बुध्दीबळाच्या पटलावरील राजा जितका शक्तीमान असतो त्यापेक्षा जास्त बुध्दीवान व्यक्ती त्या राजाला चालवणारी असते. बुध्दीबळाच्या खेळाचे कार्यक्षेत्र चौसष्ठ घरांपर्यंतच मर्यादित असते. परंतु क्रिकेटचे मैदान भव्य दिव्य असते आणि मैदानावरच्या राजाला अर्थात कर्णधाराला विशेष महत्व असते. प्रत्यक्ष खेळ सुरू असताना हाच कर्णधाररुपी राजा खेळाचे सुत्र स्वतःच हाकतो. मात्र याच कर्णधार राजाला शह देण्याचा प्रयत्न झाला तर खेळात विघ्न येण्याची शक्यता असते. त्या दरम्यान मैदानावर व मैदानाबाहेरही बऱ्याच घडामोडी झालेल्या असतात. येथे अशाच एका क्रिकेट राजाच्या कहाणीकडे लक्ष वेधणार आहोत.
सन २००८ मध्ये भारतात इंडियन प्रिमियर लिग नावाची बीसीसीआय संचलीत टि२० खेळाची लिग स्पर्धा सुरू झाली आणि त्यानंतर भारतीय क्रिकेटचा कायापालटच झाला. आठ संघाच्या या स्पर्धेतील पहिला विजेता संघ होता डेक्कन चार्जर्स हैद्राबाद. याच संघात एक नवा सितारा रोहित शर्मा हा पण होता. आक्रमक खेळणारा हा फलंदाज तेंव्हा मधल्या फळीत खेळायचा. सुरूवातीचे तीन सिझन तो हैद्राबादकडून खेळला. ऑफस्पिन गोलंदाजी करताना दोन हॅट्रीक्सही त्याच्या नावे आहेत. खेळा व्यतिरिक्त नेतृत्वगुणही त्याच्यात ओतप्रोत भरलेले होते.
सन २०११ मध्ये मुंबई इंडियन्समध्ये आल्यानंतर त्याच्या खेळात आणखी निखार आला. दरम्यान टिम इंडियात खेळताना महेंद्रसिंग धोनीच्या तालमीत तो चांगलाच तयार झाला. सन २०१३ च्या आयपीएल सत्रा दरम्यान तत्कालिन कर्णधार रिकी पाँटींगच्या अपयशी नेतृत्वात मुंबईची हालत खस्ता बनली असताना संघ प्रबंधनाने अचानक रोहितच्या डोक्यावर कर्णधार पदाचा मुकुट चढवला आणि चमत्कारच झाला. त्याच सत्रातील उर्वरीत सामन्यात रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने बाजी मारून पहिले विजेतेपद मिळविले. रोहितच्या नेतृत्वात सन २०१३, १५, १७, १९, २० असे पाच विजेतेपद मुंबई इंडियन्सला मिळाले. त्यामुळे मुंबईची पत वरच्या स्तरावर पोहोचली व कर्णधार म्हणून रोहितलाही जगमान्यता मिळाली. पुढे जात टिम इंडियाच्या तिन्ही प्रारूपातील संघांचा तो कर्णधार बनला. आयसीसी स्पर्धांचा विजेतेपदाचा दुष्काळ त्याच्याकडून तरी थांबेल असे वाटत होते. सन २०२२ टि२० विश्वचषक उपांत्य फेरी, सन २०२३ डब्ल्यूटिसी फायनल, सन २०२३ वनडे वर्ल्ड कप फायनल त्याच्याच नेतृत्वात भारत हरला. त्यामुळे समस्त देशवासियांचा भ्रमनिरास झाला. मात्र रोहितने स्वतःच्या सकारात्मक धोरण व खेळासह संघाची घडी व्यवस्थित बसवली. वनडे वर्ल्डकपमध्ये तर भारत कधीही हारेल असे वाटत नव्हते. मात्र अंतिम सामन्यात होत्याचं नव्हतं झालं. रोहितचे प्रामाणिक प्रयत्न वाया गेले आणि तो ज्या आयपीएल संघाचे नेतृत्व करतो त्यालाही अंतर्गत घरघर लागली. मात्र तिचा स्फोट व्हायला थोडा वेळ लागला. खेळाडू रिटेन करणे, आदलाबदल करणे यामध्ये रोहितला मुंबईने कायम ठेवले. पण त्याला शह देण्यासाठी म्हणा की पर्याय म्हणा मुंबई इंडियन्स मॅनेजमेंटने सन २०२१ च्या सत्रात रिटेन न केलेला व स्वतः घडवलेला हार्दिक पांङ्या परत आपल्या ताफ्यात सामावून घेतला.
