shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चौदा महिन्यांच्या वनवासानंतर आधुनिक राम - लक्ष्मण परतले


              एरव्ही ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझिलंड, दक्षिण आफ्रिका या बलाढ्य संघांविरूध्द मालिका असली तर भारताचा संघ कसा राहिल या विषयी प्रत्येकाच्या मनात उत्सुकतेचं काहुर चालू असतं. त्या तुलनेनं कमजोर विंडीज, श्रीलंका, बांगलादेश, झिंबाब्वे, अफगाणिस्तान या संघांविरुध्दच्या भारताच्या संघा विषयी कुणी फारसं कुतुहल उजाळत बसत नाही. सर्वांना माहिती असतं बलाढय संघांविरूद्ध अनुभवी खेळाडूंनाच निवडलं जाईल तर कमजोर संघाविरुध्द नवोदितांना अजमावलं जाईल. परंतु सध्या भारत दौऱ्यावर येऊ घातलेल्या अफगाणिस्तान विरूध्दच्या संघाची अनेक जण आतुरतेने वाट बघत आहे.  अफगाणिस्तान विरूध्द संघ निवडण्यामागे उत्सुकतेचं व महत्वाचं कारणं असे की, सध्या अफगाणिस्तानचा संघ समजतात एवढा कमजोर नाही. हे त्यांनी नुकत्याच भारतातच झालेल्या वनडे विश्वचषकात दाखवून दिले आहेच. इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका या माजी विश्वविजेत्यांना त्यांनी चक्क धुळ चारली तर ऑस्ट्रेलिया सारख्या विश्वचषकाच्या बादशहाच्या तोंडचे पाणी पळवले होते. शिवाय त्यांच्याकडे दर्जेदार फिरकी गोलंदाज असल्याने त्यांच्या गोलंदाजीचा टिम इंडियाला प्रत्यक्ष आंतरराष्ट्रीय सामन्यात अनुभव यावा तसेच सन २०२२ टि२० विश्वचषकात उपांत्य फेरीत इंग्लंडविरूध्द टिम इंडियाचा पराभव झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा व वरिष्ठ फलंदाज विराट कोहली जवळ जवळ चौदा महिने संघाबाहेर होते. त्यानंतर हार्दिक पांड्या संघाचा कर्णधार बनला. त्यावेळेस वाटले होते की रोहित व विराटची टि २० कारकिर्द संपली. मात्र क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. म्हणून तर क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखलं जातं. 

              गेल्या चौदा महिन्यात पुलाखालून बरेच पाणी गेले. वनडे विश्वचषकात भले भारत विजेता ठरला नसला तरी रोहितच्या नेतृत्वात संघाने जी कामगिरी केली त्यामुळे प्रत्येक जण समाधानी होता. शिवाय विराट कोहली ७११ व रोहित शर्मा ५९७ हे स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजात पहिल्या दोन क्रमांकावर होते. शिवाय त्यांची धावगती टि२० लाही लाजवेल अशी असल्याने टि२० वर्ल्ड कपमध्ये ते दोघं संघाचा हिस्सा असतीलच असे गृहित धरले जाऊ लागले. दरम्यान टि२० चा नवा कर्णधार हार्दिक पांड्या वनडे विश्वचषका दरम्यान जखमी झाला. त्यानंतर तो अजूनही पूर्ण फिट नसल्याने शब्दशः लंगडया घोड्यावर जुगार खेळायला बीसीसीआय काय मुर्व नाही. बीसीसीआयने परिस्थितीची नजाकत ओळखून रोहित- विराटचा फॉर्म व अनुभव लक्षात घेत टि२० विश्वचषकापूर्वीच्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी अफगाणिस्तानविरूध्द दोघांनाही संघात पाचारण करून सर्वांच्या उत्सुकतेवर पडदा टाकला.
चौदा महिन्यांच्या वनवासानंतर आधुनिक राम - लक्ष्मण परतले संघात परतले असं म्हंटलं तरी वावगं ठरू नये.
