शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
सोमवार दिनांक १५ जानेवारी २०२४
शिक्षण मंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही,महिला शिक्षीकांचे आझाद मैदानावर उपोषण: शिवसेना उ.बा.ठा गटाचा पाठिंबा - शुभांगी पाटील..!!
मुंबई : राज्यातील विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शिक्षकांना राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेला शब्द फिरवल्याने शिक्षक पुन्हा आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसले आहेत. मागील वर्षी राज्यातील हजारो विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शिक्षक आपल्या शंभर टक्के पगाराच्या मागणीसाठी 30 ऑक्टोबर 2023 पासून शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आझाद मैदान मुंबई येथे आंदोलनात बसलेले होते.
या आंदोलनात राज्यातील जवळपास सर्वच शिक्षक संघटना सहभागी झालेल्या होत्या. या आंदोलनास शिवसेना उ.बा ठा गटाच्या उपनेत्या तथा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांनी दिनांक 7 नोव्हेंबर रोजी पाठिंबा देत सदर आंदोलनाची संपूर्ण वस्तुस्थिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांना दिली होती. त्यानंतर दिनांक 8 नोव्हेंबर रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार विरोधी पक्षनेते खासदार अंबादासजी दानवे साहेब यांनी स्वतः आझाद मैदानावर येत शिक्षकांच्या सदर आंदोलनास पाठिंबा दिला. शिक्षकांचा व विरोधी पक्षाचा दबाव पाहता दिनांक 9 नोव्हेंबर रोजी राज्याचे शिक्षण मंत्री ना दीपक केसरकर यांनी तात्काळ शिक्षकांची भेट घेऊन शंभर टक्के अनुदान देणे शक्य नाही पण अनुदानाचा पुढील टप्पा देण्याची लेखी आश्वासन दिले होते. शिक्षण मंत्र्याच्या या आश्वासना वर विश्वास ठेवून त्यावेळी शिक्षकांनी आपले आंदोलन मागे घेतले होते, परंतु शिक्षण मंत्र्यांनी दिनांक 9 नोव्हेंबर रोजी शिक्षकांना दिलेला शब्द पाळला नाही. व हिवाळी अधिवेशनात शिक्षकांना कोणतीही टप्पा वाढ न देता त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे राज्यभरातील विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शिक्षकांचा मोठा विश्वासघात झाल्याने दिनांक 3 जानेवारी 2024 पासून शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून राज्यातील विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शिक्षक पुन्हा आझाद मैदानावर आंदोलना साठी उतरले आहेत. या आंदोलनात राज्यातील सुमारे 23 संघटना उतरल्या असून, संघटनांचे सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्यासह सुमारे आठ ते दहा हजार शिक्षक आझाद मैदानावर आंदोलनात बसले असून या शिक्षकां पैकी अनेक महिला शिक्षिकांनी आपल्या मुला बाळां सह उपोषणाच्या हत्यार उपसले आहे. शिक्षक समन्वय संघाच्या या आंदोलनात शिवसेना उ बा ठा.उपनेते तथा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेच्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील या दिनांक 10 जानेवारी पासून सक्रियपणे उतरल्या असून सदर आंदोलनास शिवसेना पक्षाने पाठिंबा दिलेला आहे.
विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शिक्षकांना जोपर्यंत शंभर टक्के अनुदान मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा निर्धार शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून शुभांगी ताई पाटील,दीपक कुलकर्णी, कर्तार सिंग ठाकूर रहाटे काका, महेंद्र बच्छाव ,अनिल परदेशी , ज्ञानेश्वर चव्हाण ,शेळके सर व अनेक समन्वयकांनी व्यक्त केला आहे.
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