सन २०२१ मध्ये मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला रिटेन केले नव्हते तेव्हा तो फॉर्मात नव्हता व शारिरीक दृष्टया फिटही नव्हता, हे प्रमुख कारणं होते. नेमकं त्याच वर्षी गुजरात जायंटस हा नवा संघ आयपीएलमध्ये सहभागी झाला. गुजरात जायंटसने मागचा पुढचा विचार न करता हार्दिक पांड्यासारख्या लंगडया घोडयावर डाव खेळला व त्याला संघात घेवून त्याचा कर्णधार म्हणून राज्याभिषेकही केला. फॉर्मात नसणे, फिजिकली फिट नसणे, प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर याच्या " कॉफी विथ करण " या टिव्ही शोमध्ये त्याचा सख्खा मित्र केएल राहुलसह महिलांविषयी अभद्र टिपण्णी करणे, याच कारणावरून बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून माघारी बोलावणे, भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी संतापजनक वक्तव्य करणे या व इतर अनेक बाबी त्याच्या विरोधात असतानाही गुजरात जायंटस संघ प्रबंधनाने त्याला झुकते माप दिले. त्याच वर्षी पांड्याचे नेतृत्व म्हणा की सांघिक खेळ यांच्या बळावर पदार्पणातच गुजरातने विजेतेपद मिळविले व पुढच्याच सत्रात फायनलमध्ये पराभूत झाले. वास्तविक एक खेळाडू व कर्णधार म्हणून त्याने तेथेच कायम राहणे क्रमप्ताप्त असताना त्याचे व मॅनेजमेंटचे जाहिराती करण्यावरून बिनसले. वास्तविक त्याला वर्षाला पंधरा कोटी रुपये मानधन मिळत होते. पण त्याला गुजरात काही रास आले नाही व अंतर्गत प्रयत्नातून मुंबई इंडियन्सकडे जाण्याचे प्रयत्न सुरू केले व त्यात तो यशस्वीही झाला. इतकेच नव्हे तर कर्णधारपदही झोळीत पाडून घेतले. या दरम्यान पांड्याला घडविणाऱ्या कर्णधार रोहित शर्माला पदावरून हटविण्याची त्याची चालही यशस्वी ठरली.
सन २०२२ टि२० विश्वचषकापासून पांड्या भारताच्या टि२० संघाचा कर्णधार आहे. मात्र तंदुरुस्ती हा त्याचा मुख्य प्रॉब्लेम आहे. नुकत्याच संपलेल्या वनडे विश्वचषकात चौथ्या सामन्यात पुणे येथे बांगलादेश विरुद्ध घोट्याला दुखापत झाल्यापासून तो संघाबाहेर आहे. या कालावधीचा उपयोग त्याने स्वतःचे मनसुबे पुर्ण करण्यासाठी केला. परंतु रोहित शर्मा सारख्या यशस्वी कर्णधारास पदावरून हटविण्याइतकी कुटील चाल तो खेळेल असे वाटले नव्हते. शिवाय मुंबई इंडियन्सेही यंदाचे सत्र रोहितला नेतृत्व करू देण्याचे औदार्यही दाखविले नाही. मुंबई इंडियन्सची जी लोकप्रियता आहे त्यात सर्वात मोठा वाटा रोहित शर्माचा आहे. या अनपेक्षित घडामोडीमुळे रोहितचे चाहते नक्कीच दुखावले असतील. असे अंतर्गत राजकारण होत राहिले तर मुळात आयपीएल विषयी नकारात्मक असलेले लोक मोठ्या संखेने आयपीएलकडे पाठ फिरवू शकतात.
रोहित शर्मा विश्वचषक जिंकण्यापासून एक पाऊल दूर राहिला असला तरी त्याच्या एकंदर खेळ व नेतृत्वगुणांवर तमाम क्रिकेटप्रेमी संतुष्ट होते. जर रोहितने विश्वचषक जिंकला असता तर त्याला असे तडकाफडकी मुंबई इंडियन्सने कर्णधारपदावरून हटविले असते का ? रोहित मधील बरेचसे क्रिकेट अजूनही शिल्लक असून भविष्यात तो मुंबई इंडियन्सला बाय बाय करू शकतो. येथे एक बाब नमूद करावीशी वाटते की, तो ज्या दोन फ्रॅंचाईसीज कडून खेळला आहे त्यांनी विजेतेपद मिळविले आहे. त्याच्या या पायगुण म्हणा किंवा क्रिडागुण याचा लाभ पंजाब किंवा आरसीबीने घेतल्यास वावगे ठरणार नाही.
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल नंबर - ९०९६३७२०८२.