               हार्दिक पांड्या, सुर्यकुमार यादव व ऋतूराज गायकवाड तंदुरुस्त नसल्याने अफगाणिस्तानविरूध्दच्या संघात निवडले गेले नाही. टि२० विश्वचषकाला अजून पाच महिने बाकी आहेत. तोपर्यंत हे जायबंदी खेळाडू तंदुरूस्त होऊ शकतात शिवाय दरम्यान आयपीएल असल्याने आणखीही काही खेळाडूंना अजमावण्याची संधी बीसीसीआयला मिळणार असल्याने एक मजबूत व निश्चित विजेता ठरू शकणारा संघ निवडण्याचा प्रयत्न निश्चितच केला जाईल. येथे एक गोष्ट मात्र निश्चित समजली जाते की, आगामी टि२० विश्वचषकासाठी कर्णधार म्हणून रोहित शर्मा शंभर टक्के पक्का आहे, फक्त त्याच्या तंदुरुस्ती संदर्भात काही गडबड व्हायला नको. तसे बघाल तर रोहित व कोहलीचा हा सफेद चेंडूच्या खेळातला हा शेवटचा विश्वचषक असणार असल्याने त्यांनाही आपल्या शिरपेचात आणखी एक विश्वचषक विजेत्याचं बिरूद लावायला नक्कीच आवडेल व देशवासीयांनाही आयसीसी स्पर्धांचा दुष्काळ संपल्याचा आनंद मिळेल.
             अजित आगरकर अध्यक्ष असलेल्या निवड समितीने रोहित शर्माच्या नेतृत्वात निवडलेला अफगाणिस्तान किरूध्दच्या तिन टि२० मालिकेसाठीचा सोळा सदस्यांचा संघ असा आहे ---
रोहित शर्मा (कप्तान), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा ( यष्टीरक्षक), संजू सॅमसन ( यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, कुलदिप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, व मुकेश कुमार.
                जसप्रित बुमराहा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, रविंद जडेजा यांना आगामी इंग्लंडविरुद्धच्या डब्ल्यूटीसी स्पर्धेच्या अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या दृष्टीने विश्रांती दिली आहे. तर सध्या भन्नाट फॉर्मात असलेला व यष्टीरक्षक म्हणून वनडे व कसोटीत शिरकाव केलेला के एल राहुल सध्या तरी या मालिकेत निवडला गेला नाही. मात्र मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व के एल राहुल यांचं सख्ख्य व राहुलला दिलं जाणारं झुकतं माप बघता केएल राहुल विश्वचषकाच्या संघात दिसला तर कोणीही आश्चर्च मानू नये. याच केएल राहुलच्या संघातील घुसखोरी मुळे ईशान किशन सारखा खेळाडू वनडे, टि२० व कसोटीतही चांगले प्रदर्शन करूनही संघाबाहेर ठेवला जायचा. याचा त्याच्या मानसिकेतवर मोठा परिणाम झाल्याने त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्याहून मायदेशी परतावे लागले. विशिष्ठ खेळाडूंना "झुकते माप तर दुसऱ्याला आखडता हात " हे धोरण काहिसं सापत्न वाटतं त्यामुळे बीसीसीआयनेच ईशानसारख्या खेळाडूंचा सामोपचाराने विचार करण्याची वेळ आली आहे. नाहीतर चांगल्या खेळाडूचे जीवनच बरबाद व्हायचे.
           अशीच काहीसी गत संजू सॅमसन बाबत व्हायची मात्र दक्षिण आफ्रिकेत वनडे सामन्यात झुंझार शतक ठोकल्याने त्याच्यासाठी टि२० चे दरवाजे खुले झाले. मात्र ते कसे उघडझाप करतात हे भविष्याच्या गर्भातच दडले आहे.
              एकंदर हा संघ एक प्रायोगिक तत्वावरच निवडलेला दिसतो. यामध्ये फिरकी गोलंदाज योग्य प्रमाणात दिसत असले तरी तीनच वेगवान गोलंदाज निवडले असल्याने चौथ्या गोलंदाजाची उणीव जाणवू शकते. तसं पहाल तर शिवम दुबे फास्ट बोलींग ऑलराऊंडर म्हणून संघात आहे. परंतु त्याला कितपत संधी मिळते यावरच बरंच काही अवलंबून आहे. तरीही तीन पैकी एकही वेगवान गोलंदाज जखमी अथवा अपयशी ठरला तर तत्काळ रिप्लेसमेंट करणं मुश्किल होईल. तेंव्हा चौथा वेगवान गोलंदाज न निवडण्याची त्रुट, चुक सिद्ध न झालं तर बरंच होईल.
              तिन टि२० सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना अकरा जानेवारीला मोहाली, दुसरा सामना १४ जानेवारी इंदोर व तिसरा सामना १७ जानेवारीला बेंगलोरला होईल.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
मोबाईल नंबर -९०९६३७२०८२
close