला आवरली नाही. याउलट रोहितने संघ हितासाठी अनेकदा आपल्या विक्रम - पराक्रमावर पाणी सोडले आहे. याच तुलनात्मक कामगिरीच्या आधारे रोहित पांड्यापेक्षा भारी दिसतो.
            मुंबई इंडियन्सने भले भविष्याचा विचार करून पांड्याला कर्णधार केले असले तरी तो भविष्यात शंभर टक्के फिट राहून सर्व सामने खेळेल का ? या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेही "नाही " असेच मिळेल. मग कशाला संघातील वातावरण बिघडवण्याचे काम मुंबई इंडियन्सने केले ?  एवढा एक मोसम रोहितलाच कर्णधार ठेवले असते व हार्दिकला अजून अभ्यास करू दिला असता तर काहीच बिघडले नसते. सन २०२५ मध्ये मेगा ऑक्शन असल्याने रोहितला रिटेन न करता मुंबईने बरेच काही साधले असते. मात्र विनाश काले विपरीत बुध्दी म्हणतात ते यालाच.
             पुढच्या सत्रापासून रोहित शंभर टक्के मुंबई इंडियन्स मध्ये दिसणार नाही. सीएसके, दिल्ली कॅपिटल्स, आरसीबी सारखे संघ त्याला आपल्या ताफ्यात ओढण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओततील. या विनाकारण खोदलेल्या प्रश्नाचा परिणाम मुंबई इंडियन्स संघावर होईलच पण टिम इंडियालाही याची न कळत झळ पोहोचू शकते. कदाचित अशाच प्रकरणांची खदखद आयसीसीच्या उपांत्य व अंतिम सामन्यात संबंधीत खेळाडू पदावरील कर्णधाराची जिरवण्यासाठी व्यक्त करत असतीलही. परिणामतः भारत विजेतेपदाच्या जवळ जाऊनही दूरच राहातो. याला जबाबदार असणाऱ्यांच्या नांग्या ठेचण्याची हिच योग्य वेळ आहे. नाही तर त्याच तिकिटावर तोच खेळ असाच सुरू राहील.

लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
मोबाईल नंबर - ९०९६३७२०८२.
close